नरकासुरांचा सुळसुळाट

कव्हर स्टोरी

Story: गंगाराम म्हांबरे | 03rd November 2018, 09:43 Hrs


------------
रावण, नरकासुर, भस्मासुर, शंकासुर, महिषासुर, कंस अशी नावे घेतली की आठवतात ते अत्याचारी, अविचारी, चारित्र्यहीन राक्षस. त्या वेळी खुद्द ईश्वराने म्हणे जन्म घेऊन अवतारांच्या स्वरुपात येऊन त्यांचा नायनाट केला अशा कथा वाचायला मिळतात. दिवाळी साजरी करायची ती श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला म्हणून. काही का असेना, दसरा असो किंवा दिवाळी, अशा शुभदिनी देवाबरोबर हे असुरही आठवतात! त्या राक्षसांना वेळीच ठेचण्याचे काम पृथ्वीतलावरील मानव करू शकला नसता, म्हणूनच ईश्वराला जन्म घ्यावा लागला असेल. एक मात्र खरे की या राक्षसांना वेळीच नष्ट करून मानवाची सुटका करण्याचे काम फत्ते करण्यात आले. आजच्या कलियुगात जिकडेतिकडे दिसणाऱ्या मानवनिर्मित नरकासुराच्या प्रतिमा पहाटेच्यावेळी भस्मसात करून माणूस आपलीच पाठ थोपटून घेताना दिसतो. तो निरुपद्रवी पुतळा जाळताना त्याला जो आनंद होत असतो, तो कदाचित वाईटावर चांगल्याचा विजय मिळविल्याचा असू शकेल. रात्र जागवायची आणि आपण महिनाभर राबून परिश्रमपूर्वक जन्मास घातलेल्या त्या प्रतिमेला दिवाळीच्या पहाटेला आग लावायची, याचा आनंद तो कार्य वर्णावा? दुष्ट शक्तीचे निर्दालन करणे हाच अशा सणामागे, उत्सवामागे आणि भाविकांच्या उत्साहामागे उद्देश असतो, पण ज्यावेळी आपण जाळू शकत नाही, असे ब्रह्मराक्षस समाजात, राजकारणात जिकडे तिकडे दिसू लागतात, त्यावेळी सामान्य नागरिकाने, मतदाराने करावे तरी काय?
अलीकडे अनेक भागांत नरकासुर प्रतिमांच्या स्पर्धा होत असतात. अशा पुतळ्यांवर हजारो रुपये खर्चून आपला नरकासुर भव्यदिव्य बनविण्याकडे युवावर्गाचा कल असतो. राजकीय क्षेत्रात जर अशी स्पर्धा घ्यायची ठरली तर कोण बरे विजेता ठरेल? अलीकडची पक्षांतरे आणि घोटाळे किती ‘स्मार्ट’ पद्धतीने केले जातात, ते पाहिले की परीक्षकांसमोर मोठेच प्रश्नचिन्ह उभे राहील ! काही वर्षांपूर्वी दक्षिण गोव्यात असाच एक कुप्रसिद्ध नेता निवडून आला होता, त्यावेळी जकातचोरीची चलती होती. स्मगलर अशीच त्याची प्रतिमा राज्यात होती. तरीही ‘वाल्याचा वाल्मिकी’ करण्यात मतदारांनी महत्त्वाची भूमिका बजावून त्याला लोकप्रतिनिधी बनवले. क्रीडा असो किंवा सामाजिक कार्य, त्यात हिरीरीने भाग घेत त्या महाभागाने आपली पापे धुवून काढली. त्याने नेमका कोणता साबण वापरला सांगता येणे कठीण, पण स्वच्छ होत त्याने एकएक पायरी चढत चक्क राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गाठली. नरकासुराने श्रीकृष्णाचे सिंहासन बळकावले असेच त्यावेळी तमाम गोमंतकीयांना वाटले असेल. त्यावेळी नरकासुराशी स्पर्धा करणारे काय कमी होते? त्यांची नावे तरी किती घ्यावीत? लोकांना त्यांनी अक्षरश: आंधळे बनविले होते. एकाने म्हणे गोळीबारही केला, दुसऱ्याने विनयभंग केल्याने प्रकरण गाजले, कोणी उच्च पदावर बसून दारूची निर्यात-आयात करीत सोरोपती बनला! पक्षांतर करण्यात तर आपले नरकासुर सर्वांनाच नवा आदर्श घालून देणारे.
स्पर्धेत बाजी मारु शकणारे अनेक जण आहेत. राजकारणात स्पर्धकांची अजिबात उणीव नाही. उलट कोणाला बक्षिसी द्यायची याचीच पंचाईत अधिक! कोणाला मंत्रिपद हवे तर कोणाला एखादे महामंडळ. अशा स्पर्धकांतील विजेते आणि उत्तेजनार्थ बक्षिसे मिळविणारे ओळखणे अगदीच सोपे आहे. पक्षांतर करणाऱ्यांना मोठे बक्षीस हमखास मिळते. पक्षांतर कोणत्यावेळी करायचे याचे टायमिंग मात्र महत्त्वाचे. त्यानुसार पारितोषिके मिळतात. काणकोण काय किंवा ताळगाव काय, किती वेळा कोणता पक्ष सोडला आणि कोणता पक्ष स्वीकारला याचे स्मरण या स्पर्धकांनाही नसेलच म्हणा. मंत्रिपदे मिळाली नाही म्हणून राजीनामा, महामंडळ दिले नाही म्हणून रुसवाफुगवा. ज्या मतदारांजवळ झोळी घेऊन गेले, ती झोळी फेकायची आणि नव्या रंगाची, नव्या ढंगाची झोळी घेऊन पुन्हा याचक म्हणून मतदारांच्या दारात उभे! या स्पर्धकांची परंपरा खंडित न होता आजही त्याच जोमाने सुरू आहे. जनतेला जाहीरपणे आश्वासने द्यायची आणि खुर्ची मिळाल्यावर चक्क ‘यू टर्न’ घ्यायचा हे आधुनिक स्पर्धकांचे वैशिष्ट्य. केवळ बोलण्यात किंवा वागण्यात यू टर्न घेणे वेगळे पण पक्षाला सोडचिठ्ठी देत, मतदारांनी दिलेली मते कचऱ्याच्या पेटीत टाकून नवे लेबल लावून त्याच मतदारांसमोर जाण्यात या स्पर्धकांना काहीच का कसे वाटत नाही? पक्ष फोडण्यात आणि जोडण्यात आपले नेते किती वाकबगार! त्यांच्या करामती नरकासुरांवरही वरचढ ठरणाऱ्या. त्यांना याबाबतीत प्रोत्साहन देणारे तरी किती स्वार्थी ! पक्षांतरांचे महामेरुच जणू ! काही जणांना पक्षांतराची गाडी चुकली म्हणे, नपेक्षा महाभारतच पाहायला मिळाले असते. या साठमारीत ना घर का, ना घाट का अशी अवस्था होण्याचीच शक्यता अधिक !
नरकासुर प्रतिमा स्पर्धेतील या स्पर्धकांच्या दुष्कृत्यांचा पाढा तरी किती वाचायचा? श्रीकृष्णाने वध केलेला नरकासुर केवळ अत्याचारी होता. दुष्ट प्रवृत्तीचा होता. आता त्याचे नवे अवतार किती आधुनिक, त्यांच्या तऱ्हा तरी किती? मते विकत घेण्यात तरबेज. राजरोस किंमत मोजतात. स्वीकारली नाही तर नोंद ठेवतात म्हणे ! मदतीचा कायम हात पुढे करतात. परप्रांतीयांची निवास व्यवस्था करतात, मात्र स्थानिकांची रिकामी घरे दिसली की यांची ‘बुरी नजर’ त्यावर पडते. मतदारांच्या मुलांचे शिक्षणाचे शुल्क भरतात, इतकेच नव्हे तर अंत्यसंस्काराचा खर्चही उचलतात! मतदाराला एवढा ओझ्याखाली ठेवतात की आपला नेता कुठल्या पक्षात आहे, याचे भान त्या मतदाराला राहातच नाही. यावेळी ‘हाता’ वर शिक्का मारा, मग काही दिवसांनी कमळ, दोन पाने वगैरे चिन्हे दाखवून पुन्हा तेवढ्याच आग्रहाने मतांची मागणी करतात.
तसे पाहाता, स्वाभिमानी मतदारांची संख्या गोव्यात कमी नाही. विचारपूर्वक मतदान करणारे असंख्य. पण धास्ती त्यांचीच, जे मोठ्या संख्येने वाढत आहेत. आता तर उघडपणे सांगताहेत, मंत्रिपदासाठी पक्षाला रामराम केला. महामंडळासाठी पक्ष सोडला! जेवणात चवीला मीठ लागते, तसे विकासाच्या मधाचे बोट लावायचे, त्याहून थोडे अतिगोड म्हणजे नोकरीचे आमिष दाखवतात! चक्क आकडेच सांगतात, अमुक जणांना नोकरी दिली. नोकरी देण्याची ही नवी पद्धत कधी ठरली? सरकारी नोकऱ्यांचा असा लिलाव कधीपासून व्हायला लागला? पहिल्या पायरीवर यांनी म्हणे कोटा वाटप केले होते. अमूक आमदार, अमूक नोकऱ्या! पण नोकरबंदीच लागू केली आणि सारेच थंडावले. आता खाणबंदी राज्यात आहे. गेले अनेक महिने लोकांना झुलवले जात आहे. केवळ तारखा सांगितल्या जात आहेत. अमुक पूल- अमुक तारीख, अमुक रस्ता- अमुक तारीख, खाण व्यवसाय अमुक महिना? सत्तेचा सदुपयोग करण्याची सवय त्यांना राहिलेलीच नाही. सध्या तर अपंगावस्था आली आहे.
नरकासुर स्पर्धकांची राजवट तशी कायमच असल्याचे भासते आहे. ती दिवाळीला संपणार असे वाटत नाही. येनकेन प्रकारे सत्ता उपभोगायचीच, सरकार अस्तित्वात आहे, असे दाखवायचेच! श्रीकृष्णाची कूटनीती वापरून नरकासुरी राज्य राबवणारे आधुनिक स्पर्धक काय काणकोण, ताळगाव, मांद्रेत आणि शिरोड्यातच आहेत? त्यांचा अखंड संचार राज्यात सर्वत्र आहे, सर्व पक्षांत आहे. त्यांची नरकासुर प्रतिमा स्पर्धा एेन रंगात आली असल्याने, आता श्रीकृष्ण शोधायची वेळ जनतेवर आली आहे!
(लेखक ‘गोवन वार्ता’ चे संपादकीय सल्लागार आहेत.)

Top News

दोन दिवसांत १५ लाखांचा माल जप्त

वजन-माप खात्याची सांकवाळमध्ये कारवाई; नोंदणी प्रमाणपत्र न घेताच पॅकिंग Read more

मांद्रेतील अपघातात एक ठार

दुचाकी-चारचाकी वाहनांमध्ये धडक; एक गंभीर जखमी Read more

मतमोजणी केंद्रांवर चोख सुरक्षा व्यवस्था

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार गोवा पोलिसांची कार्यवाही Read more

इस्राईल दौरे नको, कृषी अभ्यासक्रमच हवा

लोबो यांचा कृषीमंत्र्यांना सल्ला; कळंगुटमध्ये २७ शेतकऱ्यांचा सत्कार Read more