नवे आयाराम-गयाराम

त्यांच्या अनैतिक राजकारणाला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची की स्वार्थी आयाराम-गयारामांना धडा शिकवून घरी बसवायचे याचा निर्णय मतदारांना लवकरच करावयाचा आहे.

Story: अग्रलेख |
23rd October 2018, 06:00 am

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या गळाला लागलेल्या सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी काँग्रेस पक्षासह आमदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून या दोघांना ज्युनियर राणेंनी कसले आमीष दाखविले असेल हा प्रश्न गोव्यातील जनतेला पडला होता. दोघांच्याही पक्षांतरास काही दिवस उलटल्यानंतर आता हळूहळू परिस्थिती स्पष्ट होऊ लागली आहे. कोणत्याही आमदाराला आपल्या मतदारसंघाचा विकास करावयाचा असतो; केलेल्या विकासकामांच्या बळावरच त्यांना पुढील निवडणुकीत मतदारांकडे मतांचे दान मागण्यासाठी जावे लागते असे मानले जाते. परंतु अलिकडच्या आयाराम-गयारामांच्या संधीसाधू राजकारणात मतदारसंघाचा विकास आणि मतदारांची कामे हे मुद्दे जेवणातील लोणचे-पापड असल्याप्रमाणे झाले आहे. जिभेवर लाळ खेळवणारी लोणच्याची चव आ​णि कुरकुरीत पापड ताटात असल्याशिवाय जेवण चवदार लागत नाही, मात्र जेवणातील मुख्य पदार्थ वेगळेच असतात. या मुख्य पदार्थांवर आणि गोडधोड पक्वानांवर ताव मारून भरपेट जेवताना लोणचे-पापड हवे असले तरी ते दुय्यम ठरते. त्याच्यावाचून जेवण अडत नाही. विश्वजीत-शिरोडकर-सोपटे यासारख्या आयाराम गयाराम राजकारण्यांचेही तसेच आहे. सत्तेचे भरलेले ताट त्यांना जेवणासाठी हवे असते, सत्तेतील ताटात पक्वान्नांचीही रेलचेल असते. पंचपक्वान्नांचे हे सत्ताभोजन चालू असताना मतदारसंघाचा विकास आणि मतदारांची कामे हे विषय चवीसाठी चर्चेत घ्यायचे असतात. जसे जेवणाचे पक्वान्नांनी भरलेले ताट मिळाल्यानंतर लोणचे-पापड जिभेला नाही लागले तरी फरक पडत नाही, पोट भरून ढेकर येतोच; तसे या आयाराम गयारामांच्या दृष्टीने सत्तेच्या समीकरणात आपण सामील असणे महत्त्वाचे असते, मतदारसंघाचा विकास आणि मतदारांची कामे मागे राहिली तरी त्यांना फरक पडत नसतो.
आयाराम-गयारामांचे हे राजकारण सर्वसामान्य मतदारांनी लक्षात घेतले पाहिजे आणि सुभाष शिराेडकर व दयानंद सोपटे यांच्यासारख्या राजकारण्यांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. उद्योगमंत्रिपदी असलेल्या महादेव नाईक यांचा पराभव करून शिरोडकर गेल्या निवडणुकीत जिंकून आले. परंतु सत्ताधारी न बनल्याने त्यांनी दीड वर्षात आपल्या पक्षाचा आणि त्याचबरोबर शिरोड्यातील मतदारांचा विश्वासघात केला. सोपटे यांनी तर मुख्यमंत्रिपदी असलेल्या लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता. परंतु सत्तेत वाटेकरी होता न आल्यामुळे आपल्या पक्षाला आणि हजारो मतदारांना दगा दिला. शिरोडकर आणि सोपटे या दोघांनाही निवडून आल्यापासून जणू काही आपापल्या मतदारसंघाच्या विकासाचा आणि मतदारांची कामे करण्याचा ध्यास लागला होता. आता त्यांचा मार्ग मोकळा झाला असल्यामुळे शिरोडा आणि मांद्रेचा कायापालट होण्यास हरकत नाही. परंतु मतदारांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, या आयाराम-गयारामांना पुन्हा निवडून दिले तर कायापालट त्यांच्या मतदारसंघांचा होणार नाही, नेत्यांचा व्यक्तिगत कायापालट होईल. त्यांनी व ज्युनियर राणेंनी चालविलेल्या अनैतिक राजकारणाला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची की स्वार्थी आयाराम-गयारामांना धडा शिकवून घरी बसवायचे याचा निर्णय मतदारांना लवकरच करावयाचा आहे.