वर्षात सर्वाधिक धावा करण्याची विराटला संधी

दक्षिण आफ्रिकेचा फाफ ड्युप्लेसिस ८१४ धावा काढून पहिल्या स्थानी


22nd August 2017, 08:36 pm
वर्षात सर्वाधिक धावा करण्याची विराटला संधीकोलंबो :यजमान श्रीलंकेविरुद्ध भारताने एकदिवसीय मालिकेची सुरुवात अपेक्षेप्रमाणे विजयाने केली. आता या मालिकेत कर्णधार विराट कोहलीकडे २०१७मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा काढून पहिल्या क्रमांकावर येण्याची संधी आहे.
या वर्षी सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेचा फाफ ड्युप्लेसिस पहिल्या स्थानावर आहे. ड्युप्लेसिसने या वर्षी १६ सामन्यांमध्ये सर्वाधिक ८१४ धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट आहे. रूटने १४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७८५ धावा केल्या आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानावर भारताचा कर्णधार विराट कोहली आहे. कोहलीने या वर्षी आतापर्यंत १४ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७६९ धावा केल्या आहेत.
भारत आणि श्रीलंके​विरुद्ध अजूनही ४ सामने बाकी आहेत व कोहलीकडे या मालिकेत या वर्षात एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याची संधी आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या रूटपासून कोहली सध्या १६ धावांनी पिछाडीवर आहे तर पहिल्या स्थानावर असलेल्या ड्युप्लेसिसपासून तो केवळ ४६ धावांच्या अंतरावर आहे.
तर कोहलीच राहणार टॉपवर
जर या मालिकेत कोहली दोन्ही फलंदाजांना मागे टाकून पहिल्या स्थानावर काबिज होतो तल रूट आणि ड्युप्लेसिसला त्याला मागे काढणे कठीण जाणार आहे. याचे कारण म्हणजे इंग्लंडला आता १९ सप्टेंबर तर आफ्रिकेला १५ ऑक्टोबर रोजी एकदिवसीय मालिका खेळायची आहे व यानंतर त्यांची एकही एकदिवसीय मालिका नाही.
दुसरीकडे कोहलीला या मालिकेत चार एकदिवसीय सामने खेळावे लागणारच परंतु पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर येत आहे व ते या दौऱ्यात भारताविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहेत. या कारणामुळे कोहलीला धावांच्या बाबतीत पहिल्या स्थानावर कायम राहण्याची संधी आहे.
फाफ ड्युप्लेसिसला मागे काढण्यात कोहलीला अडचण होणार नाही कारण विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विराटने श्रीलंकेविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात ७० चेंडूत नाबाद ८२ धावांची खेळी केली होती. या सामन्यात भारताने लंकेवर ९ गड्यांनी विजय मिळवला होता. टीम इंडियाचा लंकेविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना २४ ऑगस्ट रोजी पल्लेकेलेमध्ये असणार आहे.
खेळाडू सामने धावा सरासरी १००/५०
फाफ ड्युप्लेसिस १६ ८१४ ५८.१४ २/५
जो रूट १४ ७८५ ७१.३६ २/५
विराट कोहली १४ ७६९ ९६.१२ २/६
इयान मॉर्गन १५ ७५२ ५३.७१ ३/३