मी टू आणि # मी टू

मनसंवेदना

Story: अलका दामले |
03rd November 2018, 09:39 am
मी टू आणि # मी टू


------
आमचा मैत्रिणींचा ग्रुप सहलीला जायचा बेत करत होता. तर एकीने विचारले कोणकोण येणार म्हणून. लगेच एकीने ‘मी येणार’ असे उत्तर पाठवले. त्यानंतर ‘मी सुद्धा’ असे दोन शब्द कोणीतरी उत्तरादाखल लिहिले आणि मग प्रत्येकीने ते दोन शब्द कॉपी पेस्ट करायला सुरुवात केली. मग काय ‘व्हॉटस्अॅप’ फुकट असल्याने एकमेकींनी प्रत्येकीला खोचकपणे विचारायला सुरुवात केली “ए, काय ग? ‘मी टू’ चा अनुभव तुलाही आला का?” शेवटी जिने ‘कोण कोण येणार’ म्हणून विचारले होते, तिने सगळ्यांना नम्र विनंती केली की ‘मी सुद्धा’ चं तुमच्या सुपीक (?) डोक्याने ‘मी टू’ करून मांडलेली ही थट्टा थांबवा आता. ‘मी टू’ चळवळीकडे आपण महिलाच जर एक हसण्यावारी नेण्याची गोष्ट म्हणून पाहणार असू तर आपण समस्त पुरुष जातीला काय कपाळ संदेश देणार? आहे का तुम्हा कोणात धमक, असं तुमच्या बाबतीत केव्हा न् केव्हा घडलेलं सांगण्याची?’ त्यावर कोणीतरी एकीने, ‘# हॅशटॅग नाही ना आम्ही लावला ‘मी टू’ च्या आधी’ असा मेसेज टाकून तिचीच टर उडवली.
मला वाटतं की बहुतांशी स्त्रियांना त्यात ‘मी सुद्धा’ आले, केव्हा न् केव्हा कधी बसमध्ये तर कधी ट्रेनमध्ये तर कधी रस्त्यात चालताना असे ‘चुकून’ लागलेले पुरुषांचे धक्के, त्या ‘आंबट शौकिनां’ चा किळसवाणा स्पर्श जाणवून सुद्धा नाईलाजाने कधी लज्जेमुळे, तर कधी भीतीपोटी दुर्लक्ष करून या पुरुषप्रधान समाजात मूग गिळून सहन करायला लागला असेल. कोणी सांगो किंवा न सांगो. एकतर त्या काळी ‘गुड टच, बॅड टच’ सांगणारे किंवा सेक्स या विषयावर मोकळेपणे मुलींशी बोलणारे पालकही क्वचितच होते. दुसरं म्हणजे मुलींना काय हवं, काय नको याचा फारसा कोणी विचारही करत नव्हते. तिला मनाप्रमाणे वागण्याबोलण्याचं तर फार स्वातंत्र्यही नव्हतं.
आजही खेड्यापाड्यात फार काही परिस्थिती बदलली आहे, असं नाही. त्यातच बाई हीच बाईची सर्वात मोठी शत्रू होती. आपल्या टीव्हीवरील मालिका पाहिल्या तर दुर्दैवाने हे विशेष बदललंय असं वाटत नाही. जोपर्यंत एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला सन्मानाने वागवत नाही तोपर्यंत पुरुषही आपली वृत्ती बदलेल, असं मला तरी वाटत नाही. एक स्त्री आज इतक्या वर्षांनी का होईना, पण तिच्यावर झालेल्या तिला वाटलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करत आहे, हे निश्चितच स्वागतार्ह आहे. स्वागत करावसं वाटत नसेल तर निदान कुत्सितपणे टीका करण्यासारखं त्यात नक्कीच काही नाही. गेल्या काही दिवसांत आपण या चळवळीचा सकारात्मक परिणामही पहात आहोत. अर्थातच कुठल्याही चांगल्या चळवळीचा बरावाईट परिणाम जाणवायला काही अवधी जावा लागतो.
आज खरं तर मिळून साऱ्याजणींनी समाजोपयोगी चळवळीत सहभागी होण्याची गरज आहे. ‘मी टू’ असं म्हणण्याची. विशेषतः आपण स्त्रियांनी ज्यांची पन्नाशी ओलांडली आहे आणि प्रापंचिक जबाबदाऱ्यांतून थोडीफार मुक्तता झाली आहे. त्यांनी ‘मीच का’ असं म्हणण्याऐवजी ‘मी का नाही’ असं म्हणून जर हात गुंफले, तर काही गोष्टी सहज शक्य आहेत. आता हेच बघा ना. स्वच्छ भारत चळवळ सुरु होऊन जवळजवळ दोन वर्षे झाली. आपण महिलांनी माननीय पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे जर आठवड्यातून दोन तास आपल्या परिसरासाठी काढले तर बरंच काही बदलता येईल. स्वच्छ भारत चळवळीमुळे, अजूनही जरी हवा तेवढा योग्य बदल दिसत नसला तरी नागरिकांना जाणीव होऊन रस्तोरस्ती पसरलेला कचरा आणि त्याचे योग्य निर्मुलन होत आहे की नाही याचा आढावा जनता घेऊ लागली. वर्तमानपत्रात अशा गलिच्छ जागांचे रोज फोटो छापून येऊ लागले, ज्यामुळे पंचायत, नगरपालिका त्याची दखल घेऊ लागल्या. वातावरणाला हानिकारक वस्तूंबद्दल समाजाचं प्रबोधन होताना आज दिसत आहे. महात्माजींनी म्हटल्याप्रमाणे “कुठलाही हवा असलेला बदल हा सर्व प्रथम आपल्या स्वतः पासून सुरु होणे जरुरी असते”.
बाबा आमटे यांच्या आनंदवनातलं एक वाक्य खूप काही सांगून जातं. ते म्हणतात, ‘एखाद्या कार्याची तळमळ असेल तर तुम्ही स्वतः ते सुरु करणं जरूर आहे. ते करताना काही जण तुमच्या मागे येतील तर काही टीका करत तोंड फिरवतील. पण, जर तुम्ही काही केलंच नाही तर यातलं काहीही होणार नाही आणि मग ‘इप्सित कार्य’ ही होणार नाही.’ तेव्हा जर एखादी गोष्ट करताना आपण स्वतः प्रामाणिक, सच्चे, ठाम असू तर कोण काय म्हणेल याची पर्वा न करता ती करण्यातच जीवनाची कृतार्थता आहे.
शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यात आणि पर्यायाने प्रत्येक समाजात बदल हीच एक स्थिर स्थिती आहे. होणारा बदल हा योग्य, अयोग्य याचे अवलोकन करणं जरूरी आहे. बदल अयोग्य असेल तर दुर्लक्ष न करता सकारात्मक पावलं वेळेवर उचलून समाजहित जोपासायला हवं. एरवी आपण सरकार कसं नालायक आहे म्हणून, रेल्वे रूळावरील मृत्यू पावलेल्यांना ही सरकारला जबाबदार ठरवणार.
आज मला वाटतं प्रत्येकाने ‘मी टू’ म्हणून स्वतःला समाजाचं ऋण फेडण्यासाठी जे काही करता येणं शक्य आहे, ते करणं आवश्यक आहे. महिन्यातून निदान एकतरी रविवारी दोन तास आपण एकत्र जमूया ना. एक दिवस नाश्ता, घरातील इतरांना सांभाळू द्यायला काय हरकत आहे? आपण प्रयत्न केला तरच आपले नगरसेवक, पंच आपली दखल घेतील, एरवी एकदा निवडून आले की हे तोंडही दाखवत नाहीत. कारण त्यांना चांगलं माहीत आहे की आपल्यालाच काही सोयरसुतक नाही. क्वचित ‘फोंडा नारी शक्ती’ सारखा एखादा ग्रुप असेल जो कार्यरत राहून अधिकाऱ्यांना त्यांच्या परिसरातील समस्यांची जाणीव करून देतो, त्यांचं काम करायला उद्युक्त करतो.
आजच्या या लेखाचा उद्देश ‘मी टू’ म्हणून महिलांना सामाजिक कार्यासाठी एकत्र आणणं हाच आहे. ‘# मी टू’ या चळवळीला समाज माध्यमांनी उचलून स्त्रियांना एकप्रकारचं बळ दिलं. त्याच्या जोरावर आपण काही सकारात्मक करण्यासाठी सुद्धा पुढे यायलाच हवं. आपली शक्ती दाखविण्यासाठी परत अशी संधी मिळणं दुरापास्त. हा लेख लिहित असताना कोणीतरी एक नारी शक्तीला सलाम करणारी कविता पाठवली. “ती कायम ऑनलाईन असते, म्हणून सलाईनवर नसते, तर लाइफ लाईनवर असते, तिच्यात दुर्गेची ऊर्जा असते”. चला तर मग, आज समाजकार्याचा वसा घेऊ या आणि म्हणूया, “उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही”.
(लेखिका समुपदेशक, समाजसेविका आहेत.)