‘आयटम बॉय’चे अजब राजकारण

राज- कथा

Story: संजय ढवळीकर |
03rd November 2018, 09:44 am
‘आयटम बॉय’चे अजब राजकारण


.......................
‘अजीब है यह गोवा के लोग...’ असे पहिले पंतप्रधान खरोखरच कधी बोलले होते का याचा इतिहासात अधिकृत पुरावा उपलब्ध नाही. पण गोवाभेटीवर असताना ते तसे म्हणाल्याचा किस्सा बरेच जण छातीठोकपणे रंगवून सांगतात. गोवेकर अजीब नसले तरी गोव्याचे राजकारण मात्र अजब रीतीने चालते याचा जिवंत दाखला म्हणजे सिरील कॉन्सेसांव आणि चिको सापेको यांचे राजकारण!
रुपेरी चित्रपटसृष्टीत अलिकडच्या काळात आपला चित्रपट सुपरहिट करायचा असेल तर त्यात एक-दोन ‘आयटम साँग’ घालण्याची काळजी चित्रपटाचे दिग्दर्शक घेतात. थिल्लर नाचून आंबटशौकीन प्रेक्षकांना आकर्षित करून घेणाऱ्या काही आयटम गर्ल चित्रपटक्षेत्रात प्रसिद्ध आहेत. चित्रपटाची कथा तद्दन, हिरो-हिरॉईन नवोदित, अभिनयाची बोंब असली तरी आयटम गर्लने धमाकेदार आयटम साँग दिले की तो चित्रपट हिट झालाच म्हणून समजा. त्या धर्तीवर सिरील कॉन्सेसांव आणि चिको सापेको हे गोव्याच्या राजकारणातील ‘आयटम बॉय’ ठरावे. अर्थात या आयटम बॉयनी गोव्याचे राजकारण हिट केले ते कोणत्या अर्थाने हा प्रश्न मागे उरतोच.
त्यांना मिळालेल्या यशाकडे बघत त्यांच्या पावलावर पाऊल टाकून असे अनेक आयटम बॉल गोव्याच्या राजकारणात अवतीर्ण झाले आणि वेळोवेळी मतदारांनी त्यांना निवडूनही दिले. सिरील आणि चिको यांच्याप्रमाणेच हे नवे-जुने आयटम बॉय म्हणजे एकाच माळेचे मणी. त्यांची बांधिलकी ना तत्त्वांशी, ना राजकीय पक्षाशी, ना जनकल्याणाशी. असलीच बांधिलकी तर स्वकेंद्रित राजकारणाशी आणि अमाप धन कमवण्याशी.
सिरील कॉन्सेसांवचे विधानसभेत आगमन झाले १९९० मध्ये. तर, नेमक्या एका तपानंतर विधानसभेत अवतीर्ण झाले चिको सापेको. सधन ​मच्छिमार कुटुंबातील सिरील यांचे राजकीय कॅनव्हासवर आगमन मोठ्या धडाक्यात झाले. प्रथमच आमदार बनल्यानंतर लगेचच त्यांना मंत्री व्हायचे होते. परंतु, तेव्हाचे मुख्यमंत्री पुरुषोत्तम काणेंनी ती संधी नाकारली, या रागाने राष्ट्रीय काँग्रेस पक्षात फूट पाडून विरोधकांशी हातमिळवणी करून या महाभागाने सरकारच बदलले. एवढ्यावर न थांबता काही दिवसांपुरता का होईना, थेट मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा मानही त्यांनी मिळवला.
सिरील यांनी आमदार बनून राजकारण सुरू केले त्या दरम्यान चिको सापेको हा हरहुन्नरी गर्भश्रीमंत युवक परदेशात बक्कळ धन कमावून गोव्यात परतला होता. गरजूंना-शेजाऱ्यांना मदत करणे हा जणू काही त्याचा छंद. करता करता आपल्या परिसरात तो लोकप्रिय बनू लागला. हळूहळू राजकारण त्याच्या डोक्यात शिरू लागले. २००२ मधील विधानसभा निवडणुकीत युनिफाईड गाेवन पार्टीच्या तिकिटावर थेट सिरील कॉन्सेसांव यांच्या विरोधात उभा राहिला आणि लोकप्रियतेच्या बळावर जिंकूनही अाला. तेव्हाच सरकार स्थापन करण्यासाठी कमलाक्षदादा केरकरांना एक-दोन आमदारांची कमतरता भासत होती. चिको सापेको कमलाक्षदादांच्या मदतीला धावून गेले आ​णि मंत्रिपद पदरात पाडून घेतले.
सिरील कॉन्सेसांव आमदार म्हणून निवडून आल्याअाल्या काही दिवसांत थेट मुख्यमंत्री बनले होते. चिको सापेकोंनी पहिल्याच प्रयत्नात आमदार बनून लगेच मंत्रिपदी विराजमान होत ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले. तेव्हापासून सुरू झाली दोघांची राजकीय जुगलबंदी. निवडणुकीतील विजय-पराजयाची जुगलबंदी होतीच, त्याचबरोबर व्यक्तिगत गैरवर्तन, पदाच्या वापरातून भ्रष्टाचार, प्रशासनात चुकीच्या पद्धतीने हस्तक्षेप, सरकारी अधिकाऱ्यांवर दादागिरी यातही दोघांनी जुगलबंदीची चुरस लावली होती.
त्यातल्या त्यात नशीब एवढेच की गेल्या तीन दशकांत सिरील कॉन्सेसांव आणि चिको सापेको हे दोघेही आमदार म्हणून एकाच वेळी निवडून येण्याची वेळ एकदाच आली. त्यामुळे त्यांची राजकीय आखाड्यात चालणारी जुगलबंदी विधानसभेच्या सभागृहात फारशी बघावी लागली नाही. २००७ मधील निवडणुकीत दोन वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षांच्या तिकिटावर दोघेही निवडून आले. तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या जगन्नाथ काकोडेंच्या सरकारात सहभागी होण्यासाठी दोघांमध्ये लागलेली ओंगळवाणी चुरस खूपच हास्यास्पद ठरली होती. राजकीय आयटम बनून त्यांनी एकमेकांवर आरोप आणि भलतेसलते दावे करत तेव्हा जनतेचे भरपूर मनोरंजन केले.
पहिल्या दोन निवडणुकांत सिरील आमदार म्हणून निवडून आले तेव्हा चिको राजकारणातच नव्हते. तिसऱ्या निवडणुकीत चिकोंनी सिरीलला आव्हान देण्याचा प्रयत्न केला, तो अपयशी ठरला. त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र सिरील यांचा पराभव करूनच चिकाे निवडून आले आणि आमदार बनले. आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवाव्या लागलेल्या पराभवानंतर सिरील यांनी पुढील निवडणुकीत मतदारसंघच बदलला. शेजारी-शेजारी असलेल्या दोन वेगवेगळ्या मतदारसंघांतून दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या तिकिटावर निवडून येत दोघेही आमदार बनले! जगन्नाथ काकोडे सरकारात काही वर्षे सिरील मंत्री होते, तर काही काळ चिकाे मंत्री बनले.
‘‘सिरील साहेब, आपल्याला गोव्यात पक्ष बळकट करायचा आहे. गोव्यात तुम्ही पक्षाचा ताबा घेऊन दहाएक उमेदवार निवडा आणि निवडणुकीत उतरा. तुमच्यासह दोन-तीन आमदार निवडून आले तर आपला पक्ष सरकारात महत्त्वाची भूमिका बजावेल. तुम्ही किंगमेकर व्हाल बघा.’’ २०१७ मधील निवडणुकीआधी राष्ट्रप्रेमी काँग्रेसचे प्रमुख आणि महाराष्ट्रातील मोठे नेते श्यामराव पाटील यांनी कॉन्सेसांव यांना ऑफर दिली.
अशा एखाद्या ऑफरची ते वाटच बघत होते. कॉन्सेसांव यांनी होकार देताच श्यामराव पाटीलांनी राष्ट्रप्रेमी काँग्रेसची सॅबी पीटर डिसिल्वा यांच्या अध्यक्षतेखालील गोवा शाखा ताबडतोब बरखास्त करून पक्षाची सारी सूत्रे कॉन्सेसांव यांच्या हाती सोपवली. कॉन्सेसांव कितीही वादग्रस्त असले तरी ते निवडून येतील आ​णि ठरावीक मतांची टक्केवारी गोव्यात आपल्याला मिळाली तर महाराष्ट्रापुरती मर्यादित असलेली आपल्या पक्षाची ओळख राष्ट्रीय स्तरावरील पक्ष म्हणून वाढवता येईल हा श्यामराव पाटलांचा राजकीय धोरणीपणा.
एक जरी आमदार निवडून आला तरी गोवा विधानसभेत पक्षाचे अस्तित्व दिसेल आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून दाव्याला बळकटी येईल असे दुहेरी लाभ श्यामराव पाटलांनी बघितले होते. तर, गेल्या काही वर्षांत फुटबॉल संघावर अतोनात खर्च करून कर्जबाजारी बनलेल्या सिरील कॉन्सेसांव यांना विधानसभा निवडणुकीसाठी आपसूक प्रायोजक मिळाल्याचा आनंद होता.
‘‘राष्ट्रप्रेमी काँग्रेसचे दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ नेते प्रशांत पवार हे राष्ट्रीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याशी जवळीक वाढवून आपल्या फुटबॉल संघाची भरभराट करून घेता येईल ते वेगळेच. माझ्या राजकारणाला इथे कलाटणी मिळेल.’’ फुटबॉल संघाची अध्यक्ष असलेल्या आपल्या कन्येपाशी सिरील यांनी मन माेकळे केले. पुढे राष्ट्रप्रेमी काँग्रेसमध्ये आपल्या कन्येला घेऊन तिच्याकडेच पक्षाची धुरा सोपवता आली तर तिच्या राजकीय कारकिर्दीला उभारी मिळेल असे स्वप्न बघत सिरील यांनी २०१७ मधील निवडणुकीचे नियोजन केले. त्यांनी निवडलेल्या उमेदवारांचे सर्वत्र डिपॉझीट जप्त झाले तरी खुद्द सिरील कॉन्सेसांव राष्ट्रप्रेमी काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले!
गंमत म्हणजे मागील एका निवडणुकीत २००७ मध्ये चिको सापेको हेही राष्ट्रप्रेमी काँग्रेसचे उमेदवार म्हणूनच निवडणूक लढवून आमदार बनले होते. दर विधानसभा निवडणुकीच्या वेळी असाच एखादा ‘राजकीय आयटम’ हेरून त्याच्या ताब्यात पक्ष सोपवायचा आणि काही कोटी खर्चून एक-दाेन आमदार गोव्याच्या विधानसभेत निवडून आणायचे हे डावपेच श्यामराव पाटील आ​णि प्रशांत पवार या जोडगोळीच्या राजकारणाचा भाग होते. २०१२ मधील निवडणुकीत त्यांना सॅबी पीटर डिसिल्वा हे असेच एक प्रस्थ सापडले होते. त्यानंतर त्यांनी कॉन्सेसांव यांच्याकडे मोर्चा वळवला होता.
‘‘काॅन्सेसांवच्या पराभवात माझा विजय आहे. त्याला टक्कर देण्यासाठी मी गोवन डेव्हलपमेंट पार्टी हा प्रादेशिक पक्ष स्थापन केला असून मी स्वत: कॉन्सेसांवच्या मतदारसंघात निवडणुकीला उभा राहून त्याला आव्हान देणार आहे.’’ सिरील कॉन्सेसांवला राष्ट्रप्रेमी काँग्रेसचा आधार मिळाल्यामुळे तिकडे चिको सापेकोंचा जळफळाट झाला, तो त्यांनी अशा प्रकारे व्यक्त केला.
त्या निवडणुकीत विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रहित पक्ष यांच्यातच प्रामुख्याने लढत असली तरी सुरावली या एकमेव मतदारसंघात या दोन्ही पक्षांना काहीच स्थान नव्हते. तिथे राष्ट्रप्रेमी काँग्रेसचे सिरील कॉन्सेसांव आणि गोवन डेव्हलपमेंट पार्टीचे चिको सापेको यांच्यातच प्रामुख्याने लढत होती. दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमधील धुमश्चक्रीमुळे संपूर्ण मतदारसंघ संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आला होता. तणावात झालेली ही निवडणूक निसटत्या फरकाने कॉन्सेसांव यांनी जिंकली आणि राजकारणात अजूनही आपणच बाप आहोत हे चिको सापेकाेंना दाखवून दिले.
माजी मुख्यमंत्री असलेल्या कॉन्सेसांव यांना स्मगलिंगप्रकरणी घडलेला तुरुंगवास सापेकाेंनी प्रचारादरम्यान मुख्य मुद्दा बनवला होता, तर मैत्रिणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सापेकोंना मं​त्रिपदाचा राजीनामा देऊन तुरुंगाचा पाहुणचार कसा घ्यावा लागला, हे कॉन्सेसांव यांच्यातर्फे ठळकपणे समोर अाणण्यात आले होते. एकुणातच ‘उडदामाजी काळे गोरे काय ते निवडावे’ अशी परिस्थिती त्या मतदारसंघात होती.
काळे असो अथवा गोरे, शेवटी राजकारणातील एका आयटम बॉयला विधानसभेत पाठवायचे होते. यावेळी मतदारांनी सिरील कॉन्सेसांवच्या बाजूने बहुमत दिले. कोणास ठाऊक, पुढील निवडणुकीत हेच अजब मतदार कॉन्सेसांवना मागे ठेवून सापेकोंना बहुमताने निवडून देणारही असतील!
........................
(लेखक ‘गोवन वार्ता’ चे संपादक आहेत.)
......................
(या कथेतील सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक असून वास्तवाशी त्यांचा कोणताही संबंध नाही.)