किमान चार मतदारसंघांत पोटनिवडणूक

Story: विशेष प्रतिनिधी | गोवन वार्ता |
16th October 2018, 08:26 am

पणजी: मांद्रे आणि शिरोडासह सध्या चार मतदारसंघात एकाचवेळी पोटनिवडणुका होऊ शकतात. पोट निवडणुका होणाऱ्या मतदारसंघांचा आकडा वाढूही शकतो, त्याविषयीचे चित्र येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.

कुंभारजुवे मतदारसंघाचे आमदार पांडुरंग मडकईकर आजारी असल्यामुळे ते राजीनामा देऊन जागा रिकामी करतील. त्या ठिकाणी मडकईकरांची पत्नी जेनिता मडकईकर यांना भाजप उमेदवारी देईल. तशी चर्चाही मडकईकर यांच्याशी भाजपने केली आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हेही प्रकृती अस्वस्थामुळे राजीनामा देऊन पणजी मतदारसंघाची जागा रिकामी करण्याची शक्यता आहे. तसे झाले तर पणजी मतदारसंघातही पोटनिवडणूक होऊ शकते.

मांद्रे मतदारसंघात पोट निवडणूक होणार आहे. सोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांना तिथे काँग्रेसचा उमेदवार आव्हान देऊ शकतो. लक्ष्मिकांत पार्सेकर यांनी पक्षाला साथ दिली तर सोपटे यांना तिथे निवडणूक सोपीही जाऊ शकते. शिरोडा मतदारसंघात शिरोडकर यांच्या भाजप प्रवेशामुळे भाजपचे महादेव नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीवर तूर्तास पूर्णविराम लागला आहे. गोवा फॉरवर्ड, काँग्रेस व मगो तिथे सक्रीय आहे, त्यामुळे शिरोडकर यांच्यासाठीही निवडणूक फार सोपी आहे असेही नाही.

या चारही मतदारसंघात सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्ष काँग्रेस आव्हान देऊ शकते. सध्या राज्यात काँग्रेसला वातावरण चांगले असल्याचे सत्ताधारी पक्षातील घटक पक्षाच्या एका नेत्याने अनौपचारिकरित्या बोलताना सांगितले.

हेही वाचा