आगळावेगळा साहित्यिक !


23rd October 2018, 06:00 am

ज्यांना आदर्श मानले, ज्यांच्याकडून प्रेरणा घेतली त्यांच्याच रांगेत स्थान मिळविण्याची किमया एखाद्याने केली तर ते निश्चितपणे आश्चर्य मानावे लागेल. रविवारी प्राणज्योत मालवलेले रमेश वेळुस्कर यांनी लेखनाची स्फूर्ती आणि प्रोत्साहन ज्यांच्याकडून घेतले होते, ते मनोहरराय सरदेसाई, रवींद्र केळेकर, बा.भ. बोरकर, माधव बोरकर, धर्मानंद कामत, र.वि.पंडित किंवा नागेश करमली, एव्हाग्रियू जॉर्ज यांच्यासारख्या साहित्य क्षेत्रातील दिग्गजांनी वेळुस्कर यांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष लेखनासाठी उत्तेजन दिले होते. त्याच ज्येष्ठांच्या मांदियाळीत स्वत: स्थान मिळवलेले वेळुस्कर हे एक आगळेवेगळे रसायन होते. वेळुस्कर ज्या ग्रामीण भागात वाढले, शिक्षण घेतले तेथील सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा ठसा त्यांच्या संवेदनशील मनावर उमटल्याशिवाय कसा राहील? जागर, धालो, शिमगो, नाटके याचबरोबर भजन कीर्तन यासारखे प्रासंगिक कार्यक्रम त्यांचे जीवन समृद्ध करू शकले. विद्यार्थी दशेत असताना त्यांनी लिहिलेल्या ‘मोनी व्यथा’ या पहिल्या काव्यसंग्रहाला पुरस्कार प्राप्त झाला. त्यांची प्रतिभा दिवसेंदिवस फुलत गेली. विशेषत: शिक्षकी पेशात ३३ वर्षे ज्ञानदानाचे काम केल्यानंतर मिळालेली उसंत त्यांच्यातील साहित्यिकाला खऱ्या अर्थाने न्याय देऊ शकली. कोणत्याही भाषेचे बंधन नाही, वाद तर नाहीच नाही. ते त्यांच्या स्वभावातच नव्हते. मराठी, कोकणी आणि बंगालीवर त्यांचे प्रभुत्व होते. संस्कृत, हिंदी, मराठी व इंग्रजीतून भाषांतर करण्यात तर ते कुशल होते. त्यांच्या पुरस्काराची यादी तर फार मोठी आहे. जीवनाच्या सर्वच अंगांना स्पर्श करीत लेखन करताना मी इतरांना जसा आनंद देतो, तसा स्वत:लाही त्यातून समाधान मिळवतो, हे उद्गार सार्थ करीत हा अवलिया परत न येण्यासाठी निघून गेला आहे.