कळंगुटमधील डोंगरांना संरक्षण देण्याचा निर्धार

झाडे तोडल्याच्या प्रकाराचा निषेध


12th November 2018, 04:24 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता

म्हापसा : आराडी-नायकावाडा (कळंगुट) येथील बोआ व्हिएज कॉन्व्हेंट अनाथालयाजवळील डोंगरावर कोणत्याही प्रकारचे बांधकाम उभारण्यास तसेच डोंगरावरील झाडे तोडण्यास एकसंध राहून विरोध करण्याचा निर्धार कळंगुटवासीयांनी केला आहे. डोंगरावरील झाडे तोडण्यात आलेल्या ठिकाणी रविवारी निषेध फेरीही काढण्यात आली. माजी आमदार आग्नेल फर्नांडिस, स्थानिक पंचायत मंडळा तसेच नागरिक या फेरीत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कळंगुटमध्ये बोआ व्हिएज व बागा रिट्रीट सेंटरवरील असे दोन डोंगर असून, या डोगरांचे संरक्षण करणे येथील लोकांचे कर्तव्य आहे. डोंगर, झाडे कापणे यांसारख्या बेकायदा गोष्टींना विरोध करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून कळंगुट मतदारसंघ फोरम कार्यरत असून, सिकेरी ते पर्रा दरम्यान या मतदारसंघात घडल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या गोष्टींविरोधात ही समिती उभी राहणार आहे. यासाठी कळंगुटवासीयांनी समितीला सहकार्य करावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष प्रेमानंद दिवकर यांनी केले. डोंगर आणि झाडे ही गोव्याला मिळालेली मोठी देणगी आहे. या देणगीचे रक्षण करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. झाडे तोडणे म्हणजे भावी पिढीचा नाश करण्यासारखेच आहे. त्यामुळे अशा प्रकारांचा निषेध करून सर्वांनी एकजुटीने असे प्रकार थांबविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन फादर पॉल यांनी केले.

कळंगुट पंचायतीने या डोंगरांवर बांधकाम करण्यास विरोध दर्शविला आहे. पंचायतीच्या नोटिशीला कंत्राटदाराने न्यायालयात दाद मागितल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तरीही येथे झाडे कापण्याचा प्रकार घडला आहे. याविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्यात येईल. या डोंगरासोबतच गावातील इतर डोंगर व शेतीचे रक्षण करण्यासाठी लोकांनी पुढे यावे, असे आवाहन माजी सरपंच अँथनी मिनेझीस यांनी केले.

डोंगरावरील २ लाख ४० हजार चौरस मीटर व २ लाख ९८ चौरस मीटर जागेत दोन व्यक्तींनी बांधकाम करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कोमुनिदादने या प्रकारास विरोध केला आहे. या डोंगराच्या रक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले कोमुनिदादकडून उचलली जातील, असे आश्वासन अॅटर्नी अँथनी डिसोझा यांनी दिले. सिस्टर फारिया, माजी सरपंच जोझफ सिक्वेरा, क्लोतिंदा ब्रागांझा, जिल्हा पंचायत सदस्य दत्तप्रसाद दाभोळकर आदींनीही मनोगत व्यक्त केले.

दुरुस्तीबाबत ग्रामसभा घेण्याचा निर्णय

उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाने तयार केलेल्या कळंगुटच्या बाह्य विकास आराखड्यात डोंगराळ भागाचा समावेश सेटलमेंटमध्ये करण्यात आला आहे. हा भाग सेटलमेंटमधून बाहेर काढून जैसे थे स्थितीत (ऑर्चर्डमध्ये) ठेवण्यात यावा, अशी मागणी करीत या दुरुस्तीबाबत खास ग्रामसभा बोलाविण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

झाडे कापण्याच्या तक्रारीनुसार वन खात्याने पाहणी केली आहे. उत्तर गोवा नियोजन विकास प्राधिकरणाकडून याबाबत येत्या दोन दिवसांत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येईल. मतदारसंघातील डोंगर आणि झाडांचे संरक्षण करणे आमदार या नात्याने आपले कर्तव्य आहे. पण काही जणांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा प्रकारांना लोकांनी बळी पडू नये, असे आवाहन उपसभापती तथा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी केले आहे.