राज्यात नेतृत्व बदल अपरिहार्य : श्रीपाद


10th November 2018, 06:21 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असूनही तेवढ्याच जिद्दीने काम करीत आहेत. त्यांची प्रकृती पाहता आज ना उद्या नेतृत्व बदल करावाच लागणार आहे, अशी प्रांजळ कबुली केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शुक्रवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. भाजपमध्ये सध्या निर्माण झालेला कलह दूर करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असून, हा विषय चर्चेतून सोडविला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसच्या आमदारांना भाजपात प्रवेश देण्यासंबंधीच्या प्रस्तावाबाबत आपल्याला माहिती दिली होती. हा निर्णय माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि माजी आमदार महादेव नाईक यांना मान्य नसणे स्वाभाविक आहे. पण त्यांची नाराजी दूर केली जाईल, असे नाईक म्हणाले. भाजपचे काँग्रेसीकरण होत असल्याबाबत विचारले असता, नाईक यांनी सावध भूमिका घेतली. भाजप हा स्वतंत्र विचार आणि ध्येयधोरणे असलेला पक्ष आहे. या पक्षाचे वेगळेपण जपायला हवे. कारण या वेगळेपणामुळेच पक्षातील नेत्यांना लोकांचा पाठिंबा मिळतो. पक्षाचा विस्तार करताना पक्षाची ध्येयधोरणे आणि विचार कायम टिकून राहिला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षातील नेत्यांना एकसंध ठेवण्याची ग्वाही

भाजपात यापूर्वी तुमच्यावर अन्याय होत राहिला, त्यावेळी हेच नेते मूग गिळून गप्प होते आणि आता मात्र ते बंडखोरीची भाषा करीत आहेत. अशा नेत्यांना तुम्ही सहानुभूती दर्शविणार का असे विचारले असता, श्रीपाद नाईक यांनी उघडपणे बोलण्यास नकार दिला. पक्षातील नेत्यांना एकसंध ठेवणे आणि सर्वांना घेऊन पुढे जाणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपण आवश्यक ते सर्व प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रकृतीच्या कारणात्सव मुख्यमंत्री पर्रीकर यांनी राजीनामा द्यावा की न द्यावा, हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु या परिस्थितीतही ते सरकारी कामकाज हाताळतात ही खरोखरच धाडसाची आणि कौतुकाची बाब आहे, असेही त्यांनी नमूद केले.