‘भाजप सरकार केवळ कॅसिनोंसाठी उपलब्ध’

आम आदमी पक्षाची घणाघाती टीका


10th November 2018, 06:32 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता            

पणजी : गोव्यातील भाजप सरकार नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी उपलब्ध नाही. मात्र, कॅसिनो व्यावसायिकांसाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजप सरकार राज्यात कॅसिनो विकृतीला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे गोवा राज्य संयोजक एल्विस गोम्स यांनी केला.

आम आदमी पक्षाने नुकतीच पणजीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत कॅसिनो मुद्द्यावरून गोम्स यांनी सरकारवर कडाडून टीका केली. यावेळी सिद्धार्थ कारापूरकर आणि राॅक मास्कारेन्हस उपस्थित होते.

सरकारने एकेकाळी मांडवी नदीला कॅसिनोमुक्त, करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, मांडवीतून दुरुस्तीसाठी गेलेल्या कॅसिनोच्या जागी चक्क तिप्पट मोठ्या कॅसिनोला परवानगी दिली आहे. 

या व्यतिरिक्त मोपा विमानतळाजवळ ‘कॅसिनो क्षेत्र’ करण्यासाठी सरकारने जमीन संपादित केली आहे. असे झाले तर गोव्याचे तसेच गोमंतकीयांचे काय होणार ? असा प्रश्न गोम्स यांनी यावेळी उपस्थित केला. 

सरकार सामान्य जनतेच्या हितासाठी कोणतेही निर्णय घेत नाही. परंतु कॅसिनोंसाठी ते पाहिजे ते करण्यास तयार आहे. त्यामुळे भाजप सरकार कॅसिनो विकृती गोव्यात रुजवत असल्याची टीका त्यांनी केली.