फॉर्मेलिनवरून मंत्री राणे, सरदेसाई, इब्राहिम यांच्याकडून तियात्र : काँग्रेस


12th November 2018, 04:26 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : राज्यात आयात होणाऱ्या मासळीमध्ये सापडलेल्या फॉर्मेलिन प्रकरणावरून आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई आणि मडगाव घाऊक आणि किरकोळ मासळी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष मौलाना इब्राहिम या तिघांनी राज्यात तियात्र सुरू केले आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रवक्ते संकल्प आमोणकर यांनी रविवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

यावेळी त्यांच्यासमवेत युवा काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर उपस्थित होते. गोव्यात आयात होणाऱ्या मासळीमध्ये फॉर्मेलिन रसायन सापडल्यापासून राज्यभरातील नागरिकांत मासळीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याची दखल घेत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पराराज्यांतून गोव्यात आयात होणाऱ्या मासळी वाहतुकीवर सहा महिन्यांसाठी बंदी लागू करणार असल्याची घोषणा शनिवारी केली. सध्या राज्यातून मासळीची निर्यात मात्र जोरात सुरू आहे. राज्यात मासळीचा तुटवडा भासू नये, यासाठी सरकारने आयातीवर बंदी लागू करण्याआधी मासळीच्या निर्यातीवरही बंदी घातली पाहिजे, असे आमोणकर म्हणाले.

राज्यात उपलब्ध होणारी मासळी हॉटेल व्यावसायिकांपर्यंत पोहोचते. पण ती सामान्य नागरिकांना मिळत नाही. यासाठी सरकारने प्रथम राज्यातून निर्यात होणाऱ्या मासळीवर बंदी घातली पाहिजे. राज्यभरातील नागरिकांना पुरवठा झाल्यानंतर शिल्लक राहिलेली तसेच गोमंतकीय खात नाहीत, अशाच मासळीची निर्यात परराज्यांत व्हावी. असे झाले तरच राज्यातील नागरिकांना मुबलक प्रमाणात मासळी उपलब्ध होईल, असेही आमोणकर यांनी स्पष्ट केले.

राज्यात मासळीची आयात बंदी करून काहीही साध्य होणार नाही. मंत्री विश्वजीत राणे, मंत्री विजय सरदेसाई आणि मासळी संघटनेचे नेते इब्राहिम यांच्यात सध्या एकटा मारल्याचे आणि दुसरा रडल्याचे नाटक करीत आहे, असा आरोपही संकल्प आमोणकर यांनी केला.