आरोग्यमंत्र्यांनी गोमंतकीयांची माफी मागावी

मडगाव घाऊक आणि किरकोळ मासळी विक्रेता संघटनेची मागणी


09th November 2018, 06:33 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता                              

पणजी : मडगाव घाऊक आणि किरकोळ मासळी विक्रेता संघटनेने दिलेले निवेदन कचरापेटीत फेकून देण्याची भाषा करणाऱ्या आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोमंकीयांचा अपमान केला आहे. याविषयी त्यांनी त्वरित माफी मागावी, तसेच मासळीचा प्रश्न हाताळता येत नसल्यास त्यांनी त्वरित मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गुरुवारी संघटनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली.

पणजी येथे घेतलेल्या या पत्रकार परिषदेस संघटनेचे अध्यक्ष मौलाना इब्राहिम, मडगाव किरकोळ मासळी मार्केट संघटनेचे सदस्य फेल्किस गोन्साल्विस, ज्योकीम बॉर्जिस, प्रभाकर नाईक व इतर पदाधिकारी उपस्थित होते.                         

राज्यात मासळीचा पुरवठा ‍पूर्ववत सुरू व्हावा आणि अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) घातलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी मिळावा, यांसाठी संघटनेने बुधवारी एफडीए संचालकांना निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेण्याएेवजी आरोग्यमंत्री राणे यांनी ते निवेदन कचरा पेटीत फेकण्याची भाषा वापरून समस्त गोमंतकीयांचा अपमान केला आहे, असा आरोप यावेळी इब्राहिम यांनी केला.      

राज्यात आयात होणाऱ्या मासळीमध्ये फॉर्मेलिन रसायन सापडल्यापासून गोवेकरांच्या मनात मासळीबाबत भीती निर्माण झाली आहे. ही भीती दूर होण्यासाठी  एफडीएच्या वरिष्ठ अधिकारी आयव्हा फर्नांडिस यांच्याकडे मासळी तपासणी करण्याची जबाबदारी द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली होती. परंतु या निवेदनाची दखल घेण्याएेवजी आरोग्यमंत्र्यांनी संतापजनक वक्तव्य केले. यासाठी त्यांनी माफी मागावी. तसेच मंत्र्यांनी या विषयावरून राजकारण न करता हा प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा. हा प्रश्न सोड‌विणे जमत नसेल, तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून त्यांच्याकडून राजीनामा घ्यावा आणि हा प्रश्न धसास लावावा, अशी मागणीही यावेळी इब्राहिम यांनी केली.      

सरकार मच्छीमार बोट मालकांना विविध प्रकारचे अनुदान आणि सवलती देत आहे. या योजनांचा किरकोळ विक्रेत्यांना काहीच फायदा होत नाही. याची दखल घेऊन सरकारने किरकोळ मासळी विक्रेत्यांनाही वेगळ्या योजना लागू कराव्यात, अशी मागणी गोन्साल्विस यांनी यावेळी केली.  

एफडीएच्या नियमांत कोणतीही तडजोड अशक्य : मंत्री राणे

गोमंतकीयांना स्वच्छ आणि सुरक्षित अन्न प्रदान करणे, हे सरकारचे कर्तव्य आहे. याबाबतीत सरकार कसलीही तडजोड करणार नाही. यासाठी संबंधितांनी अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) घातलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. या नियमांचे पालन केल्यानंतर मासळी विक्रेत्यांच्या मागणीचा सरकार विचार करेल. तोपर्यंत कुठल्याही प्रकारची तडजोड करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.  गोमंतकीयांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि सुरक्षित मानक अन्न प्रदान करण्यासाठी नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांचे समर्थन असल्याची माहितीही मंत्री राणे यांनी यावेळी दिली.