वास्कोत विक्रेत्यांचे पदपथावर पुन्हा ‌अतिक्रमण

मुरगाव पालिकेकडून धूळफेक : वाहनधारक, पादचारी यांना त्रास

09th November 2018, 05:03 Hrs

प्रतिनिधी‍। गोवन वार्ता
वास्को : रस्ते, पदपथावर अतिक्रमणे केलेल्या विक्रेत्यांविरोधात मुरगाव पालिकेने केलेली मोहीम धूळफेक करणारी ठरली आहे. ज्यांची अतिक्रमणे हटविण्यात आली होती त्यांनी पुन्हा अतिक्रमणे करून माल ठेवण्यास आरंभ केला आहे. जुन्या बस स्थानकाच्या पदपथावरील हातगाडे तेथून हटविण्यात आल्यावर संबंधित रस्त्यावर हातगाडे उभे करीत आहेत. त्यामुळे वाहनधारक, पादचारी यांना त्रास सहन करावा लागत आहे.
रस्ते, पदपथावरील अतिक्रमणे हटविण्यासंबंधी काही सामाजिक संस्थांनी मुरगाव पालिकेला निवेदने दिली होती. ती न हटविल्यास उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्यासंबंधी याचिका न्यायालयात दाखल करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मुरगाव पालिकेने अतिक्रमणे हटविण्याची मोहिम १० ऑक्टोबरला हाती घेतली होती. त्यानंतर भाजी मार्केट, मांगोरहिल, शांतीनगर व इतर ठिकाणी विक्रेत्यांनी केलेली अतिक्रमणे हटविण्यात आली होती. तथापी पाच-सहा दिवसांनंतर ही मोहीम बंद झाल्यावर सर्व विक्रेत्यांनी पुन्हा अतिक्रमण करून आपला व्यवसाय सुरू केला आहे. मुरगाव पालिकेने न्यायालयाच्या अवमानापासून आपला बचाव करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली होती. आम्ही अतिक्रमणे हटविली होती, पण विक्रेत्यांनी पुन्हा अतिक्रमणे केली, असे सांगण्यास पालिका मोकळी झाली आहे.
अतिक्रमणे हटविताना पालिकेने बऱ्याच जणांचा माल व इतर वस्तू जप्तच केल्या नाही. विक्रेत्यांना विनंती करून अतिक्रमणे हटविण्यात आली होती. त्यामुळे पालिका अधिकारी, कामगारांनी ही मोहीम किती गंभीरपणे घेतली होती हे लक्षात येते. भाजी मार्केटातील विक्रेत्यांनी आपल्या दुकानासमोरच्या रस्त्यावर पुन्हा वस्तू मांडण्यास आरंभ केल्याने ग्राहकांना मोकळेपणे चालणे कठीण जाऊ लागले आहे. तेथील अतिक्रमणे हटविण्यात आल्यावर मुरगाव पालिकेचे सफाई ट्रक मोकळेपणे मार्केटमध्ये जात होते. परंतु, आता अतिक्रमणामुळे सफाई ट्रक आत जाऊ शकत नाही.
जुन्या बस स्थानकाच्या पदपथावरील हातगाडे हटविण्यात आले होते. तथापी दोन-तीन दिवसांनंतर त्या हातगाडेवाल्यांनी पदपथाऐवजी रस्त्यावरच हातगाडे उभे करण्यास आरंभ केला आहे. तथापी मुरगाव पालिका कोणतीही कारवाई करण्यास तयार नाही.                                                                              

Related news

मोरजीत शौचालयाच्या दुर्गंधीमुळे स्थानिकांत संताप

दोन दिवसांत उपाययोजना न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा Read more

‘केवायसी’ पूर्ततेसाठीच पैसे काढण्यावर निर्बंध

टपाल खात्याकडून ट्वीट संदेशाद्वारे स्पष्टीकरण Read more