एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानची बरोबरी

दुसऱ्या सामन्यात पाहुण्या न्यूझीलंडचा ६ गड्यांनी पराभव


10th November 2018, 02:19 pm

अबुधाबी :वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने दुसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचा ६ गड्यांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. आफ्रिदीने ३८ धावा देत चार गडी बाद केले.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र त्यांचा हा निर्णय पाकिस्तानने चुकीचा ठरवला. न्यूझीलंडतर्फे अनुभवी रॉस टेलरने सर्वाधिक ८६ धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त सर्व फलंदाज फ्लॉप ठरले. टेलरशिवाय हेन्री ​निकोल्सने ३३ व जॉर्ज वार्करने २८ धावा केल्या. केन विलियम्सन १, टॉम लॅथम १, कॉलिन मुनरो १३ व कॉलिन डी ग्रँडहोम ३ धावाच करू शकले.
पाकिस्तानतर्फे शाहीन आफ्रिदीने चार गडी बाद केले. त्याच्याबरोबर हसन अलीने २ व महम्मद हाफीज व शादाब खान यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. लक्ष्याचा पाठलाग करताना इमाम उल हक रिटायर्ड हर्ट झाला मात्र यानंतर फखर झमानन (८८) बाबर आझमसोबत (४६) आपल्या संघाला विजयाच्या समीप पोहोचवले.
पाकिस्तानचा पहिला गडी २९व्या षटकात १५५ धावांवर बाद झाला व यानंतर बाबर आझमही २९व्या षटकात संघाची धावसंख्या १५६ असताना बाद झाला. शोएब मलिक १० व सरफराज अहमद १३ धावा करून बाद झाले मात्र महम्मद हाफीजने २७ धावांची नाबाद खेळी केली व शादाब खानसोबत (२) मिळून आपल्या संघाला ५७ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवून​ दिला. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानला ४७ धावांनी नमवले होते. तिसरा व अंतिम सामना दुबईत रविवारी रात्री ८.३० वाजता खेळवण्यात येणार आहे.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड ५० षटकांत ९ बाद २०९ धावा : जॉर्ज वॉर्कर त्रि. गो. हाफीज २८, रॉस टेलर (नाबाद) ८६, हेन्री निकोलस त्रि. गो. हसन ३३, लॉकी फर्ग्यूसन (नाबाद) १. गोलंदाजी : शाहीन आफ्रिदी ९-१-३८-४, हसन अली ९-०-५९-२.
पाकिस्तान : ४०.३ षटकांत ४ बाद २१२ धावा : फखर झमान झे. हेन्री गो. लाकी ८८, बाबर आझम झे. हेन्री गो. लॉकी ४६, महम्मद हाफीज (नाबाद) २७, सादाब खान (नाबाद) २. गोलंदाजी : लॉकी फर्ग्यूसन १०-६०-३, इश सोढी ६-२-२१-१.