पैलवान बजरंग पुनिया ठरला ‘महाबली’

जागतिक क्रमवारीत ६५ किलो वजनी गटात पहिला


10th November 2018, 02:16 pm
पैलवान बजरंग पुनिया ठरला ‘महाबली’

नवी दिल्ली :भारताचा पैलवान बजरंग पुनियाने यशाचे एक नवे शिखर गाठले आहे. आता तो जगातील पहिल्या क्रमांकाचा पैलवान बनला आहे. नव्याने जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीत पुनिया ६५ किलो वजनी गटात पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
या सत्रात पाच पदके जिंकणारा २४ वर्षीय बजरंग यूडब्ल्यूडब्ल्यूच्या यादीत ९६ गुण घेऊन क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. याच वर्षी त्याने राष्ट्रकुल स्पर्धेत व आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याबरोबरच वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकही जिंकले होते.
बजरंगसाठी हे सत्र शानदार राहिले आहे व बुडापेस्ट विश्व चॅम्पियनशिपमध्ये पात्रता मिळवणारा तो एकमेव भारतीय पैलवान होता. टॉप रँ​किंगमध्ये बजरंगची टक्कर ज्या क्युबाई रेसलरशी आहे त्या एलेजांद्रो एनरिका व्लाडेस टोबियरवर त्याने ६६ गुणांची मजबूत आघाडी घेतली आहे.
बजरंगने विश्व चॅम्पियनशिपमध्ये झालेल्या रोमहर्षक सामन्यात टटोबियरचा पराभव केला होता. रशियाचा अखमद चाकेईव (६२) तिसऱ्या तर नवा विश्वचॅम्पियन ताकुतो ओटोगुरो (५६) चौथ्या स्थानावर आहे. यानंतर तुर्कीच्या सेलाहतीन किलिसाल्यानचा (५०) क्रमांक लागतो.
बजरंग देशातील एकमेव पुरुष पैलवान आहे जो पहिल्या १० मध्ये आहे तर भारताच्या पाच महिला पैलवान आपापल्या गटात पहिल्या १०मध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाल्या आहेत. रितू फोगट महिलांच्या ५० किलो वजनी गटात ३३ गुणांसह १०व्या स्थानावर आहे. सरिता मोर ५९ किलो वजनी गटात २९ गुणांसह सातव्या तर नवजाेत कौर (३२) व किरण (३७) अनुक्रमे ६८ व ७६व्या वजनी गटात ९व्या स्थानावर आहेत.