खाणप्रश्नी मगोचा निर्वाणीचा इशारा

येत्या १५ डिसेंबरपर्यंत ठोस निर्णय घ्या, अन्यथा सरकारच्या पाठिंब्याबाबत फेरविचार


15th November 2018, 06:21 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता             

फोंडा : खाणप्रश्नी येत्या १५ डिसेंबरपर्यंत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा मगो पक्षाने सरकारला दिलेल्या पाठिंब्याबाबत गंभीरपणाने विचार करावा लागेल, असा निर्वाणीचा इशारा मगोपचे अध्यक्ष तथा माजीमंत्री दीपक ढवळीकर यांनी बुधवारी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारला दिला.‍

भाजपच्या बाेटचेप्या भूमिकेमुळे नाराज बनलेल्या खाण अवलंबित मंचच्या शिष्टमंडळाने बुधवारी दीपक ढवळीकर यांची फोंडा येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांनी वरील इशारा दिला. या शिष्टमंडळात पुती गांवकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यालयाबाहेर सुमारे आठशेहून अधिक खाण अवलंबितांनीही हजेरी लावली होती. 

यापूर्वी गोवा फॉरवर्ड पक्षाकडूनही खाणप्रश्न सोडविण्याची जबाबदारी भाजपची आहे, अशी भूमिका जाहीर करण्यात आली होती. आता खाण अवलंबितांकडून आघाडी घटकांवर दबाव टाकला जात असल्याने आगामी काळात भाजपसाठी हा विषय अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे.

खाणी सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून वटहुकूम जारी होईल, असे आमिष यापूर्वी भाजपकडून खाण अवलंबितांना दाखविण्यात आले होते. मात्र, वटहुकूमाचा प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळल्यानंतर आता कायद्यात दुरुस्ती केली जाईल, असे भाजपचे नेते सांगत आहेत. या पोकळ आश्वासनांमुळे खाण अवलंबितांची सहनशीलता संपत चालली आहे. प्रत्यक्ष तोडगा काढण्याची काहीच चिन्हे दिसत नाहीत. भाजपकडून केवळ वेळकाढूपणा केला जात असल्याची भावना खाण अवलंबितांत बनली आहे. भाजपच्या याच भूमिकेमुळे नाराज बनलेल्या खाण अवलंबितांनी आता सरकारमधील आघाडीच्या घटकांना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी खाण अवलंबितांनी फोंड्यात जाऊन दीपक ढवळीकर यांची भेट घेतली. यावेळी ढवळीकर यांनी आपली सडेतोड भूमिका मांडून खाण अवलंबितांना पूर्ण पाठिंबा दर्शविला.

केंद्रात भाजपचे सरकार आहे. राज्यातील‌ तिन्ही खासदार भाजपचेच आहेत. एवढे असूनही बंद खाणींविषयी अद्याप स्पष्ट भूमिका जाहीर न होणे, ही चिंतेची बाब आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी ढवळीकर यांनी व्यक्त केली. पंतप्रधानांनी खाण अवलंबिताचा हा प्रश्न सोडवण्यासाठी  सर्वपक्षीय नेत्यांना वेळ दिला पाहिजे. त्यांनी फक्त एकदाच भेट देऊन तोडगा काढणे शक्य आहे का ? याबाबत भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. अन्यथा राज्य सरकारने ताबडतोब खाण लीज लिलावाची प्रक्रिया सुरू करावी. खनिज विकास महामंडळ स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मगो पक्षाचा पाठिंबा आहे. सरकारने अधिक वेळ न दवडता हा विषय सोडविण्यासाठी तातडीने पाऊले उचलावीत, अशी मागणी ढवळीकर यांनी यावेळी केली.

खाणी सुरू करण्यासाठी भाजप सरकार काहीच भूमिका घेत नसल्याने मगो पक्षाला आता ठोस भूमिका घ्यावीच लागेल. येत्या १५ डिसेंबरपर्यंत सरकारने ठोस भूमिका जाहीर न केल्यास सरकारला दिलेल्या पाठिंब्याबाबत फेरविचार करावा लागेल, असा गंभीर इशाराही ढवळीकर यांनी दिला. मगो पक्ष खाण अवलंबितांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याची हमी ढवळीकर यांनी दिली. भाजप नेत्यांनी खाण अवलंबितांची दिशाभूल करण्याचे प्रकार बंद करावेत आणि एकदाची ठोस भूमिका जाहीर करावी, असेही ढवळीकर यांनी बजावले आहे.             

...तर लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार             

राज्यातील खाणप्रश्न तत्काळ निकालात निघाला नाही तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा ‘गोवा खनिज मशीनरीज मालक संघटने’चे अध्यक्ष संदीप परब यांनी यावेळी दिला आहे.

केंद्र सरकारने वटहुकूमाचा प्रस्ताव नाकारला तर अन्य पर्याय काय? याचा खुलासा सरकारने करावा. आत्तापर्यंत राज्यातील भाजप नेत्यांनी दिलेली आश्वासने खोटी ठरली तेव्हा केंद्रातील एखाद्या जबाबदार नेत्याकडून ठोस आश्वासन मिळायला हवे, अशी मागणीही यावेळी परब यांनी केली. पुती गांवकर  म्हणाले की, खाणप्रश्नी तोडगा निघत नसेल तर नवी दिल्लीतील जंतरमंतरवर संसदेच्या सत्राच्या पहिल्या तीन दिवसांत धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात तिन्ही खासदारांना हजेरी लावावी लागेल, असेही ते म्हणाले.

ऑस्ट्रेलियातून खनिज आयातीवर हरकत            

धारबांदोडा तालुका खनिजवाहू ट्रक मालक संघटनेचे अध्यक्ष बालाजी गावस यांनी ऑस्ट्रेलियातून होणाऱ्या खनिज आयातीला हरकत घेतली. राज्यात खनिज व्यवसाय बंद झाल्याने ऑस्ट्रेलियातून खनिज आयात केले जात आहे. ही आयात सुरूच राहिली तर राज्यातील खाण उद्योगांसाठी मोठी समस्या निर्माण होईल, असेही ते म्हणाले. ही आयात सुरूच राहिली तर खनिज अवलंबितांचेही भविष्य अंध:कारमय बनेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

आगामी १५ दिवसांत पर्याय खुला : तेंडुलकर

मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्याकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर खाण अवलंबितांनी आपला मोर्चा भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्या खडपाबांध येथील निवासस्थानी वळविला. यावेळी तेंडुलकर यांनी पुढील १५ दिवसांत खाणप्रश्नी पर्याय खुला होईल, असे वचन अवलंबितांना दिले.

तेंडुलकर यांच्या निवासस्थानी जाण्यापूर्वी पुती गांवकर यांच्या नेतृत्वाखाली तिस्क-फोंडा येथील आगीयार मैदानावर सुमारे आठशेहून अधिक अवलंबित एकत्र आले. त्यानंतर त्यांनी तेंडुलकर यांच्या निवासस्थानापर्यंत मोर्चा काढला. राज्यातील खाण व्यवसाय पूर्ववत होण्यासंबंधी अनेक सकारात्मक गोष्टी घडत आहेत. पुढील १५ दिवसांत निश्चित पर्याय खुला होईल. खाण अवलंबितांनी विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन खासदार तेंडुलकर यांनी यावेळी केले. खाणींच्या विषयावरून भाजप नेत्यांना अद्याप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट का मिळत नाही, असा सवाल खाण अवलंबितांनी यावेळी उपस्थित केला. पंतप्रधान मोदी यांची सर्वपक्षीय शिष्टमंडळाला भेट घडवून आणावी. या शिष्टमंडळात खाण अवलंबितांच्या प्रतिनिधींचाही समावेश असावा, अशा मागण्याही यावेळी अवलंबितांनी केल्या. मात्र, तेंडुलकर यांनी संदिग्ध उत्तर दिले. खाण व्यवसाय सुरू होईल, याबाबत भाजपला खात्री आहे. त्यामुळे पॅकेजची गरजच भासणार नाही, असेही तेंडुलकर यांनी यावेळी शिष्टमंडळाला सांगितले.