तंत्रज्ञान : मुलांचे ‘बेस्ट फ्रँड’

कव्हर स्टोरी

Story: मेखला साळकर |
10th November 2018, 09:38 am
तंत्रज्ञान : मुलांचे ‘बेस्ट फ्रँड’


-
भीतीने सौरभच्या अाईचे हात कापत होते. एेन रात्रीच्या वेळी अगदी निर्जन जागेत गाडी बंद पडली होती. कुणाला फोन करावा तर जागेचं नेमकं नावही ठाऊक नव्हतं. इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या सौरभनं हे पाहिलं व शांतपणे अाईकडून मोबाईल घेतला. व्हाॅटस्अॅप करून अापल्या बाबांना त्यानं अापलं ‘लोकेशन’ पाठवलं. मग त्यांना फोन करून सगळी हकीकत सांगितली व ‘अाम्हाला न्यायला या’ असंही सांगितलं. रोज मोबाईलवर वेळ वाया घालवतो म्हणून बोलणी खाणाऱ्या सौरभनं अाज त्याच मोबाईलच्या मदतीनं ही कामगिरी केली व अाईच्या जीवात जीव अाला!
सौरभच्या अाईसारखे अनेक पालक अशाच अनेक गोष्टी मला कौतुकाने सांगतात. ‘मला तर धड त्या मोबाईलवरून फोन सुद्धा करता येत नाही, पण पोरानं गेम्स डाऊनलोड करून खेळायला सुरुवात केलीही! पण, मग तेच पालक घरी जाऊन त्या पोरावर ‘तो मोबाईल खाली ठेव अाणि बस अभ्यासाला. दिवसभर नुसता गेम्स खेळत असतो. चल उठ अाता’ असं का अोरडतात?
माझ्या अोळखीची एक छोटी एकदा माझ्या कानात कुजबुजली होती, ‘ताई, अापण कसं, अगदी सहज फोन, इंटरनेट वापरतो. मोठ्यांना तसं जमत नाही ना, म्हणून ते जळतात अापल्यावर!’ अाता ही अतिशयोक्ती असली तरी एवढं मात्र खरं की एकविसाव्या शतकात जन्मलेल्या मुलांच्या दैनंदिन अायुष्यात तंत्रज्ञानाचा वाटा मोठा अाहे. इतरांचं सोडा, मी स्वत: माझ्या काॅलेजच्या सगळ्या ‘नोट्स’ माझ्या मोबाईलवर सेव्ह करते. त्यामुळे वेळ वाचतो, झेराॅक्सचे पैसे वाचतात, नोट्स हरवण्याची शक्यता नाहीशी होते. थोडक्यात काय तर काळाप्रमाणे नव्या पिढीचा तंत्रज्ञानासंबंधीचा दृष्टीकोन बदलत जातो. पण अामच्या पालकांची पिढी...?
मुलांच्या हातामध्ये मोबाईल, डोळ्यांसमोर टीव्ही, मांडीवर लॅपटाॅप किंवा कानांमध्ये इयरफोन दिसले की बहुतेक पालकांच्या कपाळावर अाठ्या पडतात. कारण काय? तर इंटरनेट किंवा टीव्हीमुळे वेळ वाया जातो. फालतू विनोद, भलतेच व्हिडीयो, अपघातांचे फोटो पाहून पोरांवर विपरीत परिणाम होतो. हो, मान्य अाहे. मग यावर उपाय काय? मोबाईल हिसकावून घेणे, टीव्हीवर बंदी अाणणे अाणि जबरदस्तीनं पोराला पुस्तक वाचायला बसवणे? अहो, कुठल्या काळात जगतोय अापण?
ज्या क्षणी पोराकडून माहिती किंवा कुठलेही तंत्रज्ञान, उपकरण किंवा कुठलीही वस्तू हिसकावून घेतली जाते, त्या क्षणी त्याला त्याविषयी अधिक अाकर्षण वाटायला लागतं. उदाहरणार्थ, लाडवांचा डबा टेबलावर असला तर त्याचं काही वाटत नाही, पण तोच जर अाईनं उंच कपाटात लपवून ठेवला तर लाडू खायची अनावर इच्छा होते! तंत्रज्ञानाचंही तसंच असतं. खरं म्हणजे, पालकांच्या नजरेअाड जेव्हा मूल इंटरनेट किंवा फोन वापरते, तेव्हा तंत्रज्ञानाचा दुरुपयोग होण्याची शक्यता कितीतरी पटीनं वाढते.
बरं मग, या तंत्रज्ञानामुळे मुलांच्या मनावर होणारे परिणाम? असं विचारणाऱ्या पालकांनी विचार करायला हवा, अापल्या पोटचा गोळा असलेल्या मुलावर अापण जेव्हा प्रभाव टाकू शकत नाही, तेवढा प्रभाव एक निर्जीव फोन अथवा कंप्युटर टाकतो? मग खरा दोष त्या तंत्रज्ञानाचा की पालक म्हणून अापला?
मुलं तंत्रज्ञानाच्या अाहारी गेली अाहेत, असा अारोप करणारी माणसं स्वत:च्याच संकुचित विचारसरणीच्या अाहारी गेलेली असतात. अहो, अाज तंत्रज्ञानामुळे मुलांसमोर अक्षरश: ज्ञानाचं भांडार उघड झालं अाहे. अापल्याला जसं शिक्षणासाठी तळमळावं लागलं तसं मुलांना नाही करावं लागत याची जाणीव पालकांना कधी येणार? प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत, अाकलन शक्ती वेगळी. ते लक्षात घेऊन अाज अनेक अॅप्स अाणि वेबसाईट्स तयार झाल्या अाहेत. समकालीन साहित्य, खेळ, राजकारण या बद्दलच्या बातम्या मुलांना घरबसल्या मिळतात. बुद्धीला चालना देणाऱ्या गेम्स त्यांना खेळायला मिळतात. अाणि हे सगळं त्यांचे पालक त्यांच्या हातातून हिसकावून घेतात? टीव्हीला अापण मोठ्या तुच्छपणे ‘इडियट बाॅक्स’ म्हणतो. मुलांना जगभरातल्या महत्त्वाच्या, मजेशीर, ज्ञान वाढवणाऱ्या गोष्टी सांगणारा तो टीव्ही इडियट की टीव्ही वर नेमकं काय पहावं हे मुलांना न सांगणारे पालक इडियट? (म्हणजे सुमार बुद्धीची व्यक्ती.)
खरं म्हणजे अापल्या प्रेमळ, मायेच्या उबेपेक्षा मुलांना तंत्रज्ञानाचं कोरडं, तांत्रिक जग जवळचं वाटतं ही किती भयानक गोष्ट अाहे! पण, ‘तंत्रज्ञान- हटाअो’ अांदोलन हा त्याच्यावरचा उपाय नव्हे!
‘मुलांना काय कळतं त्यातलं?’ असं जेव्हा अापण म्हणतो, तेव्हाच अापलं चुकतं. मुलांना भावना समजतात हे मान्य करा. अापल्या व्यस्त दिनक्रमातून मुलांसाठी थोडा वेळ काढा. त्यांना जवळ घ्या, त्यांच्याशी बोला अाणि समजावा त्यांना की इंटरनेटवर अशा काही गोष्टी असतात ज्या तुला अाता नाही समजणार. मोठी किंवा मोठा होशील तेव्हा कळतील. पण तोपर्यंत या- या गोष्टी तुला वापरता येतील.
हो! असं म्हणून मुलं ऐकणार अाहेत का? नाही कदाचित, पण मग त्यांना सांगा की, ‘हे बघ, तुझ्यावर विश्वास ठेवून हा फोन, लॅपटाॅप तुला देतोय. तू त्याचा गैरवापर करणार नाहीस, कारण अाम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास अाहे’ अहो हे एेकून तुमच्या पोराला एवढा अभिमान वाटेल की कधी त्या फोनचा वाईट वापर करायचा विचारही तो करणार नाही!
अाणि तरीही जर मूल दिवसभर तंत्रज्ञानामध्ये गुंतून वेळ वाया घालवत असेल तर एक रामबाण उपाय सांगते. अाॅफिसमधून घरी अाल्यावर स्वत:चा फोन बंद करा. टी. व्ही., लॅपटाॅपकडे बघूही नका. पोराकडे जा अाणि अापल्या दिवसाविषयी बोला. मग पाहू, पोर कितीवेळ इंटरनेटला चिकटतंय!
थोडक्यात काय तर अाज तंत्रज्ञान मुलांचं ‘बॅस्ट- फ्रॅँड’ बनलंय. त्याची जागा तुम्ही-पालकांनी घ्यावी. एकदा का अाई-बाबा पोरांचे ‘बॅस्ट फ्रँड’ बनले की तंत्रज्ञानाला ‘चान्स’ च मिळायचा नाही! काय, पटतंय ना?
(लेखिका विद्यार्थिनी आहे.)