गाणी दिवाळीची!

रुपेरी पडदा

Story: सौ. विद्या नाईक होर्णेकर |
10th November 2018, 09:48 am
गाणी दिवाळीची!


भारतीय चित्रपटसृष्टीत १९४० च्या दशकात क्रांती झाली. मूक चित्रपटांची जागा बोलक्या चित्रपटांनी घेतली. चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधणे सहजसुलभ झाले. त्यामुळे चित्रपट सर्वसामान्यांच्या आनंदाला द्विगुणित करणारे असावेत, हे कटाक्षाने पाहिले गेले. परिणामी सणासुदीतच भारतीयांचा खरा आनंद दडला आहे, हे काही चित्रपटवाल्यांना नव्याने सांगण्याची गरज भासली नाही. त्यामुळे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग असलेले सणोत्सव चित्रपटांमध्येही समाविष्ट झाले. या सणासुदींची रंगत वाढवण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी निगडीत दृश्ये व गीतांचा भडिमार चित्रपटांमध्ये केला गेला. त्यात गणेश चतुर्थी, दिवाळी, ईद व नाताळ हे तर अगदी महत्त्वाचे सण. म्हटल्यावर त्यांचा अंतर्भाव चित्रपटांमध्ये प्रामुख्याने व्हायला लागला. त्यातूनच मग भारतीयांना अतिप्रिय असलेल्या संगीताच्या माध्यमातून विविध गीते लिहिली गेली.
‘दिवाळी’ चा समावेश असलेले अनेक चित्रपट आजतागायत प्रदर्शित झालेले आहेत. काहींत दिवाळीचा वापर दृश्यांसाठी केला गेला तर काहींत गीतांसाठी. दिवाळीची पार्श्वभूमी लाभलेल्या चित्रपटांचा इतिहास तसा समृद्ध आहे, कारण प्रसंगी आनंदाचा असो वा दु:खाचा दिवाळीच्या माध्यमातून त्याची तीव्रता कमी - अधिक करण्याची कला कथा - पटकथाकारांनी विविध चित्रपटांमधून अगदी लीलया दाखवली आहे. १९४० मध्ये दिग्दर्शक जयंत देसाई यांनी ‘दिवाली’ चित्रपट केला होता. ज्यात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जीवनाचे चढ-उतार दाखविण्यात आले. तर १९४३ मध्ये आलेल्या ग्यान मुखर्जीच्या चित्रपट ‘किस्मत’ चित्रपटात जोहराबाई अंबालेवाली या पार्श्वगायिकेने गायिलेल्या गीतातून ‘घर घर मे दिवाली, मेरे घर मे अंधेरा...’ नायिकेच्या वेदना मांडण्यात आल्या. १९४४ मध्ये एम. सादीक यांचे दिग्दर्शन लाभलेल्या ‘रतन’ या चित्रपटात संगीतकार नौशाद यांच्या संगीताने सजलेल्या ‘आयी दिवाली... आयी दिवाली...’ हे गीत अतिशय लोकप्रिय ठरले होते. आजतागायत हे गीत दिवाळीची रंगत वाढवताना ऐकावयास मिळते.
१९५० मध्ये निर्माता-दिग्दर्शक सोहराब मोदी यांच्या ‘शीश महल’ गीता दत्त आणि शमशाद बेगम यांनी गायलेले व वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेले ‘आयी है दिवाली...’ हे बरेच गाजले. कौटुंबिक वा सामाजिक विषय हाताळणाऱ्या चित्रपटांमध्ये दिवाळी कथानकाला पुढे नेण्यास सहाय्यभूत ठरू लागली. १९५१ मधील ‘स्टेज’ या चित्रपटात आशा भोसलेंचे, ‘जगमगती दिवाली की रात आ गयी, १९५५ मधील ‘सबसे बडा रूपैया’ या चित्रपटातील ‘इस रात दिवाली कैसी आयी है’ हे मोहम्मद रफी, आशा भोसले व शमशाद बेगम यांच्या आवाजाने सजलेले गीत. १९५७ मधील ‘पैसा’ या चित्रपटात गीता दत्तने गायलेले ‘दीप जलेंगे दीप, दिवाली आयी हो...’,.
१९५८ मधील आशाने गायलेले ‘खजांची’ चित्रपटातील मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेले ‘आयी दिवाली आयी कैसे उजाले लायी’ अशी अनेक गीते ४० ते ६० च्या दशकात गाजली. १९५९ मध्ये एस. एस. वासन यांमया ‘पैगाम’ चित्रपटातील ‘कैसी दिवाली मनाए हम लाला, अपना तो बारा महिने दिवाला’ हे जॉनी वॉकर वर चित्रित झालेले गीत कामगार वर्गाच्या स्थितीवर भाष्य करणारे ठरले. १९६१ मध्येही दिवाळीवरील दोन गाणी गाजली. ‘नजराना’ चित्रपटातील ‘मेले है चिरागोंके रंगीन दिवाली है, महका हुवा गुलशन है हंसता हुआ माली है’, तर दुसरे ‘एक वो भी दिवाली थी, एक ये भी दिवाली है...’ ही एकाच चित्रपटातील परंतु, भिन्न भाव प्रकट करणारी गीतेही बरीच लोकप्रिय झाली. १९६२ मधील ‘हरियाली और रास्ता’ या चित्रपटातील मुकेश आणि लताजीचे- ‘लाखो तारे आसमान मे एक मगर ढुँढे ना मिला, देखके दुनियाकी दिवाली दिल मेरा चूपचाप जला...’ हे गीत तर आजही खूप लोकप्रिय आहे.
६० नंतरही दिवाळीचा हा संगीतमय प्रवास सुरूच राहिला. १९७३ मधील धमेंद्रच्या ‘जुगनू’, ‘छोटे छोटे नन्हेमुन्हे प्यारे प्यारे रे दीप दिवाली के...’ पासून ‘दीपावली मनाए सुहानी...’ पर्यंत व ‘शहरके लडकियोंके पिछे...’ पर्यंत, व ‘आयी दिवाली...’ पासून, ‘मेरे साँसोमें तू है समाया....’ पर्यंत दिवाळी विविध रुपात साजरी झालेली रुपेरी पडद्यावर पहावयास मिळाली. चित्रपटात जरी दिवाळीचे स्वरुप बदलत गेले असले तरी, एक मात्र नक्की की एकात्मतेचे सुंदर उदाहरण ठरलेल्या व मनाचा अंधकार दूर सारून आशेचे दीप प्रज्वलित करणाऱ्या या सणात, ‘ज्योत से ज्योत जगाके चलो, प्रेम की गंगा बहाते चलो...’ म्हणत क्षणभंगुर जीवनाला अधिकाधिक सुखकर करण्याचे सामर्थ्य आहे, हेच विविध चित्रपटांच्या माध्यमातून आजवर अधोरेखित झाले आहे.
(लेखिका नामवंत सिनेभाष्यकार आहेत.)