असा हा जमाना ‘जाहिरातीं’ चा

प्रासंगिक

Story: दीपक पाणंदीकर |
20th October 2018, 08:48 am


-
अनेकजण म्हणतात, सांप्रत कलियुग आहे. घडणार्‍या घटना पाहता त्याला आक्षेप घेण्याचे कोणतेच निमित्त दिसत नाही मला. मात्र आजच्या जमान्यात जाहिरातींचे प्रस्थ वाढल्याचे जाणवते. लक्षात घ्या, पूर्वी १४ फेब्रुवारीला व्हॅलेन्टाईन्स डे (प्रेमाचा संदेश देणारा दिवस) साजरा व्हायचा; परंतु, आता एवढ्या ‘दिवसां’ चा बोलबाला आहे की वर्षाचे ३६५ दिवस सुद्धा पुरे पडतील का, याचीच शंका यावी. वस्तुतः होते काय की या दिवसांच्या निमित्याने व्यापारी बंधूंना त्यांच्या मालाची जाहिरात करायची चांगली संधी मिळते. पडून उरलेला मालही त्या त्यानिमित्ताने खपून जातो. वास्तविक जागतिक स्तरावरील प्रख्यात उत्पादक आणि वितरण कंपन्यांनी या दिवसांचा भूलभुलैया प्रचंड मेहनत आणि आर्थिक गुंतवणूक करून चालू केला आहे. त्याचा पुरेपूर मोबदला ते दामदुपटीने याच दिवसात कमवत असतात. युरोप, अमेरिका आणि इतरत्र या वेगवेगळ्या दिवसांना महत्त्व आले ते त्याचसाठी. पण, आपल्या देशात ‘रोज डे’ किंवा क्वचित ‘मदर्स डे’ सोडला तर इतर दिवसांना तसे महत्त्व आले असेल, असे सध्यातरी वाटत नाही.
पैसे कमवण्याचे साधन
या जाहिरातीच्या भुलभुलैयामध्ये देशात टीव्ही चॅनलचे अमाप पीक आले आहे. टीव्ही हा मनोरंजनाचे साधन उरलेले नसून जाहिरातीतून पैसे कमावण्याचे एक साधन झाले आहे. नमुना द्यायचाच झाला तर क्रिकेटचा देता येईल. या खेळात दोन ओव्हरमधल्या वेळात कमीत कमी तीन जाहिराती दाखवता येतात, नव्हे दाखवतात. शिवाय विकेट पडल्यावर अथवा दोन इनिंगच्या मध्यंतरात देखील अगणित जाहिराती दाखवता येतात. पूर्वीच्या काळी कसोटी सामने पाच दिवसांचे. त्यानंतर हल्लीच्या झटपट जमान्यात एक दिवसाचे निकाली सामने चालू झाले आणि आता त्याच राजेशाही खेळाचे वीस/ वीस ओव्हरचे विडंबन. उत्पादक आणि वितरक यांची अविरत साथ मिळाल्याने तो खेळ आपल्या देशात प्रचंड प्रसिद्ध झाला आहे. आता तोच किळसवाणा प्रकार प्रो- कबड्डी नावाने केला जात आहे. मात्र, फुटबॉल जागतिक स्तरावर प्रख्यात असून सुद्धा अवघीच तीन-चार राज्ये सोडली तर आपल्याकडे अजून तेवढा लोकप्रिय झाला नाही. निमित्त तेच; उत्पादक आणि वितरण क्षेत्रातील कंपन्यांना जाहिरातीसाठी हवा तेवढा वेळ या खेळात मिळत नाही.
विद्वानांचा गदारोळ
बहुमूल्य टीव्ही चॅनलच्या माध्यमामधून कमाई करायचीच झाली तर तेवढ्याच प्रमाणात जाहिराती मिळायला हव्या. परंतु, तुम्ही टीव्ही चॅनेल सुरू केला आणि उत्पादक कंपन्या जाहिराती घेऊन तुमच्या मागे धावतील, असे थोडेच असते. तुमचे चॅनल किती लोकांपर्यंत पोचते याचा आढावा घेणारी एक अद्ययावत स्वायत्त यंत्रणा आहे, टीआरपी नावाची. जेवढा मोठा ‘टीआरपी’ तेवढ्याच जास्ती जाहिराती. मग टीआरपी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरणे आले. ‘ ब्रेकींग न्यूज’ नामक अक्षरश: उबग आणणारा प्रकार चालू झाला. ज्वलंत सामाजिक विषय घेऊन विद्वान मंडळीत चर्चासत्र ठेवणे चालू झाले. मात्र, चर्चेत भाग घेणारे तेच ते चेहरे पाहून यांची विद्वत्ता कोणत्या विषयात याची शंका यावी. शिवाय त्या सत्राचा नामधारी सूत्रधार चर्चेला उचित मार्गदर्शन करण्यापेक्षा सामील झालेली विद्वान मंडळी गदारोळ कसा घालतील याच्याकडे लक्ष देऊ लागली. जेवढा जास्त कल्लोळ तेवढाच जास्त टीआरपी.
श्रवण परंपरेत वाढ
आपला देशात स्वत:च्या फायद्यासाठी तारतम्य न बाळगणारे कैक विद्वान आहेत, ज्यांची छुपी गुणवत्ता लक्षणीय म्हणावी लागेल. शिवाय निवडणुकीतील मतांच्या पोळीवर साजूक तूप ओढण्यास यांना साथसंगत देण्यास राजकीय पक्ष सदैव हजर. कोणता विषय, कोणत्या रूपात त्यांच्या सुपीक डोक्यात जन्म घेईल, याची कल्पना साक्षात भगवंतालाही कधी आली नसेल. टीव्ही माध्यमाने त्यांच्या सुप्त गुणांना सुंदर व्यासपीठ दिलेले आहे. आपल्या देशात गेल्या काही वर्षांत वाचन संस्कृतीपेक्षा श्रवण परंपरा जास्त रुजलेली असल्यामुळे या माध्यमावर बहुसंख्य प्रेक्षकांचा भरवसा आहे. कोणताही विषय सहजगतीने जास्तीत जास्त लोकांपुढे पोचविण्यासाठी टीव्हीसदृश दुसरे माध्यम नाही.
आरक्षण हा असाच एक सध्याच्या काळातील बहुचर्चित विषय. राज्यघटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वत: मागासवर्गीय असूनही त्यांचा आरक्षणाला विरोध असल्याची लेखी नोंद आहे. परंतु, त्यांनी इतर सभासदांच्या आग्रहामुळे दहा वर्षांसाठी आरक्षण देण्यास संमती दिली. तरी सुद्धा राज्यघटनाकारांना बहुधा अभिप्रेत नसतील एवढ्या गोष्टी, आमच्या अलीकडच्या विद्वानांनी त्यात बेमालूमपणे घुसवल्या की ज्याचे नाव ते. तसे पाहिले तर वयाने ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळाचा मी एक साक्षीदार आहे. आयुष्याची २१ वर्षे (या वयोमानापश्चात व्यक्ती वैधानिकदृष्ट्या सज्ञान, असे मानले जाते) सोडली तर आजपर्यंतच्या ऐतिहासिक घटना मी अनुभवल्यात. प्रत्यक्ष नसतील परंतु विविध माध्यमांतून.
आरक्षणामुळे तेढ
विसाव्या शतकाच्या अंतापर्यंत ‘फेक न्यूज’ अथवा ‘पेड न्यूज’ या शब्दांचा जन्मही झाला नव्हता; त्यामुळे त्या काळात भिन्न माध्यमांत येणार्‍या बातम्या पेरलेल्या नसाव्यात. परंतु, टीव्ही माध्यमांच्या पुढाकाराने आत्ता जेवढे ‘आरक्षण’ या विषयाला महत्त्व आले आहे, तेवढे मी कधीच अनुभवले नाही. नवनवीन आक्रमक पुढारी मंडळी या माध्यमातून उदयास आली आणि त्यांनी जातीपातीत तेढ, द्वेष सुरू केला. याच महिन्यात गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर झालेल्या भीषण हल्ल्यांमागे एका राजकीय पक्षाच्या निवडून आलेल्या युवा नेत्याचे चिथावणीखोर भाषण असल्याचा पुरावा मिळालेला आहे. महाराष्ट्रात सुद्धा कोरेगाव भीमा प्रकरणात असेच धागेदोरे मिळालेले आहेत. आपल्या देशावर राज्य करणारे ब्रिटिश सत्ताधीश देखील त्यांच्या कूटकारस्थानी वृत्तीने जेवढी फूट या देशात पाडू शकले नाहीत, तेवढा बेबनाव आज या ‘आरक्षण विषया’ ने समाजात झालाय. कालाय तस्मे नम:, वेगळे काय!
आम्ही भारतीय सदैव आमच्या समृद्ध संस्कृतीची थोरवी गात असतो. सर्वसमावेशक अशी आमच्या संस्कृतीची ख्याती आजही आहे. मात्र, जाहिरातीच्या जमान्यात त्या ख्यातीची लक्तरेच जगासमोर येताना जाणवतात. मान्य आहे, एकेकाळी स्त्री पीडित होती. (सांप्रतच्या काळात तसे म्हणणे धाडसाचे ठरेल.) पुरुषप्रधान सामाजिक जीवनात तिचे स्थान दुय्यम होते. पण तसे गौण स्थान अनुसूचित जातीच्या लोकांनाही पूर्वी होते. असे असून सुद्धा त्या समाजाचे सर्वमान्य पुढारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आरक्षणाच्या विरुद्ध होते. आरक्षणामुळे समाज लुळापांगळा होण्याची भीती त्यांना वाटत होती. आणि ती धास्ती किती सार्थ होती, याचे मनोज्ञ चित्र सांप्रतच्या काळात जाणवते. आरक्षणाचा विषय स्वातंत्र्योत्तर काळात चिघळत ठेवण्यात कुणाचा हात होता आणि कुणी किती राजकीय कमाई केली, याचे उत्तर भविष्यात इतिहास देईलच.
‘मी टू’ मुळे मनस्ताप
आणि अचानक अजून एका वेगळ्या शब्दाचा उदय अशाच सुपीक डोक्यातून झाला असावा. त्याचा प्रारंभ गेल्या वर्षी हॉलिवूडमध्ये झाला आणि आता त्याच शब्दाची लाट बॉलिवूड ढवळून काढतेय. हळूहळू तिचा प्रभाव जसा पाश्चिमात्य देशातील समाज जीवनावर होत गेला, तसाच आपल्याकडेही होणार याचे भविष्य सांगण्यास युगप्रवर्तकाची गरज नसावी. हा शब्द ज्या समुदायाला लक्ष्य बनवून समाजात उभी फूट पाडायला पाहतोय, ते पाहिल्यास सुजाण व्यक्तीच्या उरी धडकी बसावी. तो शब्द आहे ‘मी टू’.
मला विचाराल तर हा शब्द माझ्यासारख्या विक्री क्षेत्रातील लोकांसाठी तसा नवीन नाही. आमच्या मार्केटिंग विश्वात तो नियमितपणे वापरला जातो. एखाद्या कंपनीचा प्रॉडक्ट मार्केटमध्ये यशस्वी झाला की इतर कंपन्यांनी उत्पादित केलेल्या त्या प्रकारच्या वस्तूचे वर्गीकरण ‘मी टू’ मध्ये केले जाते. म्हणजे पहा, जेव्हा एखादी लवंगयुक्त टूथपेस्ट तुफान खपू लागली तेव्हा त्याच प्रकारच्या अनेक पेस्ट्स बाजारात येतात. त्या बाकीच्या सर्व पेस्ट मार्केटिंग दृष्टिकोनातून ‘मी टू’ प्रोडक्ट्स. परंतु, आज हाच शब्द स्त्री-पुरुषांत फूट पाडत आहे. अचानक अशा ‘मी टू’ गोष्टींचा प्रचंड भडिमार इलेक्ट्रॉनिक माध्यमातून जनता जनार्दनावर होत आहे. अर्थात मुद्रित माध्यमांना सुद्धा त्याची दखल घेण्यास भाग पडतेय.
चिखलफेकच जास्त
सगळ्या सामाजिक, इलेक्ट्रॉनिक माध्यमांत येणार्‍या मजकुराचे निरीक्षण केले तर असे वाटते की एक असे विद्रूप चित्र रेखाटले जातेय, ज्यामुळे बॉलिवूडमध्ये अनेक वर्षे कार्यरत असणारी आणि कालपर्यंत सोज्वळ, अनुकरणीय वाटणारी सगळीच्या सगळी व्यक्तिमत्त्वे तिरस्कृत, लैंगिक भावनेने पछाडलेली आहेत. त्यात जसे गलिच्छ आरोप झालेले पुरुष आले, तसे फिर्याद करणार्‍या स्त्रिया देखील. कारण फिर्यादी जरी स्त्रिया असल्या तरी एखाद-दुसरी सोडली तर पोलिसात तक्रार देणारी स्त्री विरळ. फक्त सोशल मिडियाचा वापर करून चिखलफेक करणार्‍याच जास्त. त्यात देखील अनेकजणी बेजबाबदारपणे न्यायाधीशाची भूमिका बजावत स्वत:चे जुने हेवेदावे बाहेर काढताना दिसताहेत. एक गोष्ट मात्र आवर्जून नोंद करावीशी वाटते, ती म्हणजे या गोष्टीत जेवढे चारित्र्यहनन पुरुषांचे होईल, तेवढेच स्त्रियांचे सुद्धा होण्याची भीती आहे. अखेर जेव्हा फिर्याद केली जाते तेव्हा कोर्टात साक्षीपुरावे होत असतात आणि नाही केली तर अब्रूनुकसानीच्या खटल्याला तोंड द्यावे लागते. टाळी काही कधीच एका हाताने वाजत नाही.
असे अनेक विषय जाहिरातबाजीच्या प्रयत्नात सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या हानिकारक ठरलेे आहेत. पश्चिमेचे अनुकरण करण्याच्या नादात, समाज जीवन आणि लोकशाहीची विटंबना करण्यात आपला देश पुढाकार घेत आहे काय, अशी भीती उगाच भेडसावत आहे. पुन्हा तोच प्रकार ‘मी टू’ लाटेमुळे होऊ नये, एवढीच प्रार्थना.
(लेखक व्यावसायिक आहेत.)