साखळीत विविध नवीन प्रकल्पांची पायाभरणी

सभापतींच्या हस्ते शुभारंभ : ५८ लाख खर्चून उभारणार खुले थिएटर


09th November 2018, 05:02 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : साखळी पालिका विभागातील वसंतनगर येथील खुल्या जगाचे सुशोभीकरण व खुले थिएटर उभारण्यात येणार असून या प्रकल्पाची पायाभरणी सभापती व साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत व नगराध्यक्ष धर्मेश सागलानी यांच्या हस्ते करण्यात आली. हे प्रकल्प ५८ लाख रुपये खर्चून गोवा सरकारच्या पालिका संचालनालय निधीतून साकारणार असून या भागाचे रूप पालटणार आहे.
या पायाभरणी कार्यक्रमास नगराध्यक्ष धर्मेश सगलानी, नगरसेविका रश्मी देसाई, राजेश सावळ, दयानंद बोर्येकर, आनंद काणेकर, दामोदर घाडी, यशवंत माडकर, राया पार्सेकर, कुंदा माडकर, ज्योती ब्लॅगन, ब्रम्हा देसाई, मुख्याधिकारी प्रवीण जय पंडित आदी उपस्थित होते. साखळी पालिका विभागातील विकासकामांना चालना देताना साखळीचे रूप पालटून आधुनिक शहराकडे वाटचाल करणार असून अनेक नवे प्रकल्प आगामी काळात साकारणार आहे. संघटितपणे विकासाला चालना देताना सरकारी विविध कार्यालये तसेच अनेक आधुनिक प्रकल्पाना चालना मिळणार आहे, असे सभापती डॉ. सावंत यांनी सांगितले.
नगराध्यक्ष धर्मेश सागलानी यांनी साखळीतील विकासाला चालना देण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत. दिवाळीनिमित्त अनेक विकास योजना हाती घेण्यात आल्या असून सर्वाच्या सहकार्याने सर्वच प्रभागांत विकासाला गती देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे, असे सांगितले.
रश्मी देसाई यांनी हा प्रकल्प आपला स्वप्नावत प्रकल्प असून मोकळ्या जागेत खुले थिएटर व परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. आपण या प्रकल्पाचा गेली चार वर्षे पाठपुरावा करीत आहे. अखेर पायाभरणी झाल्याने खूप समाधानी असून या भागातील लोकांची चांगली सोय होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी साखळी पालिका विभागातील विविध आठ विकास प्रकल्पांची पायाभरणी व कामाचा शुभारंभही करण्यात आला.