काँग्रेसचा ‘आयपीबी’वर मोर्चा

विशेष अधिकाऱ्याला कार्यकर्त्यांना घेराव


23rd October 2018, 06:18 pm


प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : गोवा राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (आयपीबी) १७ ऑक्टोबरला आयोजित केलेल्या बैठकीत अध्यक्ष या नात्याने मुख्यमंत्री पर्रीकरांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती दर्शविल्याचे पुरावे सादर करावे, अशी मागणी करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाटो येथील आयपीबीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपस्थित असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशेष अधिकाऱ्याला (ओएसडी) घेराव घातला.
यावेळी आयपीबीचे विशेष अधिकारी (ओएसडी) तुळसीदास पै यांनी आंदोलनकर्त्यांना समाधानकारक उत्तर दिले नाही. मात्र, त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल प्रकाश या प्रकरणी प्रसिद्धी पत्रक काढून स्पष्टीकरण देतील, अशी माहिती पै यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता अमरनाथ पणजीकर यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी स्पष्टीकरण न आल्यास पुन्हा मोर्चा काढण्याचा इशारा पणजीकर यांनी दिला.
आयपीबीच्या १७ रोजी झालेल्या बैठकीत सुमारे २०० कोटींचे ८ प्रकल्प मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे. सीईओ विशाल प्रकाश यांनी या बैठकीला उपस्थिती लावली होती. मात्र, मुख्यमंत्री आजारी असल्याने त्यांच्या उपस्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कुणालाही मुख्यमंत्र्यांना भेटण्यास दिले जात नसताना ते व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे बैठक कसे हाताळू शकतात, अशी शंका पणजीकर यांनी व्यक्त केली. या बैठकीची सत्यता पडताळणी करण्यासाठी आयपीबीवर मोर्चा काढून स्पष्टीकरण मागितल्याचे त्यांनी सांगितले.
सीईओ उपस्थित नसल्याने ओएसडी तुळसीदास पै यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अपूर्ण माहिती दिली. आयपीबीच्या बैठकीत मंत्री रोहन खंवटे, मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा, सीईओ विशाल प्रकाश, मंडळाचे सदस्य गिरीश भर्णे, राजकुमार कामत आणि इर्नेस्ट डायस उपस्थित होते, अशी माहिती पै यांनी दिली. मात्र, मुख्यमंत्री पर्रीकरांच्या व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे उपस्थितीबाबत ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. या बैठकीत अध्यक्ष उपस्थित नसल्यास ती बैठक बेकायदेशीर ठरते. त्यामुळे या प्रकरणी योग्यवेळी न्याय मागितला जाईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी पणजीकर यांच्यासह पणजी गट समितीचे अध्यक्ष प्रसाद आमोणकर, जनार्दन भंडारी, केपेचे नगराध्यक्ष दयेश नाईक, अॅड. दिया शेटकर व इतर कार्यकर्ते होते.