आल्वारा जमिनींचा प्रश्न सोडवण्यासाठी आयोग स्थापन करा

मोर्ले-सत्तरी येथील बैठकीत सर्वानुमते ठराव संमत


22nd October 2018, 07:01 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता

नगरगाव : आल्वारा आणि इतर वर्गांतील जमिनींचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने विशेष आयोग स्थापन करावा, असा महत्त्वपूर्ण ठराव मोर्ले सत्तरी येथे सातेरी मंदिरात सोमवारी झालेल्या बैठकीत एकमताने संमत करण्यात आला. या बैठकीत हरिश्चंद्र गावकर, विश्वेश प्रभू, सुशांत पास्ते, विष्णू पारोडकर, कृष्णा नाईक, शशिकांत गावकर, नकुळ राणे, भिकाजी गावस आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

राज्यात आल्वारा आणि अन्य वर्गांतील जमिनींच्या मालकी हक्काचा प्रश्न जटील बनला आहे. हा भूमिपुत्रांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी साेमवारी मोर्ले सत्तरी येथी सातेरी मंदिरात विशेष बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी सामाजक कार्यकर्ते विश्वेश प्रभू यांनी ‘विशेष आयोग स्थापन करावा’, असा ठराव मांडला. याला विष्णू पारोडकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर एकमताने हा ठराव संमत करण्यात आला.

याप्रसंगी आंतोनियो पिंटो म्हणाले, सत्तरीतील भूमिपुत्र खडतर आयुष्य जगत आहे. पोर्तुगीजकाळापासून हे भूमिपुत्र घरे बांधून आणि शेती, बागायती करून आपला चरितार्थ चालवत आहेत, पण त्यांना अजून जमीन मालकी मिळालेला नाही. वन विभागाने जनतेच्या जमिनींवर कब्जा केला आहे. आता याविरोधात उच्च न्यायालयात जाण्याशिवाय गत्यांतर नाही, असे ते म्हणाले.

सत्तरीतील मालकी हक्कापासून वंचित असलेल्या भूमिपुत्रांनी एकसंध राहिले पाहिजे. लोकांनी एकत्रितपणे आल्वारा किंवा इतर वर्गांतील जमिनींच्या मालकी हक्काविषयी लढले पाहिजे, असे मत हरिश्चंद्र गावकर, भिकाजी गावस, पारोडकर, सुशांत पास्ते यांनी मांडले. पोर्तुगीज सरकारनेदेखील लोकांना जमिनी देताना मालकी हक्क दिले होते. पण गोवमुक्तीनंतर आम्ही पारतंत्र्यात जीवन जगत आहोत, अशी खंत शशिकांत गावकर, नकुळ राणे, कृष्णा नाईक यांनी व्यक्त केली.