खाण अवलंबित अस्वस्थ; साखळीत रविवारी बैठक

खाणी सुरू करण्यात सरकार वेळकाढूपणा करत असल्याचा ‌अवलंबितांचा आरोप


09th November 2018, 06:35 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता       

डिचोली : राज्यातील खाणी सुरू होण्याची आशा मावळत चालल्याने खाण अवलंबित कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. या विषयावर पुढील रणनीती ठरविण्यासाठी रविवार, दि. ११ रोजी सकाळी १० वाजता साखळी इस्पितळाजवळ विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला अवलंबितांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खनिजवाहू ट्रकमालक संघटनेचे नेते नीळकंठ गावस यांनी केले आहे.        

डिचोली येथे गुरुवारी खनिजवाहू ट्रकमालक संघटनेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत गावस बोलत होते. यावेळी मंगलदास नाईक, खेमलो सावंत आदी नेते उपस्थित होते.      

या पत्रकार परिषदेत गावस यांनी राज्य सरकार आणि भाजप नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. खाणींचा प्रश्न सोडविण्यासाठी भाजपचे नेते वारंवार दिल्लीवाऱ्या करत आहेत. मात्र, कोणीही ठोस तोडगा काढत नाही. भाजपचे नेते उलटसुलट विधाने करून आणि खोटी आश्वासने देऊन निव्वळ वेळ मारून नेत आहेत. ते दिल्लीला जाऊन खरंच खाणीबाबत चर्चा करतात का ? याबाबतही साशंकता आहे, अशी टीका यावेळी गावस यांनी केली. सरकारमधील मंत्री आणि भाजपचे नेते खाण अवलंबितांना खोटी आश्वासने देत असल्याने त्यांच्यावरील विश्वास उडत चालला आहे. परिस्थिती अशीच राहिली तर, भविष्यात गोव्यात अत्यंत गंभीर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, अशी भीती गावस यांनी यावेळी व्यक्त केली. ‍      

खाणी बंद असल्यामुळे दीड लाखांहून अधिक अवलंबितांवर त्याचा थेट परिणाम झाला आहे. खाणी सुरू करण्यासाठी सरकारने कोणतेही ठोस आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे खाणी सुरू न झाल्यास सरकारने कोणती पर्यायी तयारी ठेवली आहे, याचे उत्तर खाण अवलंबितांना मिळणे आवश्यक आहे. आता चालढकलपणा करून वेळ मारून नेता येणार नाही. याच विषयावर पुढील रणनीती आखण्यासाठी रविवारी बैठक बोलावण्यात आली आहे, अशी माहिती गावस यांनी यावेळी दिली.       

या पत्रकार परिषदेत खेमलो सावंत यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. खाण प्रश्नावर काँग्रेस नेत्यांना सोबत घेऊन दिल्लीत जाऊन सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांकडे चौकशी केली. या चौकशीवेळी गोवा सरकारने काहीच ठोस पावले उचलली नसल्याचे समोर आले, असा अारोप सावंत यांनी केला. खाण अवलंबितांनी अशा सरकारच्या आश्वासनांना आता बळी पडू नये, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.  

मंगलदास नाईक यांनी सरकारने आता खाण पीडितांचा अंत पाहू नये, असा इशारा यावेळी दिला.