कणा मोडला तरी चालेल, पण...

राज-कथा

Story: संजय ढवळीकर |
10th November 2018, 09:47 am
कणा मोडला तरी चालेल, पण...


...........................
‘‘हायकमांडसमाेर वाकून वाकून राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना एवढी सवय झाली आहे की वाकून त्यांच्या पाठीचा कणा मोडला आहे. स्वाभिमान गमावून हायकमांडकडे हांजी-हांजी करणारे हे नेते राज्याच्या हिताचे निर्णय कसे काय घेणार? बॅगांचे राजकारण करणारे दिल्लीतील हायकमांड आम्हाला नको. आमच्या हिताचे निर्णय आम्ही आता इथेच घेणार...’’
राष्ट्रीय काँग्रेसमधील धडाडीचे तरुण नेते गाेवर्धन भाटकार यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा धाडसी​ निर्णय घेतला होता. धाडसी कारण गेले दशकभर ज्या पक्षात त्यांनी काम केले, ज्या पक्षाच्या विचारधारेशी त्यांचे पटले, जो पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी घाम गाळला, त्याच पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय गोवर्धन भाटकारांना नक्कीच सोपा नव्हता. परंतु ठरावीक स्थानिक नेत्यांनी त्यांच्यावर ही वेळ आणली खरी. जेवढे धडाडीत पुढे तेवढेच संयमात मागे हे भाटकारांचे मूळ रुप ठाऊक असल्यामुळे लुईस बार्रेटो आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी भाटकारांना लक्ष्य बनवण्याचे कारस्थान आखले. भाटकार आपल्याआपण पक्षाबाहेर गेल्यामुळे त्यांचे काम सोपे झाले.
दोन वेळा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसलेल्या परंतु दोन्ही वेळा मिळून मुख्यमंत्री म्हणून सहा महिन्यांची कारकिर्दही उपभोगता न आलेल्या लुईस बार्रेटोंसमोर भाटकार यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये चांगलेच आव्हान उभे केले होते. त्याआधी दशकभर बार्रेटो यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आपले नेतृत्व पद्धतशीरपणे रुजवण्यावर भर दिला होता. गुरुस्थानी असलेल्या डॉ. विल्सन डायस यांच्यावर त्यांनी आधी पक्षातून बाहेर जाण्याची वेळ आणली. फ्रँकलिन सिमॉईस हे दुसरे नेते बार्रेटो यांना किंचित सिनिअर, हायकमांडमधील आपल्या निकटवर्तीयांना हाताशी धरून पक्षसंघटनेत सिमॉईस यांचे महत्व कमी केले. त्याबरोबर नाराज होऊन सिमॉईसनी राष्ट्रीय काँग्रेस सोडून प्रादेशिक पक्ष स्थापन केला. तिसरे ज्येष्ठ नेते सिरील कॉन्सेसांव यांचीही बार्रेटोंनी अशीच वाट लावली.
आता राष्ट्रीय काँग्रेसमध्ये बार्रेटो हे दक्षिण गोव्यातील आणि ख्रिस्ती समाजातील एकमेव लोकप्रिय नेते उरले. उत्तरेत पुरुषोत्तम काणे, शिवानंद पर्येकर, उमाकात सावंत आदी नेते होते. परंतु, गाेव्यात राष्ट्रीय काँग्रेसला सत्तेत येण्यासाठी नेहमी दक्षिण गोवा आणि विशेषत: सालसेत तालुका माेठा हात देतो, ही बाब लक्षात घेता आगामी निवडणुकीत बार्रेटो यांच्या नेतेपदाच्या मार्गात येण्यासारखा एकही ख्रिस्ती नेता दक्षिण गोव्यात राष्ट्रीय काँग्रेसमध्ये उरला नव्हता.
अशा परिस्थितीत भाटकारांनी पक्षात अापले नेतृत्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली होती. बार्रेटो आणि त्यांच्या निकटवर्तीयांना भाटकार यांचा पक्षातील वाढता प्रभाव खुपत होता. मात्र भाटकारांचा कारभार धडाकेबाज आणि तरुणांना आपल्याभोवती जमवण्याची त्यांची हातोटी यामुळे त्यांच्याकडे पक्षात लोकप्रियतेबरोबरच जबाबदाऱ्याही येत गेल्या.
‘‘गाेवर्धनची प्रगती अशीच चालू राहिली तर एक दिवस तो प्रदेशाध्यक्षपदी बसेल आणि तुझे विधानसभेचे तिकीट कापेल. त्याअाधी सावध हो, लुईस. गाेवर्धनची भाटकारशाही पक्षात फार काळ चालवून घेऊ नकोस. हायकमांडला गाठ आणि त्याचा काटा काढायचे बघ.’’ बार्रेटोंचे सहाय्यक आणि जवळचे मित्र दामू मापारींनी आपल्या जिवलग मित्राला एक दिवस सल्ला दिला.
‘‘प्रदेशाध्यक्ष मीच बनणार आहे. दामू, तू बघतच राहशील आता माझे राजकारण. या भाटकारशाहीला कसे लोळवतो बघ.’’ आत्मविश्वासाने बार्रेटो बोलले.
राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक जवळ येताच बार्रेटोंनी दिल्लीला धाव घेतली. आपल्या निवडीची सारी व्यवस्था करून दोन दिवसांनंतर परतले. पक्षाच्या कारभारात उत्साहाचे वारे आणणाऱ्या गोवर्धन भाटकारांना प्रदेश कार्यकारिणीत मोठ्या प्रमाणावर पाठिंबा होता. पण निवडणुकीच्या दिवशी दिल्लीहून आलेल्या हायकमांडच्या निरीक्षकांनी पणजीतील पक्षकार्यालयात बैठकीत सीलबंद पाकीट उघडले, त्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून लुईस बार्रेटोंचे नाव होते. बहुतांश सदस्य नाराज झाले, तरी निवडणुकीविना बार्रेटो यांनी बाजी मारली होती.
भाटकारांच्या मनात हायकमांडबाबतच्या नाराजीची पहिली ठिणगी तिथे पडली. पुढे अशा ठिणग्या वरचेवर पडू लागल्या. विधानसभा निवडणूक जवळ आली. आतापावेतो ज्या प्रकारे राजकारण चालले आहे त्यावरून लुईस बार्रेटो यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय काँग्रेस आपल्याला उमेदवारी नाकारून अवमानित करणार आणि यासाठी ते हायकमांडचा हवा तसा वापर करून घेणार हेही भाटकारांच्या लक्षात आले होते.
धडाकेबाज निर्णय घेण्याच्या आपल्या परंपरेला जागून गोवर्धन भाटकारांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. ‘गोवा मूव्हर्स’ हा प्रादेशिक पक्ष स्थापन करून राष्ट्रीय काँग्रेसला पर्याय निर्माण करण्याचे त्यांनी ठरवले. परंतु कोणत्याही परिस्थितीत उजव्या विचारसरणीच्या भारतीय राष्ट्रहित पक्षाच्या सोबत जाणार नाही, हे स्पष्ट करण्यावर त्यांनी भर दिला. भारतीय राष्ट्रहित पक्षाचे नेते कमलाक्ष केरकर यांच्यावर तर गेल्या काही वर्षांत त्यांनी जहरी टीका केली होती. राष्ट्रीय काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते कमलाक्षदादांच्या विरोधात मूग धरून गप्प बसले असताना एकटे भाटकार स्पष्ट बोलण्याची हिंमत दाखवतात, यामुळे त्यांची लोकप्रियता कमालीची वाढली होती.
राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे झालो तरी भारतीय राष्ट्रहित पक्षाबरोबर आपण कधीच जाणार नाही असा विश्वास त्यांना स्वत:ला होताच, त्याहून अधिक विश्वास त्यांच्या मतदारांना होता.
विधानसभा निवडणूक आली. भारतीय राष्ट्रहित पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस यांच्याबरोबरीने सूर्यकांत लोटलीकरांचा राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्ष, गोवर्धन भाटकारांचा गोवा मूव्हर्स पक्ष असे प्रादेशिक व इतर पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीत उतरले. बहुमत कोणालाच मिळाले नसले तरी बार्रेटोंनी राष्ट्रीय काँग्रेसला बहुमताच्या जवळ आणले होते. तीनच आमदार मिळवून सरकार स्थापन करण्याचे सोपे आव्हान त्यांच्यासमोर होते. परंतु राष्ट्रीय काँग्रेस सत्तेत येणे आणि त्यातही बार्रेटो मुख्यमंत्री बनणे हा भाटकारांचा सर्वांत मोठा पराभव ठरला असता. लोटलीकरांनाही काँग्रेसबरोबर जाण्याची इच्छा नव्हती.
राजकारणाने इथे वेगळेच वळण घेतले. लोटलीकर आणि भाटकार यांनी एकत्र येऊन प्रादेशिक आघाडी बांधली आणि थेट कमलाक्षदादांना गाठले. ‘तुम्ही सरकार बनवा, आम्ही बरोबर येतो’ असा स्पष्ट प्रस्ताव दिला. सर्वांत मोठा पक्ष नसूनही भारतीय राष्ट्रहित पक्षाने प्रादेशिक पक्षांच्या सहकार्याने सरकार बनवले. बार्रेटोंच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावून घेतला खरा. परंतु या धांदलीत ज्या पक्षाला आपण शत्रू क्रमांक एक मानले होते आणि त्यांच्याबरोबर न जाण्याचा शब्द मतदारांना दिला होता, त्यांच्याच सरकारात ज्येष्ठ मंत्रिपद भाटकारांनी घेतले!
राष्ट्रीय काँग्रेसमध्ये भाटकारांना बार्रेटो महत्त्वाच्या पदापासून डावलत असत. आता भाटकारांनी बार्रेटोंना सत्तेत सहभागी हाेण्यापासून डावलले. पण मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी राहिलेल्या ख्रिस्ती मतदारांना ही प्रतारणा वाटली. तिथेच भाटकारांच्या राजकीय आलेखाची घसरण सुरू झाली.
राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांनी लढत दिली लुईस बार्रेटो आणि त्यांच्या अनुयायांशी. भाटकारांच्याच भाषेत बार्रेटो आणि त्यांचा गट होता कणा मोडलेल्या नेत्यांचा. स्वत:चे स्वतंत्र मत नसलेल्या नेत्यांचा. पण नवीन सरकारात त्यांची गाठ होती कमलाक्षदादांशी. पक्षात आणि सरकारात ‘सब कुछ दादा’ अशी तिथे स्थिती. नवीन प्रकल्पाबाबतचा निर्णय असो अथवा मंत्रिमंडळ बैठकीतील चर्चा, कमलाक्षदादांना जे आणि जेवढे हवे ते आणि तेवढेच बोलायचे, ते आणि तेवढेच होणार, माना डोलावण्यापलिकडे इतरांना विशेष वाव नाही हे भाटकारांच्या लक्षात येऊ लागले. पण अस्वस्थ बनून चालणार नव्हते. एक दोर आधीच तोडला होता. राजकीय अस्तित्व टिकवून भविष्य घडवण्यासाठी सत्तेला धरून राहणे गरजेचे होते.
भाटकारांच्या आक्रमक पण चंचल राजकीय निर्णयप्रक्रियेचा अभ्यास केलेल्या कमलाक्षदादांनी वेगळीच चाल रचली. मंत्री बनवलेल्या गोवा मूव्हर्सच्या रुपेश अडवलपालकर आणि विश्राम पार्सेकर या दोन आमदारांना आगामी निवडणुकीत भारतीय राष्ट्रहित पक्षाची उमेदवारी देण्याची हमी देऊन त्यांना गोवा मूव्हर्सपासून दूर करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली. एकदा निवडून येण्यासाठी गोवा मूव्हर्स ठीक आहे, परंतु राजकारणात दीर्घकाळ राहायचे असेल तर भारतीय राष्ट्रहित पक्षाच्या आधाराचीच गरज आहे हे दादांनी बहुजन समाजातील या नेत्यांना पटवून दिले.
रुपेश अडवालपालकर आणि विश्राम पार्सेकर गोवा मूव्हर्समध्ये नावापुरतेच राहिले होते. पुढील निवडणुकीत ते भारतीय राष्ट्रहित पक्षाचे उमेदवार असतील हे ठरून गेले होते. आता गोवा मूव्हर्समध्ये खऱ्या अर्थाने राहिले होते फक्त गोवर्धन भाटकार आणि त्यांचे जवळचे चार नेते. राष्ट्रीय काँग्रेसचा घाई-गडबडीत त्याग करून राजकीय कारकिर्दीचा एक दोर त्यांनी आधीच कापून टाकला होता. आता कमलाक्षदादांनी भाटकारांची हतबलता हेरून राजकीय डाव साधत भाटकारांना हात न लावता त्यांचा पक्ष पाेखरला, साथीदारांना आपल्या बाजूने वळवले आणि भाटकारांना एकाकी पाडले, तरी ते काही करू शकत नव्हते.
अशा प्रसंगी खरे तर भाटकार धडाक्यात निर्णय घेऊन सरकारातून बाहेर पडले असते. परंतु, या टप्प्यावर मोडेन पण वाकणार नाही, असे म्हटल्यास आपल्या राजकीय कारकिर्दीची अखेर इथेच होऊ शकेल याची त्यांना कल्पना होती. ना घर का ना घाट का अशी त्यांची अवस्था होऊ शकली असती. ताठरपणा करायचाय काय, कणा मोडला तरी चालेल, पण...
गत चुकांवर विचार करण्याची वेळ गोवर्धन भाटकारांवर आयुष्यात प्रथमच आली होती.
........................
(लेखक ‘गोवन वार्ता’ चे संपादक आहेत.)
......................
(या कथेतील सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक असून वास्तवाशी त्यांचा कोणताही संबंध नाही.)