मुख्यमंत्र्यांच्या ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ भेटीची काँग्रेसची मागणी


23rd October 2018, 06:19 pm


प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : सरकारकडून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती दिली जात नाही. एकीकडे त्यांचे आरोग्य सुधारत असल्याचा दावा करून भाजपचे पदाधिकारी, मंत्री, आमदार त्यांना भेटतात पण विरोधी पक्ष काँग्रेसकडून वेळोवेळी त्यांच्या भेटीची मागणी करूनही दाद दिली जात नाही. अलिकडेच त्यांनी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या बैठकीचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अध्यक्षपद भूषविले. त्यामुळे निदान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तरी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसला भेट द्यावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी केली.

येथील पत्रकार परिषदेत बाबू कवळेकर यांनी ही मागणी केली. याप्रसंगी पर्येचे आमदार प्रतापसिंग राणे, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड उपस्थित होते. भाजप सरकारकडून लोकशाहीचे धिंडवडे काढले जात आहेत. मुख्यमंत्री आजारी असल्याने राज्यातील प्रशासन ठप्प झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत वैद्यकीय बुलेटीन जारी केले जात नाही. राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्याकडे चारवेळा निवेदन सादर करूनही प्रतिसाद मिळत नाही. मुख्यमंत्र्यांची भेट मागितली असता, प्रतिसाद मिळत नाही. भाजपचे पदाधिकारी, मंत्री, आमदार मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात पण जनतेने निवडून दिलेल्या काँग्रेस आमदारांना भेटण्यास मुख्यमंत्री पर्रीकर का तयार नाहीत, असा सवाल बाबू कवळेकर यांनी केला.

अलिकडेच गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक झाली. मंडळाच्या कायद्याप्रमाणे ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणे गरजेचे आहे. प्रत्यक्ष या बैठकीला हजर राहू न शकल्याने मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले. तब्बल चार तास ही बैठक चालली. मुख्यमंत्री पर्रीकर या बैठकीचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अध्यक्षपद भूषवू शकतात तर त्यांनी काँग्रेस आमदारांची भेटही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घ्यावी. यात त्यांना काहीच अडचण असता कामा नये. यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडे संपर्क साधून मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्सरन्सिंग भेट देण्याची विनंती करण्यात आली आहे. जनतेचे प्रतिनिधी या नात्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. लोकप्रतिनिधींना मुख्यमंत्री भेटत नसतील तर तो जनतेचा अपमान ठरतो. त्यामुळे किमान यावेळी तरी काँग्रेस आमदारांना भेट देऊन समस्या एेकतील, अशी अपेक्षा बाबू कवळेकर यांनी व्यक्त केली.

...

राज्यात सरकार अस्तित्वातच नाही : राणे

एखादी व्यक्ती आजारपणामुळे आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडू शकत नसल्यास त्यांनी आपल्याकडील जबाबदारी अन्य नेत्याकडे देऊन विश्रांती घेणेच उचित ठरेल, असे माजी मुख्यमंत्री तथा पर्येचे आमदार प्रतापसिंग राणे म्हणाले. राज्यात सरकार नावाची गोष्ट राहिलेली नाही. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रसंग घडत असून तो लोकशाहीसाठी उचित नाही, असेही राणे म्हणाले.