पोल्ट्री व्यवसायासाठी शेतकऱ्यांना ‘अर्थ’बळ!

सरकारकडून नवी योजना जाहीर; ६ व २१ लाखांची सबसिडी

10th November 2018, 06:23 Hrs

विशेष प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : राज्यात कुक्कुट पालनाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने पशुसंवर्धन खात्याने ब्रॉयलर फार्म, एलआयटी फार्म व लेयर फार्म उभारण्यासाठी नवी योजना तयार केली आहे. नव्याने फार्म उभारण्यासाठी प्रत्येकी ६ व २१ लाख रुपये सबसिडी देण्याची योजना मार्गी लावली आहे.

ब्रॉयलर व एलआयटी या दोन फार्मसाठी हजार कोंबड्या पाळता याव्यात यासाठी दोन हजार चौरस फुटांचे फार्म असणे आवश्यक आहे. त्यासाठीच्या शेडचा खर्च ७ लाखांपर्यंत असावा तसेच एकूण सुविधा खर्च ८.५९४ लाख रुपये इतका असावा. अशा फार्मसाठी ६ लाख रुपये सबसिडी मिळणार आहे.

लेयर फार्मसाठी चार हजार कोंबड्या पाळण्याची अट आहे. त्यासाठी ७ हजार चौरस फुटामध्ये शेड असावी. शेडचा खर्च २६.२५ लाख रुपये असावा. तसेच तेथील एकूण सुविधांचा खर्च २८.७०५ लाख रुपये इतका असला पाहिजे. अशा फार्मसाठी २१ लाख रुपये सबसिडी मिळणार आहे.

योजनेत काय म्हटले आहे?

- राज्यात शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे तसेच कुक्कुट पालन व अंड्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी, या हेतूने सरकारने ही योजना तयार केली आहे. ‘आर्थिक सहाय्य’ असे या योजनेचे नाव आहे.

- फार्म उभारणाऱ्याने किमान दहा वर्षे फार्म चालवावे व तशा प्रकारचा करार त्याला खात्याशी करावा लागेल.

- योजनेचा लाभ घेण्यासाठी पोल्ट्री शेड उभारणे, गोदाम व स्टोअर रूम, वीज जोडणी, पाण्याची पाईपलाईन, पाण्याचा पंप अशा सुविधा असणे किंवा नव्याने खरेदी करणे आवश्यक आहे.

- बँकांचे कर्ज काढून अशा प्रकारचा व्यवसाय चालवणे कठीण होत असल्यामुळे सरकारने ही सबसिडी योजना तयार केली आहे.

- योजनेचा लाभ घेण्यासाठी एक चौदाचा उतारा, जमीन मालकाची ‘एनओसी’, प्रकल्प अहवाल अशा कागदपत्रांची आवश्यकता आहे.

Related news

विज्ञानाचा उपयोग देशाच्या विकासासाठी करा : नोरोन्हा

चौगुले महाविद्यालयात भारतीय विज्ञान चित्रपट महोत्सवाचे आयोजन Read more

साने गुरुजी कथामाला स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर

उत्तर गोवा स्पर्धा २९ नोव्हेंबर, दक्षिण गोवा स्पर्धा ५ डिसेंबरला Read more