वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा अंतिम टी-२० सामना आज


10th November 2018, 02:18 pm
वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा अंतिम टी-२० सामना आज

चेन्नई :
भारताचे लक्ष्य वेस्ट इंडिजविरुद्ध रविवारी होणाऱ्या तिसऱ्या व अखेरच्या टी-२० सामन्यात विजय मिळवून विंडीजचा सुफडा साफ करण्याचे असणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका भारताने आधीच २-० अशी जिंकली आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारत आपल्या दुसऱ्या फळीतील युवा खेळाडूंना आजमावून पाहणार आहे.
चेन्नईच्या क्रिकेट चाहत्यांना मात्र आयपीएलच्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची उणीव भासणार कारण तो टी-२० मालिकेत भारतीय संघाचा भाग नाही आहे. कर्णधार रोहित शर्माच्या शानदार शतकाच्या जोरावर लखनौमध्ये २-० अशी निर्णायक आघाडी घेतल्यानंतर टीम इंडिया श्रेयस अय्यर, वॉशिंगटन सुंदर व शाहबाद नदीम यांना ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी संधी देण्याचा प्रयत्न करणार आहे.
निवडकर्त्यांनी रविवारी होणाऱ्या टी-२० सामन्यासाठी जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह व उमेश यादव तथा फिरकीपटू कुलदीप यादव यांना ऑस्ट्रेलिया दौरा डोळ्यासमोर ठेवून विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. वेगवान गोलंदाज सिद्धार्थ कौलला संघात स्थान देण्यात आले आहे.ड
मागच्या काही सामन्यांमध्ये चेपॉक स्टेडियमची खेळपट्टी संथ राहिली आहे मात्र रविवारच्या सामन्यासाठी तयार करण्यात आलेली खेळपट्टी फलंदाजांना उपयुक्त ठरू शकते. लखनौ टी-२० सामन्यात कर्णधार रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये होता व त्याच्याकडून या मैदानावरही मोठ्या खळीची अपेक्षा आहे.
रोहितचा सलामी जोडीदार शिखर धवन, लोकेश राहुल व ऋषभ पंत ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी आपल्या खात्यावर जास्तीत जास्त धावा लावण्याचा प्रयत्न करतील. स्थानिक खेळाडू दिनेश कार्तिकने कमी धावसंख्येच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती व घरच्या मैदानावर पुन्हा एकदा तो चांगली खेळी करण्याचा प्रयत्न करेल.
भुवनेश्वर - खलीलवर सर्वांचे लक्ष्य
वेस्ट इंडिजच्या गाेलंदाजांना सतत हैराण करणारे बुमराह व कुलदीप यादव यांना विश्रांती देण्यात आली असल्यामुळे झटपट गडी बाद करण्याची जबाबदारी भुवनेश्वर कुमार व युवा खलील अहमदवर आली आहे. कुलदीपच्या अनुपस्थितीत फिरकी​विभागात युझवेंद्र चहल पुनरागमन करू शकतो तर कृणाल पांड्याकडे आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला आणखी जास्त उंचीवर नेऊन ठेवण्याची संधी आहे. आता पहावे लागेल की, संघ व्यवस्थापन चेन्नईच्या वॉशिंगटन सुंदरला अय्यरसोबत संधी देते का नाही.
एकदिवसीय मालिकेत भारताला टक्कर दिल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ टी-२० मालिकेत प्रभाव पाडण्यात एकदम अपयशी ठरला आहे. नियमित सलामीवीरांची (ख्रिस गेल व ए​विन लुईस) अनुपस्थिती व वरच्या फळीत करण्यात आलेल्या प्रयोगांमुळे विंडीजच्या संघाला नुकसान झेलावे लागले आहे.
कायरन पोलार्ड, डॅरेन ब्राव्हो व दिनेश रामदिनसारखे अनुभवी फलंदाज आपला प्रभाव पाडू शकले नाहीत तर वरच्या फळीत संधी मिळालेला शिमरन हिटमेयर अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करू शकला नाही. गोलंदाजीत ओशाने थॉमसने आपल्या गती व गडी बाद करण्याच्या क्षमतेने सर्वांना प्रभावीत केले आहे मात्र इतर गोलंदाजांकडून त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. कोलकातामध्ये आयसीसी विश्व टी-२० च्या अंतिम सामन्यात बेन स्टोक्सला सलग चार षटकार लगावून किताब जिंकवून देणारा कर्णधार ब्रेटवेट आपल्या खेळाडूंना चांगले प्रदर्शन करण्यास प्रेरित करण्याचा प्रयत्न करेल.
संघ याप्रमाणे : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कृणाल पांड्या, वॉशिंगटन सुंदर, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, शाहबाज नदीम व सिद्धार्थ कौल.
भारत:
वेस्ट इंडिज : कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), डॅरेन ब्राव्हो, शिमरन हिटमेयर, शाई होप, ओबेद मॅकाय, किमो पॉल, खेरी पियरे, कायरन पोलार्ड, निकोलस पूरण, रोवमॅन पॉवेल, दिनेश रामदिन, शेरफेन रदरफोर्ड व ओशाने थॉमस.
आजचा सामना
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
स्थळ : चेपॉक स्टेडियम, चेन्नई
वेळ : संध्याकाळी ७ वाजता