देवेंद्र - सरदार खेलरत्न : १७ खेळाडुंना मिळणार अर्जुन पुरस्कार


22nd August 2017, 08:35 pm
देवेंद्र - सरदार खेलरत्न : १७ खेळाडुंना मिळणार अर्जुन पुरस्कारनवी दिल्ली : रिआे पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेता अॅथलेट देवेंद्र झाझरिया आणि भारतीय हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग यांना २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोच्च खेलरत्न राजीव गांधी पुरस्काराने राष्ट्रपती भवनात सन्मानित करण्यात येईल. त्यांच्यासोबतच क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आणि हरमनप्रीत यांच्यासह १७ खेळाडूंना प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
सरकारने मंगळवारी अधिकृतरीत्या राष्ट्रीय खेळ पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंची घोषणा केली. यांची निवड अर्जुन पुरस्कार समिती आणि द्रोणाचर्य पुरस्कार समितीने शिफारस केली होती. द्रोणाचार्य पुरस्कारातून केवळ प्रशिक्षक सत्यनारायण यांचे नाव वगळण्यात आले कारण त्यांच्याविरुद्ध एक फौजदारी खटला न्यायालयात चालू आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी गेल्या शुक्रवारी या पुरस्कारांसाठी शिफारस केलेल्या नावांना आपली परवानगी दिली होती व याच्याच दुसऱ्या दिवशी सत्यनारायण यांचे नाव द्रोणाचार्य पुरस्कारांच्या यादीतून वगळण्यात आले होते. सरकारच्या अधिकृत घोषणेनंतर देवेंद्र आणि सरदार खेलरत्नाने सन्मानित होतील तर इतर सात प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
राष्ट्रपतींकडून होणार सन्मान
१७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येईल. तीन खेळाडूंना आजीवन ध्यानचंद पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. राष्ट्रपती क्रीडा दिनी राष्ट्र​पती भवनात आयोजित एका विशेष कार्यक्रमात या खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करतील. खेलरत्नात साडे सात लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले तर तर अर्जुन, द्रोणाचार्य व ध्यानचंद पुरस्कारात पाच पाच लाखांचे रोख पुरस्कार दिले जातात.
अॅथलेट देवेंद्र झांझरिया
३६ वर्षीय देवेंद्र अशा प्रकारे खेलरत्न मिळवणारा पहिला पॅरा अॅथलेट बनणार. देवेंद्रने मागच्या वर्षी पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक एफ ४६ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले होते. यापूर्वी त्याने २००४च्या अथेंस ऑलिम्पिकमध्ये भालोफेकीत सुवर्ण पदक पटकावलेले होते. याशिवाय देवेंद्रने २०१३च्या आयपीसी विश्व चम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक व २०१५च्या आयपीसी विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक मिळवले होते. देवेंद्रने २००४ आणि २०१६ साली पॅरालिम्पिक खेळांमध्ये नवा विक्रम रचत सुवर्ण पदक मिळवले होते.
-----बॉक्स----
हॉकीपटू सरदार सिंग
जगातील सर्वोत्कृष्ट मिडफिल्डरमध्ये गणला जाणारा सरदार सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने २०१४च्या इंचियोन आशियाई खेळांमध्ये १६ वर्षांच्या दुष्काळानंतर हॉकीत सुवर्ण पदक मिळवले होते व रिओ ऑलिम्पिकसाठी थेट प्रवेश मिळवला होता. सरदारच्या नेतृत्वाखाली भारताने मागच्या आशियाई खेळांमध्ये दोन सुवर्णच पटकावले नाही तर रिओ ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेशही मिळवला होता. सरदारची गणना जगातील सर्वोत्कृष्ट मिडफिल्डरमध्ये केली जाते. तो जेव्हा २००८मध्ये सुल्तान अझलन शाह चषकासाठी भारतीय संघाचा कर्णधार बनला हाेता तेव्हा हे पद सांभाळणारा तो सर्वांत युवा खेळाडू होता.
अर्जुन पुरस्कारासाठी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा आणि महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत सिंग, रिओ पॅरालिम्पिक पुरुषांच्या उंच उडीत कांस्य पदक मिळवणारा वरूण भाटी, बास्केटबॉल खेळाडू प्रशांती सिंग, गोल्फर एसएसपी चौरसिया आणि महिला फुटबॉलपटू ओनम बेमबेम देवी यांचे नाव यात आहे.
यांच्याशिवाय टेनिस खेळाडू साकेत मायनानी, रिओ पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेता उंचउडीपटू मरियप्पन थंगावेलू, महिला तिरंदाज व्हीजे सुरेखा, अॅथलेट खुशबीर कौर आणि आरोकिया राजीव, हॉकीपटू एस. व्ही. सुनील, पैलवान सत्यव्रत कादियान, टेबल टेनिस खेळाडू अँथोनी अमलराज, नेमबाज पीएन प्रकाश, कबड्डीपटू जसवीर सिंग आणि मुष्टियोद्धा देवेंद्रो जसंग यांना अर्जुन पुरस्कार प्राप्त झाला आहे. रिओ पॅरालिम्पिकच्या चार पदक विजेत्यांपैकी तिघांना यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे : खेलरत्न : देवेंद्र झाझरिया (पॅरा अॅथलेट) आणि सरदार सिंग (हॉकी). अर्जुन पुरस्कार : चेतेश्वर पुजारा (क्रिकेट), हरमनप्रीत कौर (क्रिकेट), वरूण सिंह भाटी (पॅरा अॅथलेट), प्रशांती सिंग (बास्केटबॉल), एसएसपी चौरसिया (गोल्फ), ओनम बेमबेम देवी (महिला फुटबाल), साकेत मायनेनी (टेनिस), मरियपन्न थंगावेलू (पॅरा अॅथलेट), वीजे सुरेखा (तिरंदाजी), खुशबीर कौर (अॅथलेटिक्स), आरोकिया राजीव (अॅथलेटिक्स), एस व्ही सुनील (हॉकी), सत्यव्रत कादियान (पैलवान), अँथोनी अमलराज (टेबल टेनिस), पीएन प्रकाश (नेमबाज), जसवीर (कबड्डी), देवेंद्रो सिंग(मुष्टियोद्धा).
द्रोणाचार्य पुरस्कार : स्वर्गीय डॉ. रामकृष्णन गांधी (अॅथलेटिक्स), हिरानंद कटारिया (कबड्डी). आजीवन द्रोणाचार्य पुरस्कार : जीएसएसवी प्रसाद (बॅडमिंटन), बृजभूषण मोहंती (मुष्टियोद्धा), पी ए रफेल (हॉकी), संजय चक्रवर्ती (नेमबाज) आणि रोशन लाल (पैलवान). ध्यानचंद पुरस्कार : भूपेंद्र सिंह (अॅथलेटिक्स), सय्यद शाहिद हकीम (फुटबॉल) आणि सुमरई टेटे (हॉकी).