सुंभ जळाला, पण ट्रम्प यांचा पीळ मात्र कायम !

विरोधक आणि ट्रम्प यांच्यामधील संघर्ष वाढत जाणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. २०२० मधील निवडणुकीत पुन्हा निवडून येण्यासाठी ट्रम्प यांना जी तयारी करावी लागणार आहे, ती अशाच वातावरणात केली जाईल, असे मानले जाते.

Story: अग्रलेख |
10th November 2018, 06:00 am

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत सुपरिचित अशा उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा २०१६ मध्ये पराभव करीत अध्यक्षपदावर आरुढ झालेले डोनाल्ड ट्रम्प यांच्या चित्रविचित्र लीला जगासाठी चर्चेचा विषय ठरत असतात. नुकत्याच झालेल्या लोकप्रतिनिधी सभागृहाच्या (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह) निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे सदस्य कमी निवडून आले किंवा विरोधकांनी अधिक जागा मिळविल्या याची त्यांना ना खंत, ना खेद. याउलट ट्रम्प यांनी दुसरे सभागृह असलेल्या सेनेटमधील विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना कौतुक करणारे एक ट्विटही केले आहे. ‘१०५ वर्षांत केवळ पाचव्यांदाच विद्यमान अध्यक्षांना सेनेटमधले स्थान राखता आले आहे..’असे निरीक्षण त्यांनी स्वत: ची पाठ थोपटताना केले आहे. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी अॅटर्नी जनरल सेशन्स यांची उचलबांगडी केली. ‘आपल्या विनंतीनुसार मी हा राजीनामा देत आहे’, असे सेशन्स यांनी म्हटल्यामुळे ते स्वत:हून गेलेले नाहीत, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मार्च २०१७ पासून सुरू झालेले नाट्य म्हणा किंवा रुसवेफुगवे म्हणा, अखेर अशा पद्धतीने संपुष्टात आले. अमेरिकेतील निवडणुकीत रशियाने हस्तक्षेप केल्याचा आरोप गाजला होता, त्यावेळी सेशन्स यांनी आपण चौकशीत सहभागी होणार नसल्याचे म्हटले होते. निवडणूक काळात ट्रम्प यांनी रशियाच्या राजदूताशी चर्चा केली होती, ही माहिती लपवून ठेवल्याची टीका सेशन्स यांच्यावर झाली होती. त्यामुळे ते चौकशीपासून दूर राहिले होते. खरे तर ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीचे समर्थन करणारे ते पहिले सेनेटर होते. ट्रम्प कोणावर कधी नाराज होतील याचा नेम नसतो. सेशन्स याच्याबाबतीतचा अनुभव हेच दाखवून देणारा ठरला आहे.
अमेरिकेतल्या मध्यावधी निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये डेमोक्रॅट पक्षाने बाजी मारली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. डेमोक्रॅटच्या विजयामुळे ट्रम्प यांना आपली मनमानी फार काळ चालवता येणार नाही, असेच दिसते आहे. मात्र सिनेटमध्ये ट्रंप यांच्या रिपब्लिक पक्षाने आपले स्थान मजबूत केले आहे. त्यामुळे ट्रम्प यांना न्यायाधीशांच्या आणि इतर महत्त्वाच्या नेमणूका त्यांच्या मतांप्रमाणे करता येणार आहेत. असे म्हटले जाते की मंगळवारी झालेल्या मध्यावधी निवडणुका म्हणजे ट्रम्प प्रशासनाबाबत जनमताचा कौल घेण्यासारख्या होत्या. निवडणुकांचे निकाल विरोधी पक्षांसाठी आश्वासक चित्र निर्माण करणारे आहेत. प्रतिनिधी सभागृहावर नियंत्रण म्हणजे विविध समित्यांवर वर्चस्व ठेवण्यासारखे आहे. विरोधक आणि ट्रम्प यांच्यामधील संघर्ष वाढत जाणार असल्याची ही चिन्हे मानता येतील. २०२० मधील निवडणुकीत पुन्हा निवडून येण्यासाठी ट्रम्प यांना जी तयारी करावी लागणार आहे, ती अशाच वातावरणात केली जाईल, असे मानले जाते.
ट्रम्प यांची प्रसार माध्यमाशी वागण्याची पद्धतही नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. अमेरिकेसारख्या लोकशाही देशात मतस्वातंत्र्य निकोप असायला हवे, अशी अपेक्षा असते. प्रसार माध्यमांना त्यासाठी पुरेशी मोकळीक मिळालेली आहे. मात्र ट्रम्प यांना हे स्वातंत्र्य मान्य नसावे, असे दिसते. त्यांना कोणताही विरोध सहन होत नाही, त्यामुळे ते सतत प्रसार माध्यमावर राग काढत असतात. परिपक्व लोकशाहीत मतभेद सहन करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांमध्ये नसणे हा एक प्रकारचा धोकाच मानावा लागेल. लोकशाही देशात सत्ताधारी हे देशाचे मालक नसून ते केवळ ट्रस्टी असल्याचे म्हटले जाते. मात्र बहुतेक वेळा सत्ता अनेकांना अहंकारी बनवते. ट्रम्प हे मुळातच बांधकाम व्यवसायातील एक मोठे प्रस्थ आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज. त्यात ते एका शक्तिशाली देशाचे अध्यक्ष बनल्याने ते आक्रमकही बनले आहेत. आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला अशी त्यांची अवस्था झाली आहे. पत्रकाराने कोणते प्रश्न विचारु नयेत हे सांगण्याचा मोह त्यांना होत असतो. परवा त्यांनी अशाच प्रकारे पत्रकाराला रोखण्याचा प्रयत्न तर केलाच, शिवाय तो ज्या वृत्तवाहिनीत काम करतो, त्याचाही ‘उद्धार’ केला. असे पत्रकार असणे ही वृत्तवाहिनीसाठी अशोभनीय बाब आहे, असे ते म्हणाले. याचाच अर्थ अमेरिकेत असहिष्णुता वाढत चालली आहे, असा होतो. खुद्द अध्यक्षच टीका सहन करण्याच्या मनःस्थितीत नसावेत हे लोकशाहीला धोका असल्याचे दर्शविते. दणका देणाऱ्या निकालामुळे ट्रम्प यांचा सुंभ जळाला असला, तरी पीळ मात्र कायम असल्याचे दिसते.