‘गोमंत दर्पण’ दिवाळी अंकाचे प्रकाशन


09th November 2018, 05:03 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : दिवाळी अंक हे नव्या साहित्यिकांना प्रोत्साहन देणारे विशेष व्यासपीठ आहे. दिवाळी अंकामध्ये काळाची गरज ओळखून लिखाण केले जात असून गोव्यात गोमंत दर्पण सारख्या दर्जेदार दिवाळी अंकांची निर्मिती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक गुरुदास पिळर्णकर यांनी केले.
साहिल प्रकाशनच्या गोमंत दर्पण या दिवाळी विशेषांकाचे गुरुवारी कला व संस्कृती संचालनालयाचे संचालक गुरुदास पिळर्णकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून पत्रकार प्रभाकर ढगे, प्रमोद कारापुरकर, तुकाराम शेटगावकर, गोमंत दर्पणचे संपादक नीलेश बुगडे उपस्थित होते.
नव्या पिढीसमोर आज असंख्य अाव्हाने उभी आहेत, ती आव्हाने हाताळण्यासाठी व आपले गाव सांभाळण्यासाठी साहित्याचा अास्वाद घेणे गरजेचे आहे. वाचाल तर वाचाल या नियमाप्रमाणे प्रत्येकांनी आपले वाचन वाढविल्यास वैचारिक क्षमता वाढते, असे पिळर्णकर म्हणाले.
सोशल मीडियाचा वापर ज्या प्रमाणे वाढला आहे, त्याचा विचार करता साहित्य, पत्रकारिता यांचे महत्त्व कमी होते की काय असे वाटत आहे. परंतु, छापील शब्दावर जो विश्वास आहे, तो इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रावर नसल्याने अक्षर वाडमय अजूनही जीवन आहे, असे प्रभाकर ढगे यांनी सांगितले.
मराठी वाचन संस्कृती गोव्यात रुजविण्यासाठी, ती वाढविण्यासाठी साहिल प्रकाशन विविध माध्यमातून कार्यरत आहे, असे प्रमोद कारापुरकर यांनी सांगितले.
यावेळी प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन ओमकार गोवेकर, स्वागत साहिल बुगडे व आभार प्रदर्शन नीलेश बुगडे यांनी केले.