मासळीच्या तपासणीसाठी जागतिक दर्जाची प्रयोगशाळा

केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची घोषणा


23rd October 2018, 06:17 pm


प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोमंतकीयांना दर्जेदार व सुरक्षित मासळी मिळावी तसेच त्यांच्यातील फॉर्मेलिनची भीती दूर व्हावी, यासाठी म्हापसा येथील जुन्या आझिलो इस्पितळाच्या जागी जागतिक दर्जाची प्रयोगशाळा उभारण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्यमंत्री तथा नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी केली. देशातील दोन मुख्य संस्थांकडून राज्यात आयात होणाऱ्या मासळीची या प्रयोगशाळेत तपासणी केली जाईल, असेही ते म्हणाले.
फॉर्मेलिन प्रकरणी अडचणीत आलेल्या सरकारकडून लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यात मासळीची आयात बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा निर्णय अंमलात आला नसतानाच राज्यात मासळीच्या तपासणीसाठी जागतिक दर्जाची प्रयोगशाळा उभारण्याची घोषणा प्रभू यांनी करून सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. या घोषणेमुळे मासळी आयातीवर बंदी लागू करण्याचा सरकारचा निर्णय तूर्त स्थगित ठेवला जाण्याची शक्यता आहे. पत्रकार परिषदेवेळी प्रभू यांच्यासोबत कृषीमंत्री विजय सरदेसाई, अन्न आणि औषध प्रशासनालयाच्या संचालक ज्योती सरदेसाई आणि मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा हे उपस्थित होते.
‘क्वालिटी काउंसिल ऑप इंडिया’ (क्यूसीआय) आणि ‘एक्स्पोर्ट इन्स्पेक्शन एजन्सी’ (ईआयए) या संस्था याठिकाणी प्रयोगशाळा उभारणार आहेत. मासळी ही गोमंतकीयांच्या आहारातील प्रमुख घटक आहे. मासळीतील फॉर्मेलिनमुळे हा आहार असुरक्षित बनला आहे आणि लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. वरील दोन्ही संस्थांकडून देशातून निर्यात होणाऱ्या मासळीचा दर्जा आणि सुरक्षिततेची तपासणी केली जाते. अशा पद्धतीने गोव्यात आयात होणाऱ्या मासळीची सुरक्षितता आणि दर्जा तपासण्याचे काम या प्रयोगशाळेत होईल, असे प्रभू म्हणाले.
युरोप, अमेरिका, जपान, कोरिया आदी देशांत ज्या पद्धतीची तपासणी होते. मासळीचा दर्जा सांभाळला जातो, त्याच पद्धतीची सुरक्षित आणि दर्जेदार मासळी गोमंतकीयांना प्राप्त व्हावी, या उद्देशानेच हा निर्णय घेतला गेला आहे.
ऑनलाईन तक्रारीची सुविधा देणार
मासळी तपासणीची प्रयोगशाळा नेमकी कधी उभी होईल, याबाबत त्यांनी भाष्य न करता सध्या फक्त प्राथमिक काम पूर्ण झाल्याचे सांगितले. या व्यतिरिक्त मोबाईल व्हॅनची सोय तसेच लोकांना ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले.
राज्याच्या सीमेवर आयात होणाऱ्या मासळीची तसेच बाजारपेठेतील मासळीची तपासणी सुरू राहणार आहे. फॉर्मेलिन प्रश्नावर प्रयोगशाळा हा कायमस्वरूपी तोडगा असेल, असे कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी सांगितले.
..
गोवा भेट राजकीय नाही : प्रभू
राज्यातील राजकीय अस्वस्थेबाबत चर्चा करण्यासाठी तसेच काही घटक पक्षांची नाराजी दूर करण्यासाठी गोव्यात आल्याचे वृत्त सुरेश प्रभू यांनी नाकारले. राज्यात काहीच राजकीय वाद किंवा भांडण नाही. सगळे काही सुरळीतपणे सुरू आहे, त्यामुळे मध्यस्ती किंवा दूत म्हणून येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.