वाळूच्या टेकड्या, झुडपे नष्ट करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

कासावली किनाऱ्याची मामलेदारांकडून पाहणी


10th November 2018, 06:30 pm

प्रतिनिधी । गाेवन वार्ता      

वास्को : कासावली समुद्र किनाऱ्यावरील वाळूच्या टेकड्या, इतर लहान झाडेझुडपे नष्ट केल्याची तक्रार दाखल होताच मुरगावचे मामलेदार सतीश प्रभू यांनी या जागेची पाहणी केली. यावेळी तक्रारीत तथ्य असल्याचे आढळल्याने संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले.      

कासावली समुद्र किनाऱ्यावर स्थानिकांचा विरोध डावलून गुपचूपपणे पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाला कासावली पंचायतीचाही विरोध असल्याने अद्याप प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकलेले नाही. याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वी इथली लहान झाडेझुडपे हटवून वाळूच्या टेकड्या सपाट केल्याचे आढळून आले आहे. याप्रकरणी स्थानिक नागरिक डिकॉस्टा यांनी वन खाते, मुरगाव उपजिल्हाधिकारी कार्यालय आणि मामलेदार कार्यालयात तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली आहे. शुक्रवारी मामलेदार सतीश प्रभू यांनीदेखील तक्रारदाराला सोबत घेऊन या जागेची पाहणी केली असता, त्यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. यावेळी टेकड्या नष्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सर्व्हे नोंदणीवरून जागेच्या मालकाचा शोध घेतला जाईल. त्यानंतर संबंधितांची चौकशी करून दाेषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही यावेळी मामलेदार प्रभू यांनी दिली. 

‘टेकड्या नष्ट करण्यात कंत्राटदाराचा हात’

कासावली किनाऱ्यावरील वाळूच्या टेकड्या, इतर लहान झाडेझुडपे नष्ट करण्यामागे हॉटेल कंत्राटदाराचा हात आहे, असा अारोप ‘गोंयच्या रापणकारांचो एकवोट’ संघटनेचे नेते ऑलाइन्सियो सिमॉईश यांनी केला आहे. या प्रकल्पाचा परवाना रद्द करून कंत्राटदारावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. वाळूच्या टेकड्या, झाडेझुडपे नष्ट झाल्याने समुद्राचे पाणी लोकवस्तीपर्यंत येण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी सीआरझेड व्यवस्थापनाने संबंधितांवर कारवाई कारवाई करावी. तसेच कांसावली किनाऱ्याची होणारी धूप रोखण्यासाठी उपाययोजना करावी, अशा मागण्याही सिमॉईश यांनी केल्या आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील वाळूच्या टेकड्या व झाडेझुडपे नष्ट करणे, कायद्याने गुन्हा आहे. सीआरझेडअंतर्गत किनाऱ्यावर कोणतीही विकासकामे करता येत नसल्याचे राष्ट्रीय हरित लवादाने स्पष्ट केला आहे, असेही सिमॉईश यांनी यावेळी सांगितले.