मांद्रे हॉटेल्स कंपनीच्या आल्वारा जमीन व्यवहारांची चौकशी व्हावी!

अॅड. अमित सावंत यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी


12th November 2018, 04:24 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पेडणे : महसूल खात्याने २००७ मध्ये कायदा दुरुस्ती करून आल्वारा जमिनींचा मालकी हक्क देण्याची तरतूद केली. या दुरुस्तीचा लाभ उठवून केवळ तीन महिन्यांत मांद्रे पंचायत क्षेत्रातील पाच आल्वारा जमिनी मेसर्स मांद्रे हॉटेल्स प्रा. लि. कंपनीकडून खरेदी करण्यात आल्या. यापैकी एक आल्वारा जमीन सरकारच्या ताब्यातील होती. या जमीन विक्री व्यवहाराची महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी अॅड. अमित सावंत यांनी केली आहे.

तत्कालिन काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात गोवा भू-महसूल दुरुस्ती विधेयक २५ एप्रिल २००७ मध्ये मंजूर करण्यात आले. या विधेयकात आल्वारा जमिनींचा मालकी हक्क देण्याची तरतूद करण्यात आली. ‘क्लास-२’ची नोंदणी असलेली जमीन शुल्क भरून ‘क्लास-१’ करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली. या दुरुस्ती विधेयकाच्या मदतीने सात आल्वारा जमिनींचा मालकी हक्क मिळवून त्यांची विक्री करण्यात आल्याचे महालेखापालांच्या अहवालात स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे या सात प्रकरणांपैकी सहा प्रकरणे एका मांद्रे पंचायत क्षेत्रातील आहेत. एकीकडे सर्व्हे क्रमांक २०१/० ही आल्वारा जमीन सरकारने ताब्यात घेऊनही २०११ मध्ये या जमिनीचा मालकी हक्क प्राप्त करून ती परस्पर विकण्यात आली. ऑगस्ट २००८ ते नोव्हेंबर २०११ या तीन वर्षांत ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावरून ही दुरुस्तीच मुळात या जमीन विक्री व्यवहारासाठीच केल्याचे स्पष्ट होते. याच काळात इतर अनेक अर्ज मालकी हक्कांसाठी सरकारकडे सादर झाले होते. या अर्जांवर मात्र निर्णय घेण्यात आला नाही. केवळ आपल्या मर्जीतील लोकांना लाभ मिळवून देण्याचाच हा खटाटोप होता. ही सगळी जमीन विक्री प्रकरणे गंभीर असून, या व्यवहारांत कोण-कोण सहभागी आहेत, हे उघड व्हायलाच हवे, असेही अॅड. सावंत यांनी म्हटले आहे.

काय म्हणतात अॅड. सावंत?

- मांद्रे पंचायत क्षेत्रातील पाच आल्वारा जमिनी मालकी हक्क प्राप्त करून मेसर्स मांद्रे हॉटेल्स प्रा. लिमिटेड या कंपनीला ३.७३ कोटी रुपयांना विकण्यात आल्या. हा सगळा व्यवहार सप्टेंबर २०११ ते नोव्हेंबर २०११ या केवळ तीन महिन्यांत झाला.

- यापैकी एक जमीन मेसर्स महाशीर हॉटेल्स अँड रिसोर्ट प्रा. लिमिटेड या कंपनीला डिसेंबर २००८ मध्ये १.१८ कोटी रुपयांना विकण्यात आली.

- यानंतर मेसर्स महाशीर हॉटेल्स कंपनीकडून हीच जमीन जानेवारी २०१३ मध्ये मेसर्स मांद्रे हॉटेल्स प्रा. लिमिटेड कंपनीला ४.७२ कोटी रुपयांना विकण्यात आली.

- या एकूणच व्यवहारात तत्कालिन महसूलमंत्री, मामलेदार, उपजिल्हाधिकारी आणि इतर लोकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे. अन्यथा एवढा मोठा व्यवहार होऊच शकत नाही.