बांबोळीत उद्यापासून ‘विज्ञान भैरव’

श्री श्री रवीशंकर यांचे ध्यानावर मार्गदर्शन; दोन दिवसांच्या शिबिराचे आयोजन


09th November 2018, 06:44 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता                  

मडगाव : बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये दि. १० व ११ रोजी ‘विज्ञान भैरव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास विश्व आध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती प्रवास नायक यांनी गुरुवारी मडगाव येथे पत्रकार परिषदेत दिली.

या ‘विज्ञान भैरव’ कार्यक्रमात शनिवार, दि. १० रोजी संध्या. ६ ते ९ वाजेपर्यंत व रविवार, दि. ११ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत श्री श्री रवीशंकर मनात परिवर्तन घडविणारे तंत्र शिकविणार आहेत. यावेळी अनेक प्रकारच्या श्रेष्ठ ध्यानाचे प्रकारही ते शिकविणार आहेत. संपूर्ण मानसिक तणावमुक्ती व आपल्या दिव्य कर्तृत्वाचा साक्षात्कार हे ‘विज्ञान भैरव’ कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य आहे.

रविवारी संध्याकाळी ६ वाजल्यानंतर आनंदोत्सव कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल. तसेच सोमवार, दि. १२ रोजी सकाळी ८.३० वाजता पणजीतील श्री महालक्ष्मी मंदिरात गुरूजी रुद्रपूजा करणार आहेत. गोव्याच्या प्रसिद्ध पॉप गायिका हेमा सरदेसाई यांचा कार्यक्रमात सहभाग असेल. या कार्यक्रमाच्या स्थळी प्रवेशिका उपलब्ध असतील.                   

गुरूजींच्या ‘विज्ञान भैरव’ कार्यक्रमाला अमेरिका, दुबई, युनायटेड अमिराती आदी देशात बरीच मागणी आहे. संबंधित देशांत गुरूजी हा कार्यक्रम करून परतले आहेत. गोव्यात कार्यक्रम आटोपून ते सुरत येथे हाच कार्यक्रम करणार आहेत. देशभरातील विविध शहरांत गुरूजींच्या कार्यक्रमाला बरीच मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.             

भारतात ब्रिटीश व गोव्यात पोर्तुगीजांनी राजवट केल्याने लोक भारतीय संस्कृती व ज्ञानापासून बरेच दूर राहिलेले आहेत. भारतीय ज्ञानाला विदेशातून भरपूर मागणी आहे. जर हे ज्ञान सुरुवातीपासून लोकांना मिळाले असते, तर भारत देश वेगळ्याच प्रकारे दृष्टीस पडला असता. श्री श्री रवीशंकर गुरूजींनी भारतीय ज्ञान लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘विज्ञान भैरव’ या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रशिक्षक डॉ. व्यंकटेश हेगडे यांनी सांगितले.