अमृतसर अपघाताचे कारण

या ठिकाणी एक बाजू स्पष्टपणे लक्षात घ्यावी लागेल की, ट्रेन आपला मार्ग सोडून दुसरीकडे गेल्याने हा अपघात घडलेला नाही ! याउलट रेल्वेच्या मालमत्तेवर बेकायदा बसलेल्या त्या दुर्दैवी लोकांचेच बळी गेले.


22nd October 2018, 02:43 am

अमृसरजवळ धोबी घाटावर साजरा होत असलेल्या दसरोत्सवाच्यावेळी ट्रेनखाली चिरडून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या ६० आहे. अन्य कित्येक जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना का घडली, त्यात दोष कोणाचा, रेल्वे चालक त्यात किती दोषी, कार्यक्रमाचे आयोजक बेफिकीर वागले का, आदी प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी पंजाब सरकारने न्यायालयीन चौकशी करण्याचे ठरविले आहे. त्यातून काय सत्य बाहेर यायचे ते येईलच, पण सध्या तरी जी माहिती उपलब्ध होत आहे, त्यात आयोजकांची बेफिकिरी आणि जमलेल्या हजारो लोकांनी कशा प्रकारे नियमभंग करीत रेल रुळावर ठाण मांडून आपले जीव धोक्यात घातले होते, ते स्पष्टपणे समोर आले आहे. मैदानाभोवती संरक्षक भिंत असली तरी ज्या बाजूने मैदानावर जाण्यासाठी वाट आहे, त्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेबाहेर म्हणजेच रेल रुळाजवळ लावलेल्या एलईडी टीव्हीच्या पडद्यावर हा कार्यक्रम दाखविला जात होता. प्रत्यक्षात तो रावणदहनाचा कार्यक्रम होता. तो पाहाण्यासाठी रेल रुळाच्या पलीकडे असलेल्या वस्तीतून शेकडो लोक त्या ठिकाणी जमले होते. अमृतसरमध्ये असे कार्यक्रम दहा ठिकाणी होतात. मात्र आपणच जास्त जोमाने आणि उत्साहाने भव्य प्रमाणात दसरा साजरा करतो, हे दाखवण्याच्या स्पर्धेत दोन हजारांची क्षमता असलेल्या जागी वीस हजार लोक एकत्रित जमविल्यावर दुसरे काय घडणार? उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कामगार वर्ग या ठिकाणी मोठ्या संख्येने जमून आपल्या गावाकडील कुटुंबाला मोबाईच्या माध्यमातून या उत्सवाचा आस्वाद देण्यासाठी धडपड करीत होता. अशा या उत्सवी वातावरणात सूर्यास्तावेळी म्हणजे सहा वाजता येणाऱ्या प्रमुख पाहुणे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी दीड तास विलंबाने आल्याची माहिती उपलब्ध होते. त्यांच्या उशिरा येण्याने कार्यक्रम लांबला असे आयोजकांना वाटते आहे.
संबंधित दुर्दैवी घटनेपूर्वी दोन ट्रेन कमी वेगाने त्याच रेलरुळावरून निघून गेल्या होत्या. त्यानंतरची अमृतसरला जाणारी वेगवान गाडी अनेकांना चिरडून निघून गेली असा आरोप होत आहे. प्रत्यक्षात या दुर्घटनेत बळी गेलेले आणि जखमी झालेले सर्वचजण रेल रुळावर बसले होते, नव्हे ते तेथेच बसून रंगले होते, पडद्यावर दिसणाऱ्या ‘लाईव्ह’ कार्यक्रमाचा आनंद लुटत होते. अशा वेळी बेभान अवस्थेतीतील त्या सर्वांसमोरून साक्षात मृत्यूच ट्रेनच्या रुपाने निघून गेला. जाताना अनेकांचे प्राण घेऊन गेला. याची जबाबदारी रेल्वे प्रशासनावर किंवा चालकावर कशी काय येते? रेल्वे प्रशासनाने दावा केल्याप्रमाणे लोकांनी रेल रुळावर केलेले हे अतिक्रमण त्यांना भोवले. या ठिकाणी एक बाजू स्पष्टपणे लक्षात घ्यावी लागेल की, रेल गाडी आपला मार्ग सोडून दुसरीकडे गेल्याने हा अपघात घडलेला नाही ! याउलट रेल्वेच्या मालमत्तेवर बेकायदा बसलेल्या त्या दुर्दैवी लोकांचेच बळी गेले. त्यामुळे रेल्वे चालकाला दोष कसा काय द्यायचा? त्याला सिग्नल मिळाल्याने ती गाडी भरधाव वेगाने धावत होती, यात कोणाचे काय चुकले? मृत आणि जखमींना सरकारने मदत केली आहे ती कर्तव्यभावनेने आणि जबाबदारी म्हणून. या दुर्घटनेमुळे अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले, अनेक कुटुंबातील कर्ते पुरूष-महिलांचे निधन झाले. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य मोठे आहे. मात्र कमी क्षमतेच्या जागेत अधिकाधिक लोक जमा करणारे आयोजक, कार्यक्रमाला परवानगी देणारी प्रशासन यंत्रणा आणि उशिरा येणारे प्रमुख पाहुणे यांच्यावर खरे तर दोषारोप करावा लागेल. याच कारणामुळे ही दुर्घटना घडली आहे.
कोणत्याही प्रकारचा राजकीय दृष्टिकोन न ठेवता याबाबत सखोल चौकशी व्हायला हवी. रेल्वे प्रशासन कोणत्या प्रकारे दोषी आहे, हे संबंधितांना सिद्ध करावे लागेल. पोलिस यंत्रणेचा यात किती सहभाग आहे किंवा बेफिकीरी आहे, याचीही चौकशी व्हायला हवी. आयोजकांप्रमाणेच कार्यक्रमाला परवानगी देणाऱ्यांनी अपेक्षित लोकांच्या सुरक्षेची कोणती व्यवस्था केली होती? एवढ्या मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने स्थानिक पोलिसांनी कोणती पावले उचलली होती, याचीही चौकशी व्हायला हवी. रेल्वेने देशातील अन्य भागांत होणारे संभाव्य अपघात टाळून प्राणहानी टाळण्यासाठी क्रॉसिंगच्या ठिकाणी नवी व्यवस्था कशी करता येईल यावरही विचार करायला हवा. केवळ सेवा आणि थाटमाट वाढविण्याएेवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून रेल्वेचा कारभार सुधारणे गरजेचे आहे.