अविट साहित्ययात्रा

वाचू आनंदे

Story: महेश दिवेकर |
10th November 2018, 09:49 am
अविट साहित्ययात्रा

दृष्टिकोन विशाल करायचा असेल, तर जागतिक साहित्यही वाचणे गरजेचे. जागतिक परिमाण लाभलेले हे साहित्य सकस असेच आहे. अर्थात सगळेच नव्हे! पण, काही लेखकांनी पार अटकेपार झेंडे लावले आहेत. तब्बल शंभर, दोनशे, पाचशे वर्षे झाली तरीही त्यांच्या लेखनावर चित्रपट, नाटके, समीक्षा लिहिली जात आहे. परिसंवाद झडत आहेत. अशा काही महान विदेशी लेखकांचा वेध अच्युत गोडबोले यांनी ‘झपूर्झा-१’ या पुस्तकात घेतला आहे. ‘झपूर्झा’ चे आणखीही काही भाग आहेत.
ज्या इंग्रजी साहित्यिकांच्या आयुष्याची, त्यांच्या साहित्याची अवीट रसयात्रा या पुस्तकात आहे, त्यात शेक्सपिअर ते सार्त्रचा समावेश आहे. विल्यम शेक्सपिअर- आयुष्य, नाटकं, एडगर अॅलन पो, चार्ल्स डिकन्स, फ्योडोर डोस्टोव्हस्की, हेन्रिक योहान इब्सेन, लिओ टाॅलस्टाॅय, आॅस्कर वाइल्ड, जाॅर्ज बर्नाड शाॅ- आयुष्य व लेखन, फ्रँझ काफ्का, अर्नेस्ट हेमिंग्वे, ज्याँ पाॅल सार्त्र, अल्बर्ट कामू या सारस्वतांचा सर्वंकष आढावा या पुस्तकात घेतला आहे. अर्थांत त्यांना याकामी अनेकांनी मदत केली आहे. त्यांचा उल्लेख गोडबोले यांनी प्रस्तावनेत केला आहे.
इंग्रजी वाचणारे मराठी वाचक तसे कमीच. त्यात पुस्तक वाचायला घेतले की त्यातील भाषा, पार्श्वभूमी, बोजड वाक्यरचना यामुळे काही वेळाने कंटाळा यायला लागतो. पण आता, गाजलेली नवी इंग्रजी पुस्तके वर्षभरातच मराठीत येतात. त्यासाठी अनेक प्रकाशकांचे आभार मानायला हवेत. असो. ‘झपूर्झा’ मध्ये केवळ त्या- त्या लेखकाच्या आयुष्याची माहिती मिळत नाही, तर त्यांच्या ‘साहित्य रत्नां’ वरही उजेड पडतो. प्रत्येक कादंबरीचे सारच मिळते.
हे लेखक साहित्याची सामाजिक बांधिलकी मानत होते. अगदी झपाटल्यासारखे त्यांनी लिहिले. अनुभव, तत्कालीन परिस्थितीवर भाष्य केले. यातील डोस्टोव्हस्की, आॅस्कर वाइल्ड यासारख्या लेखकांचे आयुष्यच म्हणजे एक नाट्यमय कादंबरी होती. हिटलर नावाच्या धर्मांध राक्षसाच्या छळाचा फटका काफ्काच्या कुटुंबाला बसला होता. त्याने जे काही भोगले त्याचे प्रतिबिंब त्याच्या साहित्यात पडले आहे. लेखकांच्या विक्षिप्त स्वभावाची वैशिष्ट्ये, त्याचे त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर झालेले परिणाम, पत्नी, प्रेमप्रकरणे वगैरेंवरही ‘झपूर्झा’ मध्ये प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
समलैंगिक जीवन जगणारा आॅस्कर वाइल्ड याच्या आयुष्याची फरफट वाचून वाचक हादरतो. त्याचे बहुतेक सारे साहित्य त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. डोस्टोव्हस्की यांना पीटर्सबर्ग येथे इतर कैद्यांसमवेत जीवे मारण्यासाठी नेले होते. त्यांच्यावर गोळी झाडणार इतक्यात झारने त्यांना माफ करून चार वर्षांची जन्मठेप सुनावल्याचा निरोप येतो.
पुस्तकात या महान लेखकांच्या साहित्याची सविस्तर समीक्षा नाही. पीएचडी मिळविण्यासाठी साहित्य वाचणारे विद्यार्थी आपल्यासमोर नव्हते. तर तरुण विद्यार्थी, गृहिणी, पालक, शिक्षक होते, असे गोडबोले प्रस्तावनेत म्हणतात. काहींनी त्यांची व त्यांच्या पुस्तकांची नावे ऐकलेली असतील. पण ती वाचलेली नसतील. अशा वाचकांना नजरेसमोर ठेवून हे पुस्तक लिहिण्यात आले आहे आणि लेखक त्यात सफल झाले आहेत, असेच म्हणावे लागेल.
पुस्तकाच्या शेवटी ६३ पुस्तकांची संदर्भ यादी देण्यात आली आहे. त्यामुळे वाचकांना ही मूळ इंग्रजी, मराठी पुस्तकेही मागवून वाचता येतील.
(लेखक ‘गोवन वार्ता’ चे सहायक संपादक (पुरवणी) आहेत.)
------
झपूर्झा १
लेखक : अच्युत गोडबोले
मनोविकास प्रकाशन, नारायण पेठ - पुणे (फोन : ०२०-६५२६२९५०)
पाने : ४२१ किंमत : २८० रु.