विद्यार्थ्यांमध्ये त्वचारोग; पालक चिंताग्रस्त

सत्तरी, डिचोली तालुक्यांत त्वचारोग निवारण मोहीम राबविण्याची मागणी

10th November 2018, 06:33 Hrs

वार्ताहर । गोवन वार्ता 

केरी-सत्तरी   : सत्तरी व डिचोली तालुक्यांतील केरी, मोर्ले, पर्ये, सांखळी आदी भागांतील विद्यार्थ्यांमध्ये  त्वचारोगाचे प्रमाण वाढू लागल्याने पालक तसेच शिक्षक चिंतेत पडले आहेत. अनेक विद्यार्थी सध्या त्वचारोगासंदर्भातील दुखण्याने त्रस्त असून दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चालल्याने आरोग्य विभागही अस्वस्थ झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य खात्याने विद्यालयांमध्ये त्वचारोग तपासणी सुरू करावी, अशी मागणी येथील काही विद्यालय प्रमुखांनी केली आहे.

सत्तरी व डिचोली तालुक्यांत विद्यार्थ्यांमध्ये त्वचारोगाचे प्रमाण वाढत असल्याच्या वृत्ताला सांखळी प्राथमिक  आरोग्य केंद्राच्या डॉक्टर तथा राष्ट्रीय बाल स्वास्थ योजनेच्या विभाग प्रमुख डॉ. आर्या पित्रे यांनी दुजोरा दिला. नुकतेच केरी सत्तरी येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची  तपासणी करण्यात आली. या तपासणीवेळी डॉ. पित्रे यांच्याशी या प्रतिनिधीने संवाद साधला असता त्यांनी विद्यार्थ्यांच्या  आरोग्यासंदर्भातील विविध पैलुंवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांमध्ये  त्वचारोगाचे वाढते प्रमाण तसेच केस गळणे आदींबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. सांखळीतील एका विद्यालयात केसांवर परिणाम झालेले बरेच  विद्यार्थी सापडल्याची माहिती डॉ. पित्रे यांनी दिली.त्वचारोगाचे सर्वाधिक प्रमाण केरी भागात आढळत असल्याची माहिती डॉ. पित्रे यांनी दिली आहे. अनेक विद्यार्थी सध्या त्वचारोगाने त्रस्त असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दूषित पाण्यामुळे हा आजार बळावत असावा, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली. विशेष म्हणजे या त्वचारोगामुळे पालकवर्ग दडपणाखाली आहे. अनेकजण मुलांना शाळेत पाठविण्यासही बाचकत आहेत.

या भागांत वाढत्या त्वचारोग व इतर आजारांना येथील दूषित पाणी कारणीभूत असल्याचा दावा स्थानिक करीत आहेत. हल्लीच वाळवंटी नदी पूर्णपणे  दूषित झाल्याचा अहवाल केंद्रीय पर्यावरण मंडळाने राष्ट्रीय हरित लवादाला दिला होता. हेच दूषित पाणी सध्या येथील जलशुद्धीकरण प्रकल्पामधून पुरविण्यात येत आहे. हे पाणी जरी शुद्ध करून पाठविले जात असले तरी, त्याबाबत साशंकता आहे. केरी भागात कच्चे पाणी पिण्यासाठी पुरवण्यात येते. येथील विहिरी दूषित झाल्याचा संशय आहे. त्यामुळे पाण्याचीही तपासणी करावी, अशी मागणी या भागांतून होत आहे.

त्वचारोग हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे तो एका विद्यार्थ्याकडून दुसऱ्या  विद्यार्थ्याकडे  फैलावत असल्यामुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. त्यामुळे आरोग्य खात्याने या भागात विशेष तपासणी मोहीम राबविणे आवश्यक आहे. सरकारने यात लक्ष घालावे. 

— गोपीनाथ गावस, 

प्रमुख शिक्षक, विवेकानंद ज्ञान मंदिर हायस्कूल, केरी-सत्तरी 

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

‘केवायसी’ पूर्ततेसाठीच पैसे काढण्यावर निर्बंध

टपाल खात्याकडून ट्वीट संदेशाद्वारे स्पष्टीकरण Read more