बंडोबांना भाजप कसा आवरणार?

मांद्रे आणि शिरोड्यात पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वी पार्सेकर आणि महादेव नाईक यांना शांत करण्याचे आणि सध्या पदाशिवाय असलेले आमदार फ्रान्सिस डिसोझा यांचे पक्ष कशा प्रकारे पुनर्वसन करते, त्यावर या नेत्यांच्या बंडाचे भवितव्य अवलंबून आहे.

Story: दृष्टिक्षेप | पांडुरंग गावकर | 10th November 2018, 06:00 Hrs

भाजपचे दिग्गज ज्यांनी पक्ष उभा करण्यासाठी आयुष्य खर्ची घातले त्यांच्या नाकावर टिचून काँग्रेसमधून लोक आयात करण्याचा सपाटा लावणाऱ्या भाजपतील काही अवघ्या लोकांच्या कार्यपद्धतीमुळे सध्या भारतीय जनता पक्षात असंतोष खदखदतोय. नाराज झालेल्या दिग्गजांकडून आपण करीन ती पूर्व म्हणणाऱ्यांच्या अकलेचे धिंडवडेही काढणे सुरू आहे. हा वाद असाच फोफावेल की त्यांच्या मागणीनुसार पक्षात बदल होतील ते येणारा काळच सांगेल.
२०१७ च्या निवडणुकीत मंत्रीपदी असलेल्या रमेश तवडकर व सभापतीपदी असलेल्या अनंत शेट यांना डावलून मुख्यमंत्र्यांनी आपल्या मर्जीतील विजय पै खोत आणि प्रवीण झांट्ये यांना उमेदवारी दिली, त्यावेळी आता जागे झालेले दिग्गज गप्प होते. सत्तेत आल्यानंतर शेट यांना कॅबिनेट दर्जाचे पद देऊ असे सांगणारे मुख्यमंत्री दीड वर्षानंतरही शेट यांच्यासाठी काहीच सोय करत नव्हते, तेव्हाही कोणी काही बोलत नव्हते. तवडकर आणि शेट यांच्यावर तेव्हा झालेला अन्याय भाजपतील सर्वच दिग्गजांनी पाहिला आणि आपली जागा शाबूत ठेवण्यासाठी वेळोवेळी गप्प राहणेच पसंत केले. एकही नेता त्यांच्या मदतीला पुढे आला नाही. काल जे तवडकर, शेट यांच्याबाबत झाले तेच आता आपल्या मतदारसंघांतही झाल्यामुळे पक्षातील हे दिग्गज खडबडून जागे झालेले आहेत. असंतुष्ट, नाराज व पक्षाने अन्याय केलेल्या सर्वांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण वापरून फेकून देण्याची प्रथा भाजपत नवी नाही. यापूर्वी अनेक नेत्यांना जे काँग्रेस, मगोतून आले होते, त्यांनाही वेळोवेळी आपल्या स्वार्थासाठी वापरून भाजपने नंतर फेकून दिले. फरक फक्त इतकाच आहे, आता जे लोक शंख करत आहेत ते मुळातच भाजपच्या कॅडरचे आहेत आणि ज्यांना पूर्वी फेकून दिले किंवा ज्यांची राजकीय कारकिर्द संपवली ते आयात केले होते. सतीश धोंड यांना गोव्याबाहेर पाठवून पक्ष जेव्हा याच लोकांनी हातात घेतला तेव्हाही हे दिग्गज गप्प होते. धोंड जाताहेत तर काही दिवसांसाठी जाऊ दे, असे हेच नेते तेव्हा म्हणायचे. श्रीपाद नाईक यांना पर्वरीतून विधानसभा निवडणूक लढवायची होती पण त्यांना इथे येण्यास अडथळे आणले गेले. तेव्हाही हे सारे दिग्गज गप्प होते. आता आपल्यावर अन्याय झाल्यामुळे स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हे दिग्गज एकत्र येत आहेत.
मंत्रिपदावरून हटवल्यामुळे फ्रान्सिस डिसोझा हे नाराज आहेत. दयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांना भाजपत घेतल्यामुळे लक्ष्मीकांत पार्सेकर व महादेव नाईक नाराज आहेत. गोवा फॉरवर्डला सरकारमध्ये घेतल्यामुळे दिलीप परुळेकर, दयानंद मांद्रेकर, दामू नाईक नाराज आहेत. भाजपचे असे अनेक दिग्गज सध्या नाराज आहेत. पण त्यातील काही अवघेच नाराजी व्यक्त करत आहेत. गुरुवारी फ्रान्सिस डिसोझा यांच्या घरी झालेल्या बैठकीसाठी पार्सेकर, महादेव नाईक, मांद्रेकर, अनंत शेट यांनी हजेरी लावली. परुळेकर, दामू नाईक, राजेंद्र आर्लेकर यांनी तिकडे जाण्याचे टाळले. तवडकर हे लोकसभेसाठी तयारी करत आहेत, त्यामुळे ते यांच्यासोबत येण्याची शक्यता नाही. पण उशिरा का होईना भाजपतील ठराविक लोकांच्या मक्तेदारीविरूध्द आवाज उठवला जात आहे. कॅडरच्या या पक्षात कधी आतली गोष्ट सहजपणे बाहेर येत नव्हती, पण इकडून तिकडून जमवलेल्यांनी आधीपासून पक्षाविरूध्द जाहीरपणे नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली होती. आता पक्षातील कॅडरचे निष्ठावंत नेतेच थेटपणे पक्षातील मक्तेदारीविरूध्द बंड करत आहेत. त्यामुळे भाजपतील या नव्या बंडाचे परिणाम म्हणून पक्षाच्या संघटनेत बदल करण्याचे नवे आव्हान पक्षासमोर आहे.
पार्सेकर प्रदेशाध्यक्ष असताना दोनवेळा पक्ष सत्तेत आला. पण मागच्या निवडणुकीत २१ वरून आकडा १४ वर आला. पार्सेकर मुख्यमंत्री होते, त्यामुळे त्यांच्यावर खापर फोडून भाजपाचे नेते मोकळे झाले. मुळात पक्षाच्या या अवस्थेला ते पूर्णपणे जबाबदार नव्हते.त्यातच आता त्यांना न विचारता दयानंद सोपटे यांना भाजपत घेतल्यामुळे ते चवताळले आहेत. इकडून तिकडून जमवून स्थापन केलेली सत्ता टिकवण्यासाठी पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याला दिलेली ही हीन वागणूक बहुतेकांच्या पचनी पडली नाही. पार्सेकरांचे अनेक नेत्यांशी चांगले संबंध होते, त्यामुळेच आज त्यांनी व फ्रान्सिस डिसोझा यांनी पुढाकार घेतल्यानंतर पडेल नेते एकत्र आले. भाजपला हादरा देण्यासाठी एवढे पुरेसे नाही हेही या नेत्यांना ठाऊक आहे. त्यामुळे पुढे हे नेते काय करतात, ते पाहण्यासारखे आहे.
पार्सेकर व फ्रान्सिसच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या नेत्यांना भाजपपासून वेगळे होणे पूर्णपणे परवडण्यासारखे नाही. म्हणजे वेगळा पक्ष काढण्याच्या फंदात हे नेते पडणार नाहीत. त्यांचे कार्यकर्तेही पूर्णपणे ही बाब स्वीकारतील की नाही तेही सांगता येत नाही. पक्षातच राहुन सध्याच्या नेत्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी हे नेते प्रयत्न करतील. मांद्रेकर यांनी तसे बोलूनही दाखवले आहे. म्हणजे इतकी वर्षे ज्या भाजपत राहून पक्ष वाढवला, मतदारसंघांमध्ये आपले वर्चस्व स्थापन केले तो पक्ष सहज रागापोटी सोडणे ठीक नव्हे, हेही या नेत्यांना माहीत आहे. पुढील काही महिन्यांत गोव्याच्या राजकारणाचे चित्र कधीही पलटू शकते, त्यामुळे पक्षाच्या मुख्य फळीत जर पूर्वीसारखे स्थान पक्के झाले किंवा सध्या ज्यांच्याकडे पक्ष आहे त्यांच्या ताब्यातून पक्ष काढून घेण्यात यश आले तर पुढे पुन्हा या दिग्गजांना आपल्या मतदारसंघात मुसंडी मारण्याची संधीही येऊ शकते. म्हणजेच आता पक्षाच्या नेतृत्वाविरूध्द बंड पुकारून पक्षात फक्त बदल करण्याचा या नेत्यांचा हेतू आहे. पण त्यांचा हा हेतू पुढील काही महिन्यांत सफल झाला नाही तर हे बंड कुठले वळण घेतात ते पहावे लागेल. मांद्रे आणि शिरोड्यात पोटनिवडणूक जाहीर होण्यापूर्वी पार्सेकर आणि महादेव नाईक यांना शांत करण्याचे आणि सध्या पदाशिवाय असलेले आमदार फ्रान्सिस डिसोझा यांचे पक्ष कशा प्रकारे पुनर्वसन करते, त्यावर या नेत्यांच्या बंडाचे भवितव्य अवलंबून आहे.
आरोग्याच्या कारणावरून फ़्रान्सिस डिसोझा आणि पांडुरंग मडकईकर यांची मंत्रिपदे काढून घेतल्यानंतर त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाकडेच कुठलेही पद पक्षाने दिलेले नाही. पण काँग्रेसमधून आयात केलेल्यांना महत्त्वाची पदे दिली आहेत. भाजप सत्ता टिकवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे, पण त्यातून पक्षाचे विद्यमान आमदार आणि निष्ठावंत नेते दुखावले जात आहेत. ही डॅमेज नियंत्रणात आणण्यासाठी पक्षाकडे कोणताही पर्याय सध्या तरी दिसत नाही. 

Related news

मतदानाच्या विश्लेषणातील काही निष्कर्ष

गोव्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी ८० टक्के मतदानाचे उद्दिष्ट ठेवले होते. असह्य उकाड्यामुळे मतदान कमी होणार हे माझे भाकीत अचूक ठरले. त्याचप्रमाणे २३ मे रोजी तिन्ही पोटनिवडणुका व दोन लोकसभा मतदारसंघांत भाजपचा विजय होईल, हेही भाकीत अचूक ठरणार आहे. Read more

निवडणूक आयोगाच्या कमतरता

निवडणुकीच्या बराच काळ आधी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे उपलब्ध असतात. यंत्रे तपासूनच मतदानासाठी ठेवणे अपेक्षित असते. तरी मतदानावेळी यंत्रे बिघडतात कशी या प्रश्नाचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे. Read more