बंडखोरांमुळे भाजपात अस्वस्थता

पक्षांतर्गत वादामुळे नेते, कार्यकर्ते नाराज; पक्षश्रेष्ठींमार्फत तोडग्यासाठी प्रयत्न सुरू


10th November 2018, 06:19 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : भाजपचे काँग्रेसीकरण होऊ देणार नसल्याचा चंग बांधत ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष नेतृत्वाविरोधात उघडपणे पुकारलेल्या बंडामुळे आणि पक्षात राहूनच पक्षाचे शुद्धीकरण करण्याचा निर्धार केल्याने भाजप संघटनेत कमालीची शांतता व अस्वस्थता पसरली आहे. पक्षश्रेष्ठींनी तत्काळ यात हस्तक्षेप करून हा विषय सोडवावा, यासाठीचे प्रयत्न पक्षातील काही नेत्यांनी सुरू केले आहेत.

भाजपचे म्हापशाचे आमदार तथा माजी नगर विकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या घरी गुरुवारी नाराज नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांना तत्काळ पदावरून हटवा, असा एकमुखी निर्णय घेण्यात आला. सध्या भाजपच्या विचारांशी बांधील असलेल्या प्रामाणिक नेते आणि कार्यकर्त्यांची पक्षाकडून फरफट सुरू आहे. संघटनेचे कोणतेही नियंत्रण पक्षावर राहिलेले नाही. त्यामुळे भाजप मूळ विचार आणि धोरणांपासून दूरावत चालला आहे, अशी खंत या नेत्यांनी बोलून दाखविली. ‘पार्टी वुईथ डिफरन्स’ अशी बिरुदावली मिरवून जनतेकडे मते मागणारा हा पक्ष आता कोणत्या तोंडाने मतदारांना सामोरे जाणार, एका निवडणुकीत पराभव झाला, म्हणून मूळ नेत्यांकडे दुर्लक्ष करण्याची ही पद्धत कोणती, असे सवाल बंडखोर नेत्यांनी उपस्थित केले आहेत. पक्षाचे हित आणि भवितव्याचा विचार न करता केवळ माना डोलावणारे आणि कुणाच्यातरी आदेशांवर नाचणारे नेतृत्व पक्ष पुढे नेऊ शकत नाही. त्यामुळेच संपूर्ण पक्ष संघटनेची फेररचना व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, बंडखोर नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेला पक्ष संघटनेतून आता मोठा पाठिंबा मिळू लागला आहे. सामान्य कार्यकर्त्यांकडूनही बंडखोर गटाच्या भूमिकेचे स्वागत होऊ लागल्याने प्रमुख पदाधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. पडेल आमदार म्हणून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची हेटाळणी जर जबाबदार पदाधिकाऱ्यांकडूनच होऊ लागली, तर सामान्य कार्यकर्ता काय करणार, अशी खंतही एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.

भाजप श्रेष्ठींकडूनही पक्ष संघटनेवर विशेष लक्ष देण्यात येत नाही. केंद्रीय स्तरावरील कार्यक्रमांचे सोपस्कार पूर्ण करून आणि दिल्लीत अहवाल पाठवून पक्षश्रेष्ठींच्या डोळ्यांत धूळफेक केली जात असल्याची टीकाही अनेकांकडून करण्यात येत आहे. म्हापशातील गुरुवारच्या बैठकीनंतर विविध स्तरावरील नेते आणि कार्यकर्त्यांनी फोन करून असे व्हायलाच हवे होते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्याची माहिती मिळाली आहे.

नाराज नेत्यांचा पुढाकार भाजपसाठी हितावह!

माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक, माजी सभापती अनंत शेट आणि माजी मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी घेतलेला हा पुढाकार पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, असे अनेक कार्यकर्त्यांना वाटते. पक्षातील अन्य नेते आणि कार्यकर्त्यांचा त्यांना पाठिंबा असला तरी ते अद्याप उघडपणे समोर येण्याचे टाळत आहेत. श्रेष्ठींकडून वेळीच दखल घेण्यात आली नाही, तर मात्र पक्षांतर्गत मतभेदाची तीव्रता अधिक वाढण्याचा धोकाही अनेकांकडून व्यक्त होत आहे.

म्हापशातील बंडखोरांच्या बैठकीसंबंधी माहिती मिळविण्यासाठी पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि नेते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आपण पुढाकार घेऊन हा विषय संपवणार असे सांगितले, तर पक्षाचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते बंडखोरी करणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला. या प्रकारामुळे काहीतरी चांगलेच घडेल आणि पक्ष अधिक मजबूत होईल, असेही त्यांनी नमूद केले.