स्मरणातला पीएल

परामर्श

Story: श्रीकांत मोघे |
10th November 2018, 09:45 am
स्मरणातला पीएल


--
पु. ल. देशपांडे. अफाट व्यक्तिमत्त्व. विनोदाला वेगळी उंची, वेगळी परिमाणं देणारी बहुआयामी व्यक्ती. पु. लं. च्या प्रत्येक विनोदाने, कोटीने, नाटकाने, गाण्याने, चित्रपटाने मराठी माणसाच्या निसर्गदत्त घनगंभीर चेहऱ्यावर हास्याची लकेरच नव्हे, तर गडगडाटी हास्याचे मेघ दाटून आणले आहेत. त्याच्याच शब्दात सांगायचं तर जन्म आणि मृत्यू या दोन टोकात पकडून माणसाच्या जगण्यात नियती जी थट्टा करते, मस्करी करते, फसवणूक करते ती एकदा लक्षात आली की, आपल्याभोवती जमलेल्या मंडळींची जमेल तेव्हा, जमेल तितकी आणि जमेल तशी हसवणूक करण्यापलिकडे आपल्या हातात काही रहात नाही. आयुष्य हे असंच आहे. पीएलसारखा एखादा मनमौजी आपल्याच नव्हे तर अवघ्या समाजाच्या मनावरचा ताण हलका करतो.
तेव्हाचा मध्यमवर्गीय माणूस वेगळा होता. एकीकडे तो समाजाचा कणा होता, आधार होता. पण तो झापडबंद आयुष्य जगत होता. सकाळी साध्या वरणाबरोबर फोडणीचा भात आणि रात्री फोडणीच्या वरणाबरोबर साधा भात खाऊन कवडी कवडी जोडायची आणि शेवटी ‘श्रमसाफल्य’ सारखं नाव देऊन घर बांधायचं यातच इतिकर्तव्यता मानणारा हा वर्ग पीएलच्या कोपरखळ्यांनी वेगळा विचार करू लागला. तो स्वत:बद्दल बाळगलेल्या भ्रामक समजुतींमधून बाहेर पडला. त्याच्या विचारांची दिशा बदलवून टाकण्यास पीएलचे वरकरणी साधे वाटणारे पण मध्यमवर्गीयांच्या परिस्थिती आणि मानसिकतेवर परखड भाष्य करणारे विनोद कारणीभूत ठरले. त्याच्या विनोदाने त्यांच्या जीवनविषयक संकल्पनांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला. त्याने अगदी हसत हसत मध्यमवर्गीयांच्या खत्रुडपणावर कोरडे ओढले. पण त्यामध्ये कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता तर गंभीर प्रवृत्ती त्यागून आयुष्याचा मनमुराद आनंद लुटण्याचं बाळकडू पाजण्याचा मानस होता. म्हणूनच त्यांच्या विनोदाने कधी कोणी व्यक्ती, समूह अथवा समाज दुखावला नाही. उलटपक्षी त्यातून त्यांना जगण्याचं भान मिळत गेलं.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काही काळात समाजाचं नेतृत्व या मध्यमवर्गीयांकडेच होतं. असं असलं तरी त्यांनी कधी श्रीमंती पाहिली नव्हती. समोर आलेल्या सुखाला हसत सामोरं जाण्याची त्याची प्रवृत्ती नव्हती. यश अथवा अपयशाला थेट भिडण्याची क्षमता नव्हती. पीएलने सर्वप्रथम ही प्रवृत्ती हेरली आणि त्यावर भाष्य केलं. त्याच्या या भाष्यानं एका पिढीचंच नव्हे, तर दोन-चार पिढ्यांचं तत्त्वज्ञान बदलून टाकलं, जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. तोपर्यंत मराठी माणसाकडे आवडत्या मुलीला ‘तू मला आवडतेस’ असं म्हणण्याचीही क्षमता नव्हती. तो देवदास होण्यातच धन्यता मानत असे. पराभूत असण्यात गौरव आहे अशी काहीशी त्याची धारणा होती. पीएलने मध्यमवर्गीयांच्या या स्वभाववैशिष्ट्यांवरही हसरा प्रहार केला.
सक्ती पाप आहे, बळजबरी पाप आहे, परिणामांची जबाबदारी नाकारण्यात पाप आहे पण खुशीत पाप नाही असं तत्त्वज्ञान पीएलचा काकाजी मांडतो तेव्हा त्यातून जगण्याचा एक नवा आयाम आणि भिडस्तपणाला छेद देण्याचा संदेश स्पष्ट दिसतो. पीएलची वृत्ती खुशमिजास होती. तो दिलेर होता. आपल्या वृत्तीतील हे गुण समाजापर्यंत पाझरवण्याचा उद्देश स्पष्ट होता. यात त्याला काही अंशी तरी यश आलं असं आपण म्हणू शकतो. मी केलेलं पीएलचं पहिलं नाटक म्हणजे ‘अंमलदार’. त्याच्या प्रत्येक नाटकाचा अनुभव अनोखा आणि खूप वेगळा होता. पण ‘वाऱ्यावरची वरात’ची बातच काही वेगळी. स्टेजवर नाचणं, धुमाकूळ घालणं हा प्रकारच या नाटकाने आणला. त्यापूर्वी कोणीही हा प्रकार केला नव्हता. किंबहुना, मराठी समाजाला हा एक प्रकारचा सांस्कृतिक धक्का होता. म्हणूनच या नाटकाने इतिहास घडवला. या वेळच्या असंख्य आठवणी आजही मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेल्या आहेत. स्टेजवर कसं नाचावं असा प्रश्न पडला असता पीएलने मला शम्मी कपूरचा डान्स पहायला सांगितलं होतं. आम्हा मंडळींना अॅडिशन्स घेण्याची पूर्ण मुभा होती. त्यामुळे ‘वरात...’ करताना खूप मजा यायची.
असाच ‘वाऱ्यावरची वरात’ चा प्रयोग होता. त्यात मधू कदम माझ्याबरोबर काम करत होता. त्याचं लग्न झालं होतं, दोन मुलंही होती. नाटकाचे केवळ आठ प्रयोग झाले होते तेव्हाची ही गोष्ट... तो प्रयोग संपल्यावर त्याने सर्वांना पेढे वाटले. आम्हाला आश्चर्य वाटलं. साहाजिकच हातावर पेढा घेताना पीएलने, ‘पेढे कसले?’ हा प्रश्न केला. तेव्हा तो लाजत म्हणाला, ‘मला मुलगा झाला.’ पेढा तोंडात टाकत भाई पुटपुटला, ‘कदम कदम बढाए जा...’ साहजिकच हास्याचा चित्कार उडाला. पीएलची कोटी अशी दुसऱ्या क्षणी असायची. तो कोणाचाही शब्द खाली पडू देत नसे. त्याने सुनीतालाही सोडलं नाही. तिच्यावर कॉमेंट करण्याची एकही संधी तो सोडत नसे. सुनीताच्या सतत उपदेश करण्याच्या सवयीमुळे तो तिला देशपांडे नव्हे तर ‘उपदेशपांडे’ म्हणायचा. सुनीता आणि तिचा भाचा समोरासमोर रहायचे. म्हणजेच ठाकूर आणि देशपांडे एकमेकांचे शेजारी होते. यावर आपला पत्ता सांगताना पीएल गमतीने म्हणायचा, ‘आम्ही ठाकूरद्वारासमोर राहतो.’ सुरूवातीला नवख्यांना काही समजायचं नाही. मग नंतर कोणीतरी, त्यांच्यासमोर ठाकूर राहतात असं सांगायचं. तोपर्यंत पीएलच्या चेहऱ्यावरचे ते मिश्किल भाव पाहण्यासारखे असायचे. सुनीताला समाजकार्याची विलक्षण आवड होती. ती काटकसर करायची आणि रक्तदान शिबिरं आयोजित करण्यासाठी अथवा रक्तपेढ्यांना आर्थिक मदत करायची. यावर पीएल ‘ती रक्तपिपासू आहे’ असं इतकं सहज म्हणून जायचा की हसून हसून समोरच्याची मुरकुंडी वळायची. अशा कोटीबाज स्वभावामुळे पीएल आजूबाजूला असताना कधीच कोणी तणावग्रस्त अवस्थेत राहू शकत नसे. एखाद्याशी भांडणं, रुसवे-फुगवे, अबोला हे शब्दच पीएलच्या शब्दकोशात नव्हते. तो असला की वातावरणात एक वेगळाच उत्साह भरुन रहायचा. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू विलसत रहायचं.
पीएलच्या ‘तुका म्हणे आता’ नाटकावेळच्या आठवणीही खूप वेगळ्या आहेत. १९४७-४८ चा तो सुमार. त्याचं हे पहिलं नाटक. खरं तर विषय गंभीर. पण त्याआधीच विनोदी लेखक अशी प्रसिद्धी झाल्यामुळे नाटक लोकांच्या पचनी पडलं नाही आणि पहिल्या प्रयोगालाच पडलं. त्या नाटकात वसंत नावाचे तीन कलाकार काम करत होते. खरं तर आपलं पहिलंच नाटक पहिल्याच प्रयोगाला पडल्यानंतर कोणीही निराश झालं असतं. दु:खी चेहऱ्याने बसून राहिलं असतं. पण असं वागेल तर तो भाई कसला! तो म्हणाला, ‘तीन-तीन वसंत आणि एक संत असूनही आपलं नाटक पडलं...!’ असा हा भाई... नाटक पडलं हे सांगतानाही त्याचा चेहरा हसरा होता. खरं तर ‘तुका म्हणे आता’ मध्ये पीएलने खूप वेगळा विषय हाताळला होता. तुकाराम महाराजांनी अभंग बुडवले आणि इंद्रायणी नदीने ते आणून दिले, या आख्यायिकेवर त्याने वास्तववादी दृष्टिक्षेप टाकला होता. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाप्रित्यर्थ स्मरणांजली...
(लेखक ज्येष्ठ रंगकर्मी आहेत.)