सोपटे, शिरोडकरांचा निर्णय दबावाखाली

भाजपकडून यंत्रणेचा गैरवापर, काँग्रेसचा आरोप

Story: विशेष प्रतिनिधी - गोवन वार्ता |
16th October 2018, 12:53 pm

पणजीः सत्तेसाठी हपापलेल्या भाजपने मागील दारातून प्रवेश करून सरकार स्थापन केले. आताही राज्यातील सरकारी यंत्रणा तसेच केंद्रातील यंत्रणेचा गैरवापर भाजपने केला आहे. सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनी प्रचंड दबावाखालीच आमदारकी सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असावा, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी व्यक्त केली. 

काँग्रेस विधीमंडळ गटाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या बैठकीला काँग्रेसचे १४ आमदार हजर होते. येत्या पोटनिवडणुकीत या दोन्ही नेत्यांना मतदार त्यांची जागा दाखवून देतील, असा विश्वास कवळेकर यांनी व्यक्त केला.

येत्या ६ महिन्यांत हे सरकार कोसळणार आणि काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणार असा विश्वास आमदार रवी नाईक यांनी यावेळी व्यक्त केला. बाबू कवळेकर हेच आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील, असे रवी नाईक व आमदार इजिदोर फर्नांडिस यांनी यावेळी सांगितले.

मतदारांनी दिलेला कौल भाजप उघडपणे झिडकारत आहे. राज्यपाल कार्यालयाचा भाजपकडून गैरवापर सुरू आहे, असा आरोप आमदार लुईझिन फालेरो यांनी केला. सोपटे व शिरोडकर यांच्या विरोधात काँग्रेस सक्षम उमेदवार उभे करून त्यांचा पराभव करेल, असा दावा आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केला.  आमदार प्रतापसिंह राणे यांनी भाजपची कृती अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले. 

हेही वाचा