शिरोड्यातील भाजप कार्यकर्ते संभ्रमात

महादेव नाईक यांच्याशी चर्चा करूनची पुढील निर्णय


23rd October 2018, 07:07 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता

फोंडा : शिरोड्याचे माजी आमदार सुभाष शिरोडकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजप कार्यकर्ते सध्या संभ्रमात आहेत. शिरोडकर यांना स्वीकारण्याबाबतचा निर्णय माजी मंत्री महादेव नाईक यांच्याशी बैठक घेतल्यानंतरच घेतला जाईल, अशी भूमिका सध्या येथील भाजप कार्यकर्त्यांनी घेतली आहे. मात्र, सुभाष शिरोडकर यांनी भाजप कार्यकर्त्यांची विरोध नसल्याचा दावा केला आहे.

सुभाष शिरोडकर यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने, काँग्रेसने त्यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. शिवाय त्यांनी जाहीर नाराजीही व्यक्त केली आहे. आगामी पोटनिवडणुकीमध्ये त्यांना पराभूत करण्याचा इशाराही दिला आहे. एका बाजूने शिरोडकर यांच्यावर काँग्रेस नाराज आहे तर, भाजप कार्यकर्त्यांनी अद्याप त्यांना स्वीकारलेले नाही.

याविषयी भाजप कार्यकर्त्यांना विचारले असता, ज्येष्ठ नेत्यांनी शिरोड्यात येऊन आमची भेट घेतली असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत महादेव नाईक उपस्थित नव्हते. त्यामुळे अजून कोणताच निर्णय झालेला नाही. महादेव नाईक हे आमचे नेते आहेत. त्यांची भेट घेतल्यानंतरच आम्ही सुभाष शिरोडकरांच्या स्वीकृतीबद्दल निर्णय घेऊ, असा खुलासा त्यांनी केला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते गोव्यामध्ये येण्याची अपेक्षा आहे. ते आल्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक होणार असल्याचे एका कार्यकर्त्याने सांगितले. राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, खासदार अॅड. नरेंद्र सावईकर आणि इतर नेत्यांनी शिरोड्यात येऊन बैठक घेतली आहे, असे या कार्यकर्त्याने सांगितले.आम्ही भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत. महादेव नाईक यांच्यासाठी आम्ही खूप काम केले आहे. म्हणूनच त्यांची भेट घेतल्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेणार आहोत, असे या कार्यकर्त्यांनी सांगितले.

भाजप कार्यकर्त्यांचा विरोध नाही : शिरोडकर

याबाबत सुभाष शिरोडकर यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचा विरोध नसल्याचे सांगितले. मी भाजपच्या गटाबरोबर बैठक घेणार आहे. येत्या काही दिवसांतच ही बैठक होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, काँग्रेस नेते आणि गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी शिरोड्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे सुरू केले आहे; मात्र विधानसभेचा उमेदवार कोण असेल ? हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.