स्टेन ली नावाची झळाळी!

Story: अग्रलेख-२ |
15th November 2018, 06:00 am

लेखणीतून उभ्या केलेल्या पात्रांच्या माध्यमातून संपूर्ण जगातील आबालवृद्धांना वेड लावणारे स्टेन ली यांचे मंगळवारी देहावसान झाले. आणखी दीड महिन्यानंतर त्यांनी वयाची ९६ वर्षे पूर्ण केली असती. गेली काही वर्षे वयोमानानुसार ते आजारी होते. अर्धशतकाहून अधिक काळात त्यांनी लेखक, संपादक, प्रकाशक, अभिनेता म्हणून जगभरात नाव कमविले. जन्मभूमी आणि कर्मभूमी अमेरिका हीच असली तरी स्टेन ली यांनी सादर केलेल्या काही पात्रांमुळे त्यांनी जगभरात लोकप्रियतेचा कळस गाठला. सर्व वयोगटातील वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्या मनात त्यांच्या स्पायडरमॅनने घर केले. हल्क, डाॅक्टर स्ट्रेंज, फँटास्टिक फोर, डेअरडेव्हिल्स, ब्लॅक पँथर, कॅप्टन अमेरिका, एक्स-मॅन अशी एकाहून एक सरस पात्रांची निर्मिती त्यांनी केली. ली यांच्या या पात्रांनी पुस्तके, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका व्यापून टाकल्या. लॅरी लीबर या आपल्या भावाच्या सहाय्याने लिहिलेली अँट मॅन, आयर्न मॅन, थॉर ही पात्रेही लोकप्रियतेत आघाडीवर राहिली. १९६१ मध्ये स्टेन ली यांनी मार्वल कॉमिक्स मालिकेची सुरुवात केली. तेव्हा छोटासा असलेला हा उपक्रम पुढे बहुराष्ट्रीय कंपनी बनला. ​डिजनी कंपनीने ली यांची कंपनी २००९ मध्ये चार अब्ज डॉलरना खरेदी केली, त्यांच्या ऍव्हेंजर्स मालिकेतील चित्रपटांनी जगभरात मिळून पंंधरा हजार कोटी रुपयांची कमाई केली, यावरून त्यांच्या व्यवसायाचा आवाका लक्षात यावा! एक लेखक किती झळाळते व्यावसायिक यश मिळवू शकतो याचा धडाच ली यांनी घालून दिला.