औद्योगिक धोरणातील ‘भांडवल’

राज- कथा

Story: संजय ढवळीकर |
20th October 2018, 08:43 am


.............................
‘‘उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या निमित्ताने गोव्यात येऊ पाहणारे उद्योजक आणि व्यावसायिक आपल्याकडे खूप आहेत. उत्तरेतील, विशेषत: दिल्ली-पंजाब-हरयाणा या पट्ट्यातील उद्योजकांकडे तर भांडवली ताकद भरभक्कम असते. त्यांना गोव्यात आणण्यात यश मिळालं तर आपण कमीत कमी काळात भरभराट करू शकतो. बघ, विचार कर लुईसबाब...’’
उद्योगमंत्री लुईस बार्रेटो मंत्रालयात आपल्या केबिनमध्ये स्वीय सचिव दामू मापारी यांच्यासोबत गप्पा मारत बसले होते. दामू मापारी स्वीय सचिव असले तरी बार्रेटोंची त्यांच्याशी गेल्या दोन-अडीच दशकांची घनिष्ट दोस्ती होती. ग्रॅज्यूएट झाल्यानंतर खते बनवण्याच्या फॅक्टरीमध्ये बार्रेटोंना सुपरवायझर म्हणून नोकरी मिळाली. त्यांना सहाय्यक म्हणून देण्यात आलेला दामू मापारी लुईसपेक्षा तीन-चार वर्षांनी मोठा, तिथे आधीपासूनच काम करत होता. कामाची इत्यंभूत माहिती असलेल्या दामूच्या मदतीने लुईसने पाचेक वर्षांत तिथे आपले चांगलेच बस्तान बसवले.
नेतेगिरी करण्याची खुमखुमी असल्यामुळे लुईस त्या फॅक्टरीत कामगार नेता बनला. दामू त्याच्या सावलीप्रमाणे सोबत असायचा. पुढील पाच-सात वर्षांत लुईस बार्रेटोच्या नेतृत्वाखालील कामगार संघटना डोईजड बनली तेव्हा व्यवस्थापनाने लुईसला शिस्तभंगावरून कारणे दाखवा नोटीस बजावली. त्याच्या निषेधार्थ फॅक्टरीच्या सर्व कामगारांचा लुईसने अचानक संप घडवून आणला. मात्र उत्तर भारतातून आलेल्या एका खमक्या आणि धूर्त संचालकाने लुईसच्या काही सहकाऱ्यांना आपल्या बाजूने वळवून कामगार संघटना फोडली. त्याबरोबर लुईसचा प्रभाव कमी होऊ लागला. एक दिवस लुईसला महिनाभराचा नोटीस पे देऊन कामावरून कमी करण्यात आले.
आपल्या संपन्न भविष्याची मोठमोठी स्वप्ने त्या फॅक्टरीत काम करताना त्याने बघितली होती. तिथे आधी मॅनेजर आणि नंतर संचालक बनून त्याला मोठा माणूस व्हायचे होते. परंतु कामगार संघटनेचे नेतेपद डोक्यात गेले आणि त्यातून बेकायदा संप केला. त्या संपातून त्याच्या सुपरवायझरपदाच्या कारकिर्दीची अकाली अखेर झाली. दिल्लीवाले लोक आपल्या लाभासाठी कसे धूर्तपणे वागतात याची प्रचिती त्याने तिथे घेतली. वयाच्या तिशीतील लुईस नोकरी जाताच सैरभैर बनला.
दामू मापारीने लुईसमधील नेतेपदाचे गुण निरखले होते. तो रोज संध्याकाळी फॅक्टरीतून लुईसच्या घरी त्याला भेटायला जाऊ लागला. आपला मित्र हुशार आणि धाडसी आहे, तो राजकारणात चांगली करिअर करू शकेल असे त्याला वाटायचे.
‘‘लुईस, तू खरं तर नोकरी करताच कामा नये. तुला मोठा माणूस बनायचाय ना? मग तू राजकारणात जा. नेता बनण्याची तुझ्यात ताकद आहे बघ.’’ दामूने लुईसच्या डोक्यात राजकारणाचे स्फुल्लिंग पेटवले. युनिफाईड गोवन पक्षाचा त्याग करून नुकतेच राष्ट्रीय काँग्रेसमध्ये गेलेले ज्येष्ठ राजकारणी डाॅ. विल्सन डायस यांच्याबद्दल लुईसला नेहमीच आकर्षण वाटायचे. काही दिवसांनंतर त्याचे ठरले. आता राजकारणात उतरायचे. त्याने त्याच्या नावेली मतदारसंघात काम सुरू केले. चार वर्षांनंतरच्या विधानसभा निवडणुकीत डॉ. विल्सन डायसांनी पक्षाची उमेदवारी दिली आणि लुईस बार्रेटो आमदार म्हणून निवडूनही आला!
सटरफटर कामगार नेता ही लुईस बार्रेटोंची ओळख मागे पडून आमदार लुईस बार्रेटो असा त्यांचा आदराने उल्लेख होऊ लागला! आपला पहिला आडाखा अपेक्षेपेक्षा लवकर यशस्वी ठरला हे बघून दामू मापारी फॅक्टरीतील नोकरी सोडून आपल्या मित्राबरोबर काम करण्यासाठी आला. लुईसचा हात धरून आपल्याला मोठी मजल मारता येईल असे त्याला त्याचे अंतर्मन सांगत होते.
बार्रेटोंनी सक्रिय राजकारण करावे आणि त्यांच्या धोरणात्मक बाबी दामू मापारींनी बघाव्यात असे या दोघांमध्ये आधीपासूनच ठरले. दामू मापारींना आपल्या राजकीय मर्यादा ठाऊक होत्या, त्यामुळे ते कधी लुईस बार्रेटोंच्या महत्वाकांक्षांच्या आड आले नाहीत; उलट राजकारणातील आडवाटा आणि वळणांवरून आपल्या मित्राची वाटचाल सुखरुप होईल हे बघण्याचे काम त्यांनी इमानेइतबारे आपल्याकडे घेतले. एव्हाना बार्रेटोंनाही लक्षात आले होते की, आपण राजकीयदृष्ट्या चाणाक्ष असलो तरी राजकीय पडद्याआड ज्या उचापती कराव्या लागतात त्याची जबाबदारी आपल्याशी एकनिष्ठ असलेल्या दामूकडे दिली की निर्धास्त राहता येईल. एक म्हणजे आपल्याला योग्य तोच सल्ला मिळेल आणि दुसरे म्हणजे पडद्यामागील कोणत्याही व्यवहारांत काही गडबड झालीच तरी आपले नाव त्यात येणार नाही.
लुईस बार्रेटो आणि दामू मापारी यांचा फॅक्टरीच्या नोकरीतून सुरू झालेला मैत्रीचा सिलसिला हळूहळू एकमेकांना पूरक राजकीय भागीदारी बनून बहरू लागला. बरोबर राहण्यातील फायदे दोघांनीही हुशारीने हेरले होते आणि त्यामुळे आपापल्या मर्यादांच्या चौकटीत राहण्याची काळजी दोघेही घेत होते.
बार्रेटोंच्या आमदारकीच्या दुसऱ्या टर्ममध्ये त्यांच्या पक्षाचे नेते पुरुषोत्तम काणे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेसचे सरकार आले. निवडणुकीनंतर पुरुषोत्तम काणे आणि विल्सन डायस या दोन ज्येष्ठ नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी चुरस होती. मागच्या विधानसभेत काणेंना नेतेपद मिळाले असल्यामुळे यावेळी मुख्यमंत्री बनण्याची संधी आपल्याला मिळावी असे डायस यांचे प्रयत्न होते. डायस यांचे शिष्य लुईस बार्रेटोंनीही आपल्या राजकीय गुरुसाठी इतर आमदारांकडे बोलणी सुरू केली. परंतु हायकमांडचा कल काणेंच्या बाजूने होता आणि त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत डायस मागे पडले. डायसांचे मुख्यमंत्रिपद हुकले तिथेच बार्रेटोंचे मंत्रिपदही हातचे गेले.
‘‘लुईस, तुझ्या गुरूला राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काहीच भविष्य दिसत नाही. हायकमांडशी काणेंचे गुफ्तगू बळकट आहे. आताच डॉ. डायसांचा नाद सोड आणि काणेंचा विश्वास कमवण्यासाठी प्रयत्न कर. पुढच्या वेळी तरी मंत्रिपद हवंय ना आपल्याला. नाही तर राजकारणात काय आमदार बनून समाजसेवा करत राहणार आहेस?’’ एक दिवस दामू मापारीने बार्रेटोंचे डोळे उघडण्याचे काम केले.
आपल्या मार्गदर्शक मित्राचा सल्ला चुकीचा नसतो हे आतापर्यंतचे राजकारण बघून बार्रेटोंना पटले होतेच. पुढील वर्षभरात त्यांनी आपल्या राजकारणाची दिशा बदलली. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या डायसांच्या जवळचा आमदार आपल्याला मिळतोय हे बघून काणे आनंदले. राष्ट्रीय काँग्रेसच्या उद्योग-व्यवसाय विषयक समितीचे प्रमुख म्हणून त्यांनी बार्रेटोंची नेमणूक केली. औद्योगिकीकरणाबाबत सरकारला सल्ला देण्याचे काम या समितीवर सोपवले होते. आपल्याबरोबर राहिल्यास भविष्य उज्वल असल्याचे काणेंनी बार्रेटोंना आश्वस्त केले.
दर पाच वर्षांनी विधानसभेच्या निवडणुका होतात, त्याबरोबर राजकारण्यांना नवीन संधी उपलब्ध होत राहतात. मागच्या वेळी गमावलेली संधी यावेळी साधण्यावर डोळा ठेवून असलेल्या राजकारण्यांना तर ही सुवर्णसंधी असते. लुईस बार्रेटो आणि दामू मापारी अशाच संधीच्या प्रतीक्षेत होते. आणि ती संधी अखेर आली! त्या विधानसभेची मुदत संपत आली आणि निवडणूक आयोगाकडून नवीन निवडणुकीची घोषणा झाली. बार्रेटो आणि मापारी जोमाने कामाला लागले. या निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून येऊन आपला मंत्रिपदाचा दावा काणेंच्या समोर सादर करायचा निर्धार या जोडगोळीने केला.
त्या निवडणुकीत राष्ट्रप्रेमी गोमंतक पक्ष आणि गोव्याच्या राजकारणात नव्याने शिरकाव केलेला भारतीय राष्ट्रहित पक्ष यांनी एकत्रितरीत्या उतरून राष्ट्रीय काँग्रेसच्या नाकी दम आणला. तरी, काणेंनी आपला राजकीय अनुभव आणि चातुर्य पणाला लावून राष्ट्रीय काँग्रेसचे सरकार सत्तेत आणलेच. अर्थातच सलग तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या आणि काणेंचे निष्ठावान म्हणून आपली ओळख बनवलेल्या लुईस बार्रेटोंचा उद्योगमंत्री म्हणून शपथविधी झाला. आमदार म्हणून पहिल्यांदा निवड झाली तेव्हा मोठा माणूस बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण झाले असे बार्रेटोंना वाटले होते. तेव्हा दामू मापारींनी त्यांना समजावले होते.
‘‘त्या साध्या आमदारकीवर तू खूश असायचास. फॅक्टरीतले दिवस आठव. मंत्री बनला म्हणजे आता तू मॅनेजर झाला आहेस. अजून तुला संचालक व्हायचंय...’’ दामू मापारीचे बोल ऐकता-ऐकता बार्रेटोंच्या नजरेसमोर भविष्यात मुख्यमंत्री बनण्याची फुलपाखरे उडू लागली.
‘‘होय रे दामू, मला खरंच मोठा, आणखी मोठा माणूस बनायचंय.’’ बार्रेटांनी मन मोकळे केले.
‘‘होशील. खूप मोठा माणूस होशीलच तू. त्यासाठी आता आधी उद्योगमंत्री हे जे काही पद मिळालंय त्याचा कसा वापर करायचा ते बघून घे. तुला आठवतो आपल्या फॅक्टरीतील तो ​दिल्लीवाला संचालक? त्याने कसा हुशारीने कारभार चालवून तुला हाकललं आणि फॅक्टरीचा कारभार पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतला होता, ते आठव. राजकारणात मोठा माणूस बनण्यासाठी जे भांडवल लागतं ते या फॅक्टरीवाल्यांकडे असतं.’’
उद्योगमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर पहिल्याप्रथम बार्रेटाेंनी दामू मापारीला आपला स्वीय सचिव म्हणून नेमले. काही दिवसांत आपल्या खात्याचे काम संबधित अधिकाऱ्यांकडून समजून घेतले. गोव्यात बेरोजगार तरुणांची संख्या वाढत आहे. नवीन उद्योग आणल्याशिवाय रोजगार निर्माण होणार नाहीत अशी मुख्यमंत्र्यांशी त्यांची चर्चा झाली. हा ताज्या दमाचा मंत्री काही तरी करू बघतोय म्हणून मुख्यमंत्री काणे आनंदीत झाले. राज्याबाहेरील बड्या उद्योजकांना गोव्यात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षक सवलती देण्याचे धोरण बार्रेटोंनी आखून घेतले. एकदा त्यांना आवतण दिले की गोव्याचे काय व्हायचे असेल ते होवो; संचालक बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण होईल. संचालक म्हणजेच मुख्यमंत्रिपद!
मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्यासाठी जी काही भांडवली तरतूद लागते ती या उद्योजकांकडून करून घेता येईल. मोठा माणूस बनण्याचे दिवस आता दूर नाही राहिले... आपले विचार दामू मापारीच्या विचारांशी कसे जुळून आले असे वाटून लुईस बार्रेटोंच्या चेहऱ्यावर हलकेच स्मित उमटले.
.............
(लेखक ‘गोवन वार्ता’ चे संपादक आहेत.)
......................
(या कथेतील सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक असून वास्तवाशी त्यांचा कोणताही संबंध नाही.)