भूलथापांना बळी पडू नका : विश्वजीत


10th November 2018, 06:23 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता

वाळपई : आल्वाराधारक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जमिनीच्या कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठी सरकारने एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. जमीन मालकीसाठीच्या दरात कपात करण्याची मागणीही विचारात घेतली जाणार असल्याचे महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले आहे. त्यामुळे सत्तरीतील आल्वाराधारकांनी याबाबतच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन आरोग्यमंत्री तथा वाळपईचे आमदार विश्वजीत राणे यांनी शुक्रवारी केले.

आरोग्यमंत्री राणे यांच्या नेतृत्वाखाली सत्तरी तालुक्यातील सरपंच, नगरसेवक, जिल्हा पंचायत सभासद यांनी शुक्रवारी महसूलमंत्री खंवटे यांची भेट घेऊन त्यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. त्यावेळी महसूलमंत्र्यांनी आल्वारा जमिनींबाबत सत्तरीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नसल्याचे आश्वासन दिले. त्यामुळे राणे यांच्यासह शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले. राज्य सरकारने २०१७ मध्ये आल्वारा जमिनींसंदर्भात केलेल्या कायद्याचे परिणाम सत्तरी तालुक्यातील आल्वाराधारक शेतकऱ्यांवर होणार असल्याची भीती व्यक्त करीत, सरकारने कायद्यात दुरुस्ती करावी तसेच कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठीची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील भूमिपुत्र संघटनेने जाहीर सभा घेऊन केली होती. याची दखल घेत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी शुक्रवारी सकाळी पर्वरी सचिवालयात महसूलमंत्र्यांसोबत बैठक घेतली व या समस्येसंदर्भात त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चा केली. आल्वारा जमिनींच्या मालकीसाठी कागदपत्रांचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठीची मुदत ११ नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे. ही मुदत वाढवून मिळावी, अशी जी मागणी शेतकऱ्यांनी केली होती, त्याला प्रतिसाद देत मंत्री खंवटे यांनी यासाठी एका वर्षाची मुदतवाढ दिली.

सत्तरी तालुक्यातील जमीन मालकांना जमिनीच्या कायद्यासंदर्भात सविस्तर माहिती नाही. त्यासाठी लवकरच जागृती उपक्रम हाती घेण्यात येणार आहे, असे आरोग्यमंत्री राणे बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले. आल्वारा जमिनीची मालकी मिळण्यासाठी सरकारने निश्चित केलेल्या प्रति चौरस मीटर पाच रुपयांचा दर कमी करण्याचा विचारही सरकारी पातळीवर सुरू आहे. आल्वारा जमिनींसंदर्भात भाजप आघाडी सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत. जमिनीच्या मालकांना त्यांच्या जमिनीची मालकी देण्यासंदर्भात करण्यात आलेल्या कायद्याचा तालुक्यातील जनतेला अधिकाधिक फायदा व्हावा, यासाठी आपण गंभीर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

पर्वरीतील बैठकीला वाळपईचे माजी आमदार नरहरी हळदणकर, नगराध्यक्ष परवीन शेख, नगरसेवक रामदास शिरोडकर, जिल्हा पंचायत सभासद फटी गावकर, प्रेमनाथ हजारे, नगरगावच्या सरपंच लक्ष्मी हरवळकर, सावर्डेचे सरपंच नारायण गावकर, खोतोडाचे सरपंच ओमप्रकाश बर्वे, गुळेलीच्या सरपंच अस्मिता मेळेकर, होंडाचे सरपंच आत्मा गावकर, जयश्री परब, शुभदा गावस, केरीचे सरपंच लक्ष्मण गावस, पर्येचे सरपंच बाळकृष्ण म्हाळशेकर, भिरोंड्याचे सरपंच नितीन शिवडेकर आदी उपस्थित होते.