बलिप्रतिपदा

सुगंध लोकसंस्कृतीचा

Story: पौर्णिमा केरकर |
10th November 2018, 09:51 am
बलिप्रतिपदा

भक्त प्रल्हादाचा नातू, विरेचनाचा पुत्र म्हणजेच महाबलाढ्य बळी राजा. बळीचे राज्य, हे लोककल्याणकारी राजाचे राज्य होते. बळी राजासारख्या सर्वगुणसंपन्न राजाचे राज्य हे शेतकऱ्यांना स्वत:चे राज्य कसेच वाट होते. शूरवीर, पराक्रमी, तेजस्वी, परमवीर, सहिष्णू, गुणग्राहक, सत्यशाली, प्रजाहितदक्ष इत्यादी, जेवढी विशेषणे लावता येतील तेवढी कमीच होतील, असे वाटायला लावणारा हा राजा. दिवाळसणात त्याची अाठवण केल्याशिवाय दिवाळी पूर्णच होऊ शकत नाही.
बळी राजाने अती खडतर अशी तपश्चर्या करून सामर्थ्य प्राप्त केले. साक्षात इंद्रदेवाला हरवून स्वर्ग जिंकला, इंद्राची संपत्ती नेत असताना ती समुद्रात पडली. देवांच्या मदतीने ती संपत्ती बाहेर काढतानाच्या समुद्रमंथनात त्याने देवांना पूर्ण सहकार्य केले, परंतु देवांनी ‘बळी’ लाच फसवून समुद्रमंथनातून प्राप्त झालेली अमृतरुपी संपत्ती हडप केली. पुढे बळीराजाने विश्वविजय, अश्वमेघ यज्ञ घातला, त्यावेळी त्याचे दातृत्व, त्याचा कल्याणकारी स्वभाव सर्वांना कळून चुकला. बटू वामनाला बळी राजाच्या दानशूरपणाची महती कळून चुकली. त्याने त्याची जणू काही परीक्षाच घ्यायची ठरवली. तीन पावलात पादाक्रांत करता येऊ शकेल, अशा भूमीची मागणी केली.
यामागे त्याचा हेतू वेगळा होता. शुक्राचार्याने संजीवनी विद्येच्या बळावर बटू वामनाचा हेतू वेळीच अोळखला, त्यांनी वामनाच्या मागणीला विरोध दर्शविण्यास बळीराजाला सांगितले, पण दानशूर बळीला विरोध करता अाला नाही. त्यांंनी दान दिलेच. अापले विराट स्वरुप दाखवितच वामनाने एका पायात पृथ्वी, तर दुसऱ्या पायात स्वर्ग पादाक्रांत केला. तिसरा पाय ठेवण्यासाठी जागाच राहिली नाही. तेव्हा बळी राजाने अापले मस्तक पुढे केले. त्याच्या डोक्यावर पाय ठेवून वामनाने त्याला सरळ पाताळात पाठवले. बळीराजाची ही कथा ‘इडा पिडा टळो अाणि बळीचे राज्य येवो’ असे अाजही मनापासून म्हणत असलेल्या खेडोपाड्यातील लोकमानसांना अाठवते. दिवाळसणात बळी राजाचे स्मरण केल्याशिवाय दीपोत्सव साजरा होत नाही. किंबहुना तो केलाच जात नाही.
अापला देश कृषिप्रधान देश. अश्विन- कार्तिकातील वातावरणात एक सोनसळी उत्साह भरून राहिलेला असतो. केरळासारख्या देवभूमीत तर ‘अोमण’ सारखा उत्सव साजरा करून बळीराजाची अाठवण केली जाते. बळीचे लोककल्याणकारी राज्य येवो, असे लोकांना मनापासून वाटते. मातीत भाद्रपदातील परतीच्या पावसाने पेरलेला गारवा पुरेपूर मुरलेला असतो. हवेतही बऱ्यापैकी थंडी असते. गुलाबी थंडी. हवीहवीशी वाटणारी. पावसाळ्यात पेरलेल्या धान्यांचा घास हाता-तोंडाशी अालेला. पिकांची वाढ झालेली. कापणीचा हंगाम जवळपास पोहोचलेला. हेच ते सुगीचे- धनधान्याच्या सुख समृद्धीचे दिवस दारी येऊन ठेपलेले. दुधदुभत्याची अगदी रेलचेल असते. गोठा गायी गुरांच्या तृप्ततेने भरलेला. ‘गोधन’ म्हणजे वैभव, प्रतिष्ठा, श्रीमंती यावर ठाम विश्वास ठेवणारा समाज त्या काळात वावरत होता.
गोधनातून लोकमानसांना तृप्ती प्राप्त व्हायची. दिवाळसणाचे कौतुक करताना बलिप्रतिपदा हे या दिवाळसणाचे महत्त्वाचे अंग. गोधनाची पूजा बांधून त्याचा मोठा सन्मान केला जातो. बैल राबराब राबतो. मानेवर अोझे घेऊन नांगर अोढतो, त्याच्यामुळेच तर पोट जगतं यावर विश्वास ठेवून पुढे जाणारी लोकमानसं ‘बलिप्रतिपदे’ ला अागळावेगळा सन्मान देतात.
दिवाळीच्या दीपोत्सवाची सुरुवात धनत्रयोदशीपासूनची. अाकाशात नक्षत्रे तर धरित्रीवर पणत्यांची अारास - काळोखावर मात करून उजेडाकडे घेऊन जाणारा हा सण गोधनाची पूजा बांधतो. गोठ्यातील गायीगुरांना वर्षातून एकदा तरी विसावा देतो. त्यासाठी गोठ्यातील गुरावासरांना सजवतो. त्यांच्यासाठी खास खाण्याचे पदार्थ केले जातात. पूर्वी तर वधू लग्न करून सासरी जाताना अांदण म्हणून एखाददुसरी गाय घेऊन जायची. माहेरहून सासरी तिच्यासोबत ही गाय असायची. कृषिसंस्कृतीतील ही खरी-खुरी संपत्ती होती. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी- दिपावली- लक्ष्मीपूजन, भाऊबीज हे सर्वच सण एका अोळीत जोडले गेलेले. महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागात पाच पांडव, गवळणी, वाजंत्री, बळीराजा करतात. गोव्यात, कोकणात पाडव्याच्या दिवशी शेणाचा गोठा करतात. त्याला रंगीबेरंगी झेंडूची फुले लावून सजवण्याची मोठी हौसच असते. त्यात कारीट मधोमध कापून त्यांचा भांडी म्हणून वापर केला जायचा. कांबळीचे छोटे तुकडे वापरात अाणून व दोन काठ्या एकमेकांना ‘क्राॅस’ प्रमाणे बांधून यावर ती कांबळ ‘गुराख्याच्या रुपात’ ठेवली जायची. सोबतीला एक गवळण असायची. तिच्या डोक्यावर लाकडाचा भारा असायचा व त्या गोठ्यात जनावरांसोबतीने माणसं राहायची. असे ते गोठ्यातले दृश्य होते. त्या गोठ्याची पूजा करून त्यासाठी खास नैवेद्य केला जायचा. गुरांना एका दिवसाची विश्रांती. वडे तळून त्याच्या माळा त्यांच्या घातल्या जायच्या. अाजही या अशा तऱ्हेच्या परंपरा लोकमानसांनी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केलेला अाहे.
भाताची पैदास तर देशातल्या जास्तीत जास्त प्रदेशात होते अाणि दिवाळसण तर लोकसंस्कृतीचे उदात्त संचित जतन करणारा सण. माती अाणि निसर्ग यांच्याशी माणसं फार पूर्वीपासून जोडली गेली होती. हे दोन्ही घटक संसार फुलवतात. अापल्याला जगवतात. तर मग त्यांच्याविषयीची कृतज्ञता मना-काळजात राखून ठेवायलाच हवी. नरकासुराचा वध होतो अाणि दीप उजळतात. अंधारावर मात करून प्रकाश पसरविणारा हा उत्सव विकारातून विवेकरुपी विचारांकडे नेणारा प्रवास करतो.
(लेखक लोककला अभ्यासक आहेत.)