होडयेकार - रापणकर बांधवांचे फेस्त उत्साहात


01st September 2018, 04:03 pm


वार्ताहर । गोवन वार्ता

हरमल :

होडयेकार व रापणकार या बांधवांचे फेस्त हरमल येथे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.

होडयेकार व रापणकार बांधवांनी कार्मेल चर्चकडून पारंपरिक फेरी काढली. नंतर किनाऱ्यावरील खास उभारलेल्या तंबूत विविध कार्यक्रम सादर करण्यात अाले. त्यात रापणकार बांधवांची मुलाखत पीटर राॅड्रिगीस यांनी घेतली. त्यात मानुयल डिसोझा, लुईस फर्नांडिस, धानयाल डिसोझा सहभागी झाले होते. रापणीसाठी ३०-४० जण लागायचे. त्यातील कष्ट व राबणे अाताच्या होडयेकार बांधवांना नसल्याने, थोडीसा सुस्तपणा जाणवत अाहे. रापणीसाठी मोठी गुंतवणूक व माणसांची आवश्यकता असते. मात्र, होडीसाठी चार - पाच जण असल्यास व्यवस्थितरित्या चरितार्थ चालवू शकतात. मात्र, तरीही सरकारकडून सवलत मिळाल्यास तेवढाच अाधार मिळेल, असे मत सर्व रापणकार - होडयेकारांनी व्यक्त केले.

मधलावाडा, सेंट अॅँथनी, गिरकरवाडा, सकयलोवाडा बांधवांनी रापण समुद्रात मारून, तासाभरानंतर ताजी मासळी प्रदर्शनार्थ ठेवली. त्यावेळेस मच्छीमार बांधव रुजाय फर्नांडिस, मायकल फर्नांडिस, धानयाल राॅड्रिगीस, धानयाल फर्नांडिस अादी बांधवांनी बांगडे, दायन, शेवटो, मुड्डशो, शेतका, कुल्ल्यो अादी मासळीची अोळख व रुची, त्यासाळी लागणारे साहित्य याची माहिती दिली.

रापणीसाठीचे जाळे, पागेरीचे जाळे, सुंगटांसाठी जाळे, बांगड्यांसाठी जाळे व येरल्यांसाठी खास जाळ्यांबाबत पूरक माहिती दिली.

उजवाड संस्थेने होडयेकार-रापणकार बांधवांचे ज्वलंत प्रश्न व गोवा-राखा, पर्यावरण राखा, असा संदेश देणारे पथनाट्य सादर करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. नाट्यातून गोवा म्हणजे काय, संस्कृती, परंपरा व पारंपरिक व्यवसाय, निसर्गसौंदर्य, समुद्रकिनारे आदींची माहिती दिली. गोव्याच्या भूमीत प्लास्टिकचा भस्मासूर, ड्रग्जचा सुळसुळाट, फार्मेलिनसारखे घातक रसायन, मद्यसम्राट व जमीन माफिया अादींबाबत धेंपे काॅलेज पणजीच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी व उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यांना मार्गदर्शन इतिहासकार, संशोधक व प्राध्यापक प्रजल साखरदांडे यांचे लाभले.

उजवाड संस्थेने किनारपट्टी भागातील विशेषत: मच्छीमार बांधवांना, पर्यावरण, झाडे राखून ठेवा, जमिनी विकू नका, असा संदेश देत फेस्ताचे महत्त्व समजाविले. यावेळी लहान मुलांनी पारंपरिक कोळी गीते, फुगडी सादर केली.

रापणकार बांधवांनी, रापण मासेमारी केल्यानंतर त्या बांधवांना समुद्रकिनाऱ्यावरून कार्यक्रमस्थळी वाजत गाजत मिरवणुकीने अाणण्यात अाले. यावेळी हरमलचे बॅण्ड वादक मिस्त्री, मिंगेल, मार्टिन, डाॅम्नीक, रुझाय अादींनी बँण्डवादन केले. यावेळी रापणकार बांधवांनी पेज, बांगडो, अामील वगैरे खाद्यानांची सोय केली होती. तसेच परंपरागत साधने, कोयती, हातोडा, दाते, पोय तसेच अन्य साधने ठेवली होती. या फेस्तास मांद्रे मतदारसंघाचे अामदार दयानंद सोपटे, पर्यटन मंडळाचे संचालक जीत अारोलकर, पंच प्रवीण वायंगणकर तसेच गोवा भरातून विविध सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती. स्थानिक बांधव अालेसीन, इलियास, अारकान, डाॅम्नीक, सालू, बाॅस्को, टाॅनी, झेवियर, मीना, शुबर्ट तसेच फा. पियो अाल्मेदा यांनी परीश्रम घेतले.