मांद्रे पोटनिवडणुकीत ‘दयानंद’ केंद्रस्थानी

‘दयानंद’ बांदोडकरांनंतर ‘दयानंद’ सोपटे यांच्यामुळे पोटनिवडणूक


15th November 2018, 06:25 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता            

पणजी : मांद्रे मतदारसंघात दुसऱ्यांदा पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे यावेळीही ‘दयानंद’ या नावाची व्यक्तीच केंद्रस्थानी असेल. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांच्या निधनामुळे मांद्रे मतदारसंघात पहिल्यांदा पोटनिवडणूक झाली होती. आता काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले दयानंद सोपटे यांच्यामुळे ही दुसरी पोटनिवडणूक आेढवली आहे.

राज्यात १९७२ साली झालेल्या तिसऱ्या विधानसभा निवडणुकीत दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर हे मांद्रे मतदारसंघातून निवडून आले. त्यापूर्वी ते मडकई मतदारसंघातून निवडून आले होते. मांद्रे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे दयानंद बांदोडकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले. मांद्रेचे आमदार म्हणून त्यांना पूर्ण कार्यकाळ मिळाला नाही. दि. १२ आॅगस्ट १९७३ रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाले. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या निधनामुळे मांद्रे मतदारसंघात दि. २४ फेब्रुवारी १९७४ रोजी पहिली पोटनिवडणूक झाली. या पोटनिवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातर्फे अॅड. रमाकांत खलप या युवा नेत्याला उमेदवारी देण्यात आली. त्या पोटनिवडणुकीत अॅड. खलप यांनी काँग्रेसचे उमेदवार राजू तळवणेकर यांचा ६,२८५ मतांनी पराभव केला. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट आणि त्यात एक हुशार, सुशिक्षित युवा नेता मांद्रेकवासीयांनी निवडून दिला. भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर काही काळ शशिकला काकोडकर यांच्याकडे मगोची धुरा राहिली. परंतु त्यानंतर अॅड. खलप हेच मगोचे सर्वेसर्वा बनले होते.             

दयानंद उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांच्यानंतर भाजपतर्फे मांद्रे मतदारसंघाचे प्रतिनि‌धित्व करणारे प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मुख्यमंत्री बनण्याची संधी प्राप्त झाली. प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा पराभव २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार दयानंद सोपटे यांनी केला. आता सोपटे यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि मांद्रेतील मतदारांवर दुसऱ्यांदा पोटनिवडणुकीला सोमोरे जाण्याची वेळ आेढवली. त्यात दयानंद सोपटे यांनी मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीचा पराभव केला होता. प्रा. पार्सेकर मांद्रे मतदारसंघातून निवडून आले असते तर विद्यमान परिस्थितीत सरकारच्या नेतृत्त्वाची धुरा पुन्हा त्यांच्याकडे येण्याचीही शक्यता होती. एकंदरीत काय तर ‘दयानंद’ हे नाव मांद्रे मतदारसंघावर आेढवलेल्या पोटनिवडणुकांच्या केंद्रस्थानी राहणार आहे.

मांद्रेत दि. २४ फेब्रुवारी १९७४ रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत स्व. भाऊसाहेबांच्या पुण्याईने अॅड. रमाकांत खलपांचा सहज विजय झाला. भाऊसाहेबांविषयी मांद्रेवासीयांना आपुलकी होती. मात्र, यावेळच्या निवडणुकीत दयानंद सोपटे यांना विजयी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे. कारण पक्षांतर केल्यामुळे त्यांच्यासमोर काँग्रेसचे कडवे आव्हान असणारच आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांचेही मोठे आवाहन असेल. पार्सेकर यांनी अजूनपर्यंत निवडणुकीत उतरण्यावर काहीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, त्यांनी विरोधात उतरण्याची तयारी केल्यास दयानंद सोपटे यांना निवडणूक कठीण जाण्याची शक्यता आहे.