खाशोज्जी- बीन सलमान- ट्रंप एकाच माळेचे मणी!

प्रासंगिक

Story: दीपक लाड |
03rd November 2018, 09:37 am
खाशोज्जी- बीन सलमान- ट्रंप एकाच माळेचे मणी!


--
आपली तुर्क प्रेयसी हतीचे चेंगीझ हिच्याशी विवाहबद्ध होण्यासाठीची जरुरी कागदपत्रे मिळवण्यास २ ऑक्टोबरला तुर्कीतील साैदी अरेबियाच्या दूतावासात शिरत असताना पत्रकार जमाल खाशोज्जी (खशोजी, खशोगी) शेवटचाच दिसला. तो गायब झाल्यावर त्याचा खून साैदीच्या राजकुमाराने हेतुपुरस्सरपणे घडवून आणला असल्याबद्दल संशयाच्या वावड्या उठल्या होत्या. तपासादरम्यान साैदी राजदूतांच्या सदनिकेच्या बागेत खाशोज्जीच्या शरीराचे काही तुकडे सापडले. त्यामुळे घटनेदिवशी विशेष विमानाने साैदीहून अंकारातल्या दूतावासात तातडीने पोहोचलेल्या १५ जणांच्या पथकाने त्याचा निर्घृण खून करून शरीराचे तुकडे केले असल्याच्या आरोपाला बळ मिळाले.
या खूनी कारस्थानाचा कट सप्टेंबर महिन्यातच शिजवला गेला. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष राचेप ताय्यिप एरदोगान यांनी आपल्या सूत्रांचा हवाला देत तसा गौप्यस्फोट केला आहे. आता खुद्द साैदी अरेबियातील प्रॉसेक्युटरनेही कट पूर्वनियोजित असल्याचे भाष्य करून याला दुजोरा दिला आहे. हा सगळा अघोरी प्रकार साैदी राजकुमार मोहम्मद बीन सलमान याच्या संगनमताशिवाय घडविण्याचे साहस करायला तिथला कुणीही धजणे अशक्यप्राय. या प्रकरणाने मध्यपूर्व तर ढवळून निघालाच, पण त्याचे पडसाद जगभर उमटले. त्यामुळे नाईलाजाने या प्रकरणाचा तपास करून एका महिन्यात अहवाल सादर करणार असल्याचे आश्वासन बीन सलमानने देत जागतिक आक्रोश काही अंशी शमवण्याचा प्रयत्न केला.
तपासाला आरंभ होण्याआधीच ‘त्या’ पंधरा जणांत सहभागी असलेल्या एकट्याचा अपघाती मृत्यू झाला आहे. अपघात बव्हंशी घडवूनही आणला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आता इतर प्रमुख आरोपींची गत काय होणार आहे, त्याच्याकडे जगाच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, या प्रकरणाची धग या मागचा मुख्य कारस्थानी- कर्ता, करविता- राजकुमार बीन सलमानपर्यंत कशीच पोहोचवू दिलेली नसेल. कारण पाताळयंत्री कटकारस्थाने रचण्याच्या किमयेत त्याच्या तोडीचा आज रियाधच्या राजघराण्यात दुसरा सापडणार नाही.
उतारवय आणि आजाराने ग्रस्त वडिलांकडून सत्ता काबिज करण्यासाठी बीन सलमान अधीर झाला आहे. गादीवर दावा ठोकणाऱ्या त्याच्या चुलत भावांचा विरोध मोडीत काढत देशाचा संरक्षणमंत्री असलेला सलमान राज्यशासनात आपला जम बसवून आपल्या वडिलांचा रिमोट कंट्रोल बनला आहे. याआधी भ्रष्टाचार विरोधी कारवायांखाली त्याने राजकुमार, त्यांचे खास लोक आणि श्रीमंत धंदेवाईकांना पंचतारांकित हॉटेलांत डांबून ठेवले होते. प्रश्नोत्तराच्या दरम्यान त्यांचा छळ मांडला गेला. त्यात एकटा दगावलाही. या तथाकथित भ्रष्टाचाऱ्यांकडून त्यांनी देशाचे लुटलेले १०० अब्ज डॉलर आपण वसूल केले असल्याची दवंडी पिटवून सलमानने जनतेचा विश्वास संपादला आहे.
या प्रकारात कायदेशीर काहीच नव्हते. एकप्रकारे ही एक रक्तहीन क्रांतीच म्हणावी लागेल. या मोहिमेदरम्यान तीन राजकुमार गायब झाले ही बाबदेखील जनतेने गंभीरपणे घेतली नाही. याचे कारण स्त्रियांना एकटे हिंडण्या- फिरण्याची आणि कार चालवण्याची मुभा देत बीन सलमानने स्त्रियांची मने जिंकली आहेत. दुसरीकडे पाश्चात्य देशांतून उद्योजकांना आमंत्रित करून देशात नवे उद्योगधंदे लावत रोजगार वाढविणार असल्याचे सांगून तरुणांना खूश केले आहे.
जमाल खाशोज्जीच्या खुनाच्या संदर्भात अमेरिका आणि पाश्चात्य जगतातील अनपेक्षित आक्रोशाचे प्रमुख कारण म्हणजे खाशोज्जी हा अमेरिकेचा रहिवाशी झाला होता. तो ‘वाॅशिंग्टन पोस्ट’ मध्ये स्तंभलेखन करायचा. त्याचे कुटुंब मुळचे तुर्कीचे. त्याचे आजोबा साैदी अरेबियाचे संस्थापक अब्दुल अझिझ अल-साउद यांचे वैयक्तिक डॉक्टर होते. जमाल राजघराण्याच्या सानिध्यात वाढला असल्याने एका क्रूर हुकूमशाही राजवटीच्या पोलादी पडद्यामागचे शह, काटशह आणि खुनशी कारस्थाने त्याने जवळून पाहिली असणे स्वाभाविक आहे. राजघराण्याशी नाते असलेल्या ओसामा बीन लादेनशी (अल कायदाचा अतिरेकी) तरुणपणी त्याचे मित्रत्वाचे संबंध होते. मुस्लीमबहुल देश शरियाखाली आणण्यासाठी प्रयत्नशील जहाल आतंकवादी संघटना ‘मुस्लीम ब्रदरवूड’ चा तो हितचिंतक होता. आतंकी कारवायांत या संघटनेच्या दोषी आढळलेल्या सदस्यांना इजिप्तच्या न्यायपालिकेने फासावर लटकवलेय. त्यांचा म्होरक्या आणि काही सभासद आजही तिथे तुरुंगवास भोगत आहेत.
ऐंशीच्या दशकात उच्चभ्रू समाजात पार्ट्या झोडणारा, हॉलिवूड तारकांच्या घोळक्यात दिसणारा कुख्यात गुलछबू आंतरराष्ट्रीय शस्त्रदलाल अदनान खाशोज्जी हा जमाल खाशोज्जीचा चुलता. राजघराण्यातील सभासदांची बाजू घेत जमाल खाशोज्जी आधी बोलायचाही. मामला कुठे तरी बिनसला असावा आणि जमालने सूर बदलला. तो त्यांच्या विरोधात बोलायला लागला. आता उतारवयात उदारमतवादी बनत आपल्या स्तंभातून तो राजघराण्याची वाढती एकाधिकारशाही आणि त्यांनी चालविलेले जनतेच्या अधिकारांचे खच्चीकरण यावर सडकून टीका करायचा. त्यामुळेच हल्लीच्या काळात बीन सलमानच्या डोळ्यांत तो खुपत होता. याच कारणाने त्याचा पद्धतशीर काटा काढला गेला असावा. खाशोज्जीची हत्या निंदनीय असली तरी त्याच्या पार्श्वभूमीवर कटाक्ष करता तोही तसा धुतलेल्या तांदळासारखा स्वच्छ नक्कीच नव्हता.
लोकशाही शक्तींना, मानवी मूल्यांना जोपासणारा, दिशा दाखविणारा असा काहीसा अतिशयोक्तीपूर्ण भंपक प्रचार अमेरिकेबद्दल आजपर्यंत आपण नेहमीच ऐकत आलोय. पण, इतिहासाची पाने चाळल्यास वस्तुस्थिती मात्र या विपरीत असल्याचे आढळून येईल. जगातल्या या महान लोकशाहीतल्या सरकार आणि राष्ट्राध्यक्षांनी वेळोवेळी आफ्रिका, मध्यपूर्व, बाल्कन उपखंडातल्या राष्ट्रांतील हुकूमशहा आणि एकाधिकार शक्तींना आर्थिक मदत केली आहे. ती तिथली खनिज संपदा अथवा तेलसाठ्यावर डोळा ठेवून असेलही! त्या देशांतल्या लोकशाहीसाठी आग्रह धरणाऱ्या गटांना नेस्तनाबूद करण्यासाठी हुकूमशहांना शस्त्रेही पुरवली आहेत. या देशांतले सरकार विरोधात आवाज उठणारे ‘खाशोज्जी’ लाखोंच्या संख्येने मारले गेलेत.
आतापर्यंत आपल्या मायदेशापासून दूर कोरिया, व्हिएतनाम, जपान, इराक, इराण, अफगाणिस्तान सारख्या देशांतील भूमीवर युद्धात सहभागी झालेल्या अमेरिकेने नागरिक आणि सैनिक धरून लाखोंची कत्तल घडवून आणलीय. पाद्रीसारखी प्रवचने देणाऱ्या ‘संस्कारी’ बराक ओबामाच्या आठ वर्षांच्या कारकिर्दीतही तब्बल ३० हजार बाँब शत्रूसैन्यावर फेकले गेले आहेत. ट्रंप महाशयांनाही हुकूमशहा आणि दहशतवादी जाम आवडतात. उत्तर कोरियाचा किम जाॅग-उन हा ट्रंपला सतत शिव्या घालायचा, धमक्या द्यायचा आणि ट्रंपही त्याला ‘लीटल रॉकेटमॅन’ म्हणत हिणवायचा. तरी त्याला भेटण्यासाठी ट्रंप जी- ७ परिषद अर्ध्यावर सोडून सिंगापूरला धडकले.
देशातले कायदे, न्यायालये यांना धाब्यावर बसवून ड्रग माफियांना नष्ट करण्याच्या नावाखाली आपल्याच देशवासियांना कंठस्नान घालणाऱ्या आणि टीका करणाऱ्या बराक ओबामांना आईवरून शिव्या हासडणाऱ्या फिलिपिन्सचे सर्वेसर्वा रॉड्रीगो दुतार्ते यांची गळाभेट घ्यायला आता ट्रंप भलतेच आतुरलेले दिसताहेत. ट्रंप यांना ९/११ च्या हल्ल्यात आपल्या (अमेरिका) देशाचे जुळे टाॅवर पाडून तीनेक हजार लोकांचे प्राण घेणारा आणि सहा एक हजारांना जखमी करणारा ओसामा बीन लादेनचा हेवा वाटायचा. का तर म्हणे त्याच्या एका इशाऱ्यावर त्याचे हजारो पाठीराखे आपल्या प्राणांची आहुती द्यायला तयार असायचे.
सौदी राजघराण्याशी जवळचे संबंध असलेल्या लादेनचा चुलता आणि चुलत भावांच्या बांधकाम धंद्यात ट्रंपची आस्थापने पार्टनर आहेत. पूर्वी ट्रंप उद्योगधंदे आर्थिक अडचणीत ग्रस्त असताना तिथल्या राजघराण्याने त्याला आर्थिक मदतही केली होती. राजकुमार बीन सलमानशीही ट्रंपचे चांगले संबंध आहेत. सहा महिन्यांपूर्वी त्याच्या तीन आठवड्यांच्या अमेरिका भेटीवेळी त्याची अमेरिकेत चांगली बडदास्त ठेवली गेली होती. कधी अरबांचा पायघोळ झगा घालून तर कधी सूट बूट अवतारात त्याने आंतरराष्ट्रीय मुद्राकोषाच्या क्रिस्तीन लागार्ड, वर्जिन विमान कंपनीचे रिचर्ड ब्रॅनसन, अमेझॉनचे जेफ बेझोस आणि अनेक उद्योजकांच्या भेटी घेत आपल्या देशाच्या आर्थिक विकासात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. दोहोंतील करारानुसार अमेरिका त्याच्या देशाला पुरवणार असलेल्या साडेबारा अब्ज डॉलर किमतीच्या शस्त्रास्त्रांची यादी घेऊन ट्रंप स्वतः त्याच्याबरोबर बसलेले दिसले. अमेरिकेची कॉँग्रेस दबाव आणत असली तरी या जवळिकीमुळे ट्रंप साैदींवर खाशोज्जीप्रकरणी कडक निर्बंध घालायचे टाळत आले आहेत.
अमेरिकन सरकारचाही नाईलाज झालेला दिसत आहे. कारण पाकिस्तान चीनचा मांडलिक बनल्यापासून इराणला शह देण्यासाठी अमेरिकेसाठी जगाच्या या भागात साैदी अरेबियाच उरला आहे. किंबहुना साैदी आणि इस्रायलच्या चिथावणीमुळेच ट्रंप, ओबामानी इतर पाच राष्ट्रांना बरोबर घेत इराणबरोबर संयुक्तपणे केलेला अण्वस्त्रबंदी करार एकतर्फी मोडीत काढला. अमेरिकेला एकट्या खाशोज्जी प्रकरणामुळे साैदीशी पुढच्या दहा वर्षांच्या साडेतीनशे अब्ज डॉलर शस्त्रास्त्र करारांना मुकायचे नाही. अमेरिकेने निर्बंध लादल्यास दुसऱ्या बाजूला चीन आणि रशिया सलमानला कवेत घेण्यास उत्सुक आहेत. त्याने किती खाशोज्जी मारले याच्याशी त्यांना कर्तव्य नाही. कारण शी जिनपींग आणि पुतिनला यात नवं असं काहीच नाही. सत्तेत राहण्यासाठी या द्वयीने असले अनेक प्रकार केले आहेत आणि आजही करीत आहेत. जिनपींगने त्याची प्रेमप्रकरणे आपल्या मासिकांत छापण्याचा हट्ट धरून बसलेल्या संपादकाला गायब केला तर इंग्लंडमध्ये शरणागती घेतलेल्या पूर्व रशियन गुप्तहेरावर केलेल्या विषप्रयोगामागे पुतीनचा हात होता.
तसे पाहता अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेने (सीआयए) एवढी दशके आपल्या विरोधकांचे गुप्तपणे अपहरण करून त्यांचा शारिरीक आणि मानसिक छळ मांडला. बऱ्याचजणांना ठार मारले. त्याच्या तुलनेत सलमानचे कृत्य हा पोरखेळ ठरतो. खुनापूर्वी खाशोगी आणि त्याचे ‘भावी’ मारेकरी यांच्यात झालेल्या संभाषणाची तुर्की सरकारकडे असलेले रेकॉर्डींग ऐकण्यासाठी ट्रंप यांनी सीआयएची प्रमुख जीना हास्पेलला अंकाराला पाठविले होते. पण, विरोधाभास असा की ही बया सीआयएची फिल्ड एजंट असताना इंडोनेशियात तपासाच्या वेळी संशयितांचा शारिरीक छळ मांडणाऱ्या गटाची सदस्य होती. आजही सीआयएने विकसित केलेल्या शारिरीक छळ प्रकारांचा कित्ता जहाल दहशतवादी संघटना अदबीने गिरवत असल्याचे दिसते.
या सगळ्या दारूण सत्यतेची पुरेपूर कल्पना असताना अमेरिकी आणि युरोपीयन लेखक, विचारक, समाजसेवक, वार्ताहर, राजकारणी डोळ्यांवर झापड ओढून हल्ली खाशोज्जी प्रकरणाला लोकशाही, मानवतावादाची फोडणी देत प्रसारमाध्यमांत विनाकारण ऊर बडवत असलेले चित्र दिसते. आजच्या जगात खाशोज्जी, बीन सलमान, ट्रंप, पुतीन, शी जिनपींग ही सगळीच पात्रे तसे पाहता एकाच माळेचे मणी!