गुंतवणूक मंडळाद्वारे जमिनींची सौदेबाजी

काँग्रेसचा भाजप सरकारवर आरोप


23rd October 2018, 06:17 pm


प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाद्वारे खास मर्जीतील लोकांना आणि दिल्लीतील श्रेष्ठींकडून शिफारस केलेल्या लोकांना जमिनी लाटण्याची सौदेबाजी भाजप सरकारकडून सुरू आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी केला. मंडळाच्या सर्व व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या कारभारावर टीका करणारे नेते भाजप आघाडी सरकारचेच घटक आहेत. या नेत्यांकडून मंडळावर भ्रष्टाचाराचे आणि घोटाळ्यांचे आरोप झाले होते. हे सरकार स्थापन करताना मंडळाच्या सर्व निर्णयांचा फेरविचार होईल, असे सांगण्यात आले होते. आता हेच नेते मंडळाच्या बैठकांना हजेरी लावून प्रकल्पांना मंजुरी देत असल्याचे पाहायला मिळते, असे कवळेकर म्हणाले. आतापर्यंत सुमारे १७० प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या मंडळाकडून सर्व कायदे आणि नियम धाब्यावर बसवून प्रकल्पांना मंजुरी दिली जात आहे. शेतजमीन, बागायती जमिनींचे सर्रासपणे रूपांतर सुरू आहे. या सर्व घटनांवरून येथील जमिनींचा सौदा करण्यासाठीच भाजपने गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ स्थापन केले की काय, असा संशय बळावत असल्याचा टोला कवळेकर यांनी हाणला.
दिल्लीतील भाजप नेते तथा श्रेष्ठींकडून शिफारस केलेल्या लोकांना तसेच खास मर्जीतील लोकांना गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमाने जमिनी लाटण्याचा मुक्त परवाना भाजपकडून दिला जात आहे. या मंडळाद्वारे भाजप पक्षाची ताकद वाढविली जात आहे. या एकूणच व्यवहारांमध्ये कोट्यवधींची उलाढाल सुरू असल्याचा संशय कवळेकरांनी व्यक्त केला. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाईल तसेच संशयास्पद व्यवहारांचा फेरविचार होईल, असेही त्यांनी सांगितले.